मंगळवार, २५ जून, २०२४

 काळ ही मोठी विचित्र संकल्पना आहे.


एका अर्थी काळ ही एक मिती आहे, जिला एकाच वेळी लांबी, रुंदी आणि खोली आहे, 


शिवाय ह्या तिन्हींच्या आत बाहेर होण्याचा, रेंगाळण्याचा स्वतःचा वेगही आहे.


आपल्या सोयीसाठी आपण काळ एकरेषीय मानला जे कदाचित सोयीस्कर आहे. विश्वाच्या उत्पत्तीशी सुरू झालेला, आजच्या क्षणामध्ये सरकत पुढे जाणारा आणि भविष्याच्या अंधाऱ्या गुहेत लुप्त होणारा काळ भौतिकशास्त्राच्या दृष्टीने कदाचित सलग, एकरेषीय आणि समान एककांत विभागलेलाही असेल. आपल्या घड्याळाच्या काट्यावर सरकणारा हा काळ कदाचित गणिताच्या दृष्टीने अचुकही असेल.


मात्र आपल्या स्मृतींमध्ये काळ फार वेगळा असतो.  तो एकरेषीय नाही, तो एकाच वेगाने सरकत नाही, तो सारखाच थबकत नाही, त्याचे एकक समान नाही. 


वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला आपले आणि आपल्या भोवतालच्या लोकांचे आयुष्य आठवत असते. मात्र ह्या आठवणींची उतरंड एकसारखी नाही, एकच नाही. वेगवेगळ्या दगडांची वेळवेगळी चळत रचावी तशी मनाच्या कप्प्यात वेगवेगळ्या घटनांची, माणसांची आणि त्यांना आपण दिलेल्या प्रतिसादाचीही वेगवेगळी थप्पी लावलेली असते. त्याभोवती आपण स्वतःला रचलेले असते.


आपल्या सगळ्यांना आयुष्यातील स्वतःपुरता पहिला क्षण, पहिली आठवण स्मरत असते. बहुतेकदा ते वयाचे तिसरे किंवा चौथे वर्ष असते. आपल्या दृष्टीने तो आपला पर्सनल बिग बँग असतो. त्यानंतरच्या घटना मात्र वेगवेगळ्या आकाशगंगेत वेगवेगळ्या घडाव्या तशा आठवत राहतात. 


माझी पहिली आठवण साधारण तिसऱ्या वर्षाची आहे. ती एक संध्याकाळ होती आणि आमच्या घरासमोरच्या डबक्यात एक पाणकोंबडी मला पहिल्यांदा दिसली होती. बहुदा तो पहिला क्षण होता जेंव्हा माझ्या नजरेचे माझ्या स्मृतींशी कनेक्शन जुळले होते.


मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो, पण तो शाळा सुटल्यावर आई भेटलेली तिथून आठवतो. वयाच्या चौथ्या वर्षी एका संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. हा माझ्या शाळेत होता. त्याचे दोन खोल्यांचे नीट आवरलेले घर, त्याची आई, त्याच्या घराच्या मागे असलेले गवताळ मैदान, त्या मैदानात धावत काहीतरी खेळणारे आम्ही दोघे मला स्पष्ट आठवतात. एखाद्या इस्टमन कलर चित्रपटाला पाहावे तसं मी हे आजही पाहू शकतो. ही आठवण मला फार अलीकडची वाटते. माझ्या कॉलेजचा पहिला दिवस मात्र मला आठवत नाही. कॉलेजमध्ये जे काही घडलं ते फार पूर्वी घडलंय असा आभास होतो.


माझ्या दोन्ही मुलांमध्ये नऊ वर्षांचे अंतर आहे, मात्र दोघांच्याही जन्माचा दिवस मला लख्ख आठवतो आणि असं वाटतं की हे साधारण मागे पुढेच घडलंय. मुलांच्या वाढीतही त्यांच्या बालपणाचा काही काळ अगदी काल पाहील्यासारखा वाटतो आणि मधली काही वर्ष सरळ स्कीप झाल्यासारखी हरवून जातात. ती घडून गेली आहेत हे माहीत असतं पण आठवत नसतात. तो काळ पावलांचा आवाज न करता निघून गेलेला असतो. त्याचे ठसेही फारच हलके उमटलेले असतात. 


काही माणसं काल भेटल्यासारखी मनात नाचत असतात, काही खरोखरच काल भेटूनही ओघळून जातात. कुणाच्या काही आठवणी इतक्या मखमली असतात की त्यांनीच टोचलेले काटे मऊ होऊन जातात. काहींच्या बाबतीत उलटही घडते, त्यांनी आपल्यावर जीव टाकलेला असतो पण  एखादा बेशिस्त चुकार क्षण आपल्या लक्षात राहून जातो, आपण त्या माणसावर अन्याय करतो.


मेंदूच्या कोणत्या भागात ह्या स्मृती कशा रचल्या जातात मला माहित नाही. त्या रचल्या जाण्याआधी कशा साठवल्या जातात तेही मला माहित नाही. मन आणि बुद्धीच्या कोणत्या अल्गोरिदमने काळाची ही शिडी रचली जाते तेही कळतं नाही. 


ओसाड माळरानावर पावसाची सर बरसून जावी. चुकार गवताने सांडवून ठेवलेल्या एखाद्या बी वर तो थेंब मुरून जावा आणि मग त्यातून हिरवा कोंब उगवून यावा, त्या हिरव्या कोंबात त्या माळरानाची वैराण धग असावी, पावसाच्या थेंबाची ओल असावी आणि गवताच्या बिजाची जगण्याची आसही असावी, अगदी तसेच आपण जगलेल्या हजारो क्षणांतुन आपल्या आत एखादाच क्षण उगवून येतो, कधी जरासाच वाढतो कधी आपल्याला पूर्ण व्यापून टाकतो.


त्याला ना क्रम असतो ना उद्देश.. 


तो फक्त असतो आणि राहतो..


-शैलेंद्र कवाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा