गजानन भास्कर मेहंदळे हे कदाचित आजच्या घडीला शिवकाळावर सर्वाधिक अधिकार असलेले इतिहास अभ्यासक आहेत.
इथे इतिहास अभ्यासक हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतोय. जो पुराव्यानिशी बोलतो, पुराव्याशिवाय बोलायचे टाळतो, भावना, पूर्वग्रह व कल ह्यांची इतिहासात भेसळ करत नाही तो इतिहास अभ्यासक.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने परवा त्यांनी केलेल्या ह्या भाषणातील एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, ते इतिहास अभ्यासकांच्या सत्य मांडताना आवश्यक असलेल्या कोरडेपणाबद्दल आहे. हा कोरडेपणा गरजेचा आहे कारण इतिहास सांगताना एकदा भावनांचा ओलावा, अभिनिवेश, अभिमान आला की सत्य मागच्या दरवाजाने पसार होते.
इतिहास ही मूलतः घटनांची जंत्री असते. त्या घटनांच्या आसपासचा कार्यकारणभाव तपासताना, त्या घटनांचा कर्ता काय म्हणतो हा पुरावा सगळ्यात महत्वाचा समजला जातो. जर ती गोष्ट समकालीन कागदपत्रात लिहिलेली असेल तर त्या घटनेबद्दल आज आपल्याला काय वाटते ह्याचे महत्व शून्य होते.
जे झाले ते असे झाले आणि ह्या दिवशी झाले, त्याबद्दल हे लिहिलेले आहे इथवरच इतिहास संपतो.
बाकीचे सगळे राजकारण असते. इतिहासाचे अश्व आपल्या टांग्याला जोडण्याची सवय भारतीय उपखंडात सगळ्याच राजकारण्यांना आहे. कदाचित ह्याचे मूळ स्वतःच्या पूर्वजांना सतत सभ्य, पापभिरू आणि श्रेष्ठ समजण्यात असावं.
खरंतर इतिहासात जे काही घडलं, आपल्या पूर्वजांनी जे काही बरं वाईट केलं, त्याचं ओझं आपल्या शिरावर घ्यायची आपल्याला गरज नसते. एकदा तुम्हीं स्वतःच्या पूर्वजांच्या कृत्यांचा अनाठायी अभिमान मिरवायला सुरवात केली की त्यांच्या पापाचं ओझंही आपसूक तुमच्याच शिरावर येतं. इतिहासाचा डोळस अभ्यास करताना असे अभिमान आणि न्यूनगंड संपूर्णपणे टाळले पाहिजेत.
मात्र त्याचबरोबर इतिहासातील प्रवाहांचा डोळस मागोवाही घेतला पाहिजे. हे करताना आपण अशा एखाद्या प्रवाहाच्या भोवऱ्यात तर सापडत नाही ना तेही पाहिले पाहिजे. इतिहास हा व्यक्तींचा अभ्यास नसतोच, तो खरंतर प्रवाहांचा अभ्यास असतो. आपल्याला माहीत असलेली ऐतिहासिक व्यक्ती त्या प्रवाहाची प्रतिनिधी असते. कदाचित ती त्या प्रवाहातील सर्वाधिक यशस्वी व्यक्ती असते. शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यांनी ज्या प्रवाहाचे नैतृत्व केले, ज्या महाराष्ट्रधर्माचे पालन व संवर्धन केले त्याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. असे काय घडले की ज्यामुळे भारतीय इतिहासाला शिवाजी महाराज कलाटणी देऊ शकले, मराठी समाजात त्या काळी असा कोणता प्रवाह होता की संपुर्ण भारत खंडाला जे जमले नाही ते महाराष्ट्राला जमले? शिवचरित्राचा अभ्यास हा खऱ्या अर्थाने त्या प्रवाहाचा अभ्यास आहे. बाकी घटनांचे तपशील महत्वाचे नाहीत. स्वराज्याची व्हिजन व मिशन स्टेटमेंट महत्वाची आहे.
आणि ती जेंव्हा स्वतः महाराजांनी, संभाजी राजांनी, राजराम महाराजांनी सांगितलेली असेल तेंव्हा आज त्याबद्दल अनुमान मांडण्यात फारसा अर्थ नाही.जे होते ते स्वीकारले पाहिजे.
पण त्याच बरोबर, तो इतिहास घडून गेलेला आहे हेही ध्यानात ठेवले पाहिजे. इतिहासातील घटनांचे सूड आजच्या काळात उगवणे हा मूर्खपणा आहे. इतिहासातील प्रवाहांचा अभ्यास करताना आपण प्रवाहपतित होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे.
तुमचा आणि माझा इतिहास वेगळा नसतो. उगमापासून वाहत आलेले नदीचे पाणी एकदा एकत्र आले की ते झऱ्याचे आहे की ओहळाचे आहे हे सांगता येतं नाही. ते मिसळून जाते. इतिहासात आपली अभिमानस्थळ शोधणे, ती निर्माण करणे, त्याभोवती अहंकाराचे किल्ले बांधणे, कधी न्यूनगंडाच्या, अन्यायाच्या दऱ्या शोधणे हा व्यर्थ खटाटोप असतो. इतिहासाकडे साक्षीभावाने पाहिल्यास वर्तमान सुकर होतो.
शिवाजी महाराजांवर मालकीहक्क सांगतांना, स्वतःच्या क्षुद्र स्वार्थांचे मुलामे त्यांच्या व्यक्तिमत्वाला देताना आपण त्यांच्या इतिहासावर तर अन्याय करत असतोच,
पण त्याहून जास्त अन्याय स्वतःच्या वर्तमानावर आणि भविष्यावर करत असतो.
ते टाळले पाहिजे.
- शैलेंद्र कवाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा