मंगळवार, २५ जून, २०२४

 आज जागतिक पर्यावरण दिन..


आज मला आपल्या संस्कृतीत घडलेल्या सगळ्यात मोठ्या पर्यावरणीय अपघाताची आठवण आली, त्या अपघाताची गोष्ट परत आठवली.


ही एका सुकलेल्या आणि तरीही स्मृतीत जिवंत राहिलेल्या नदीची गोष्ट आहे, पण फक्त नदीची नाही, ही एका संस्कृतीच्या हरवून परत सापडत जाण्याची गोष्ट आहे. वरवर लुप्त होऊन आतून वाहत राहण्याची गोष्ट आहे. 


ही गोष्ट आहे सरस्वतीची.. ही गोष्ट आहे तिच्या काठावर फुललेल्या,बहरलेल्या आपल्या संस्कृतीची. ही गोष्ट आहे आपला इतिहास, आपला भूगोल आणि आपले पर्यावरण हजारो वर्ष मौखिक परंपरेतून जतन करणाऱ्या आपल्या पूर्वजांची..


आपल्या संस्कृतीचा ज्ञात असलेला सगळ्यात पहिला शब्द म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद सरस्वतीला नदीतमा म्हणतो. ऋग्वेद सरस्वतीला सप्तसिंधूची जननी मानतो. एखादा खंड सोडल्यास ऋग्वेदाच्या प्रत्येक खंडात सरस्वतीचा उल्लेख आहे. नुसती ही नदी कशी होती तेच ऋग्वेद सांगत नाही तर तिच्या काठावरचा प्रदेश कसा होता तेही ऋग्वेद वर्णन करून सांगतो. संपूर्ण ऋग्वेदात फक्त सरस्वतीसाठी पूर्ण श्लोक रचले गेले आहेत, सरस्वतीचा महिमा वारंवार गायला गेला आहे. हे भाग्य ना गंगेला आहे ना सिंधुला..


कारण ह्या संस्कृतीचा जन्मच सरस्वतीच्या पोटात झाला होता, तिचे पोषण सरस्वतीच्या काठावर झाले होते. दाशरज्ञ युद्धासारख्या ऐतिहासिक घटना तिच्या खोऱ्यात घडल्या होत्या. आज आपण जिला सिंधू संस्कृती म्हणतो, ती सरस्वती संस्कृती होती, सिंधू नदीच्या काठी आज सापडलेली शहरे हा सरस्वतीच्या संस्कृतीचा विस्तार होता. पश्चिमेला सिंधू ते पूर्वेला गंगेपर्यंत गवसत जाणारा प्राचीन नागरी अवशेषांचा हा पसारा ज्याला आपण पूर्वी वैदिक संस्कृती म्हणायचो, त्याचा पूर्ण पट होता.


सरस्वती कुठे आहे हे नदीसुक्तात ऋग्वेदाने स्पष्ट सांगितले आहे, 


इमं में गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमै सचता परूष्ण्या।

असिवक्न्या मरूद्वृधे वितस्तयार्जीकीये श्रणुह्या सुषोमया।।


ह्या नद्यांचे वर्णन पूर्वेकडून पश्चिमेकडे केले आहे, पहिली गंगा, मग यमुना, मग सरस्वती, त्यानंतर सतलज, मग पुढच्या..


सरस्वतीचे उल्लेख फक्त ऋग्वेदात नाहीत, ते रामायणात आहेत, महाभारतात आहेत आणि नंतर रचल्या गेलेल्या ब्राह्मणांत देखील आहेत. ऋग्वेद सरस्वतीचा उल्लेख सुरवातीला नदीतमा म्हणून करतो, पण दहाव्या खंडात नदीसुक्तातच ऋग्वेद म्हणतो की सिंधू ही सगळ्यात मोठी नदी आहे. रामायण म्हणते की सरस्वती हळूहळू सुकते आहे, लहान होते आहे. महाभारत म्हणते सरस्वती कधीतरीच वाहते, कधी कधी सुकून जाते. सरस्वती जिथे लुप्त होते त्या जागेला व्यास "विनशन" असे म्हणतात. नंतर रचल्या गेलेल्या ब्राह्मणांनी तर सरस्वतीला सरळ विद्येची देवता केले, वेदवती म्हंटले, जिवंत संस्कृतीच्या सुकलेल्या जन्मदात्रीला त्यांनी देवीचा मान देऊन जिवंत ठेवले.


हा सगळा आपल्या भूगोलाचा इतिहास आहे, जो आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलाय.


काय झालं होतं तेंव्हा?


विष्णू श्रीधर वाकणकर नावाचे नावाचे फार श्रेष्ठ पुरातत्व संशोधक होते, ज्यांनी मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांचा शोध लावला. त्यांनीच लावलेला अजून एक शोध तुलनेने कमी प्रसिद्ध आहे, तो आहे सुकलेल्या सरस्वतीचा.. सुकलेल्या सरस्वतीच्या शोधात वाकणकर सरांनी तिच्या मुखापासून ते उगमापर्यंतचा भाग पिंजून काढला. 


आज ज्याला आपण कच्छचे रण म्हणतो तो एकेकाळी सरस्वती समुद्राला मिळण्याचा त्रिभुज प्रदेश होता, जसे आज सुंदरबन आहे तसा. म्हणूनच धोलवीरासारख्या नागरी वस्त्या तिथे होत्या. आज ज्याला आपण राजपुताना म्हणतो तो सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक भाग होता. आजचा हरियाणा आणि कुरुक्षेत्राच्या आसपासचा भाग हा सरस्वतीच्या पाण्यावर पोसलेला अत्यंत संपन्न प्रदेश होता. आज जिला घग्गर म्हणून ओळखले जाते ती सरस्वतीची एक उपनदी होती. यमुना आणि सतलज ह्या दोन्ही नद्या आपले पाणी सरस्वतीच्या प्रवाहात ओतत होत्या. सरस्वती लाखो वर्ष अशीच वाहत होती. आपल्या दोन्ही काठांवर संस्कृती फुलवत होती.


पण नंतर काहीतरी झालं, कोणतीतरी भौगोलिक घटना घडली आणि यमुनेचा प्रवाह पूर्वेकडे वळला. परत काहीतरी झालं आणि सतलजचा प्रवाह पश्चिमेला सरकला. यमुना गंगेला मिळाली आणि सतलज सिंधुला मिळाली. सरस्वती सुकत गेली, कोरडी पडत गेली. सरस्वतीच्या काठावर नांदणारी काही लोकं गंगेकडे गेली, काही सिंधुकडे गेली. ह्यानंतर हजारो वर्षांनी लिहिलेल्या बौधायन श्रौत सूत्रात ह्या विस्थापणाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.


सरस्वती आटली. तिच्या काठचा सुपीक प्रदेश वाळवंटात बदलला. ह्यात तिच्या काठी राहणाऱ्या लोकांचा काहीच दोष नव्हता. ते लोक, त्या संस्कृती पांगल्या. आईच्या कुशीतुन मावशीच्या पदराखाली जावं तशा गंगा आणि सिंधूच्या आश्रयाला गेल्या. मग नर्मदा आणि गोदावरीच्या, कावेरी आणि तुंगभद्रेच्या काठावरही फुलल्या, मोठ्या झाल्या. स्वतःला कधी भारत कधी हिंदुस्थान म्हणवून घेऊ लागल्या.


पण त्या संस्कृती, ती लोकं सरस्वतीला विसरली नाहीत. सरस्वती त्यांच्या ज्ञानाची, कलेची, विद्येची देवता झाली, सरस्वतीच्या पाण्याचा नाद विणेच्या आवाजात निनादत राहिला. कधी शब्दांच्या, कधी शाईच्या माध्यमातून वाहत राहिला.


सुकलेली सरस्वती भारतीयांच्या रक्तातून जिवंत राहिली..


-शैलेंद्र कवाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा