#मला_भेटलेली_माणसं
रवी
टन टन टन्नन टटन्नन..
एका विशिष्ट नादात उलथण्याने तव्यावर ठोकल्याचा आवाज यायचा..
संध्याकाळचे साधारण साडेपाच सहा वाजत असायचे. सूर्य मावळतीला कललेला असायचा. दिवस संपल्याची जाणीव करून देणारा पिवळा प्रकाश सोनेरी झालर लपवत पसरायचा. कामावर गेलेल्या लोकांची घरी परतायची वेळ झालेली असायची.
आणि आपली डोश्याची गाडी घेऊन रवी आलेला असायचा.
तामिळनाडूच्या कुठल्यातरी भागातून आलेले राम आणि लक्ष्मण नावाचे दोघे भाऊ होते. राम गोरा, मध्यम उंचीचा, जरासा गरीब चेहऱ्याचा तर लक्ष्मण उंच, सावळा, उग्र करारी चेहरा असलेला माणूस होता. आमच्या भागात इडली, मेदूवडे आणि डोसे हे पदार्थ ह्या दोघांनी घरोघर नेले.
नंतर नंतर आम्ही राहायचो तो भाग त्यांनी गावाहून आलेल्या आपल्या भाच्याच्या हवाली केला, त्याचं नाव रवी. रवी सडपातळ, सावळ्या रंगाचा, तरतरीत चेहऱ्याचा बोलका मुलगा होता. जेंव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा त्याच वय सोळा सतरा वर्षांचं असेल.
सकाळी साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान रवीच्या आवाजात "डल्लीयी..ss" अशी खास हाक ऐकू यायची. एका मोठ्या पिशवीत दोन डब्बे असायचे, एकात इडली-वडे आणि दुसऱ्यात चटणी. ती पिशवी खांद्यावर घेऊन रवी फिरायचा. इतरही काही इडलीवाले होते पण ते पोंगे वाजवत फिरायचे. रवीकडे पोंगा नसायचा. आम्ही रवीचा आवाज येण्याची वाट पाहायचो ह्याची दोन कारणं होती. पहिलं म्हणजे इडली किंवा वड्यांबरोबर जी चटणी असायची, ती रवीकडची घट्ट असायची, पोंगेवाल्या अण्णाच्या पाणीदार चटणीला चव नसायची. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रवी इडली किंवा वडा एक्सट्रा द्यायचा.
एक रुपयाला चार इडल्या होत्या, मेंदूवडे रुपयाचे तीन मिळायचे. ह्या इडल्या किंवा वडे आज हॉटेलमध्ये मिळतात त्या साईझचे अजिबातच नसायचे. मेदूवडे तर आपण पितृपक्षात मुगाचे वडे करतो त्याच साईझचे असायचे. चार रुपयाची इडली आणि एक रुपयांचे वडे घेतले की रवी एखादा वडा आणि इडली एक्स्ट्रा द्यायचा, वाढीव चटणी आम्ही हक्काने मागून घ्यायचो. ती चटणी जास्त मिळावी म्हणून इडली घेतानाच मोठी वाटी घेऊन जायचो. रवीचा व्यवहार आणि आमची हाव एकमेकांशी जमवून घ्यायचे.
सगळ्या बिल्डिंग फारतर दुमजली होत्या. एखाद्याने अगदी एक रुपयाची इडली घ्यायला हाक मारली तरी रवीला ती जड पिशवी घेऊन ते दोन चार जिने चढावे लागायचे. त्या काळात हे जाणवलं नाही पण आज एक रुपयाची वस्तू विकायला कोणीतरी इतके कष्ट घ्यायचं हे अमानुष वाटतं. तेंव्हा रुपया कितीही मोठा असला तरी ही बोच कमी होतं नाही. बरं, सकाळी हे सगळं उरकलं म्हणजे रवीचं काम संपणार नसायचं, संध्याकाळी त्याला डोश्याची गाडी आणायची असायची.
चार चाकी हातगाडी, त्याला तीन बाजूनी उंच शेल्फ करून वर अल्युमिनियमचा पत्रा ठोकलेला, त्या शेल्फच्या आत दोन तीन डबे असायचे. बटाट्याच्या भाजीचा, चटणीचा, डोश्याच्या पिठाचा, इडलीचा.. कापलेल्या कागदांची चळत बाजूलाच लावलेली असायची. समोर स्टोव्ह असायचा, त्याची पीन आणि काडेपेटी असायची. तेलाचा छोटा डबा असायचा. त्यात उलथनी टाकलेली असायची. एक रॉकेलचा लहान कॅन गाडीच्या तळाशी अडकलेला असायचा. अशी ही सजलेली हातगाडी घेऊन रवी एखाद्या बिल्डींगच्या खाली जराशी मोकळी जागा हेरून उभा राहायचा.
आधी स्टोव्ह पेटवला जायचा, मग त्यावर तवा ठेवला जायचा. तव्याला जरा ताव आला की रवी उलथण्याने त्यावर विशिष्ट लयीत आवाज काढायचा. हे आजूबाजूच्या सगळ्या जनतेला डोसे खाण्याचे निमंत्रण असायचे. मग एकेक जण त्याच्या गाडीवर हजर व्हायचा. रवीने कांदा अर्धा कापलेला असायचा. एका वाटीत अर्धे तेल, अर्धे पाणी घेतले जायचे. तो कापलेला कांदा त्या तेलपाण्यात बुडवून गरम तव्यावर फिरवला जायचा. चर्रर्र असा आवाज यायचा. मग वाटीत डोश्याचे पीठ घेऊन त्याच वाटीने मधून कडेपर्यंत गोल पसरवत नेले जायचे. उलथण्याने त्यावर तेल शिंपडले जायचे आणि जरासा कडक झाला की त्याच उलथनीने त्यावर भाजी पसरवली जायची. भरपूर उभा कांदा घातलेल्या त्या भाजीची चव आजही माझ्या जिभेवर आहे. डोश्याची घडी तव्यावरच घातली जायची आणि तो चपटी पुंगळी करून कागदात गुंडाळला जायचा. मसाला डोसा दोन रुपये आणि साधा दीड रुपया.. बहुतेक लोक मसाला डोसा घ्यायचे. पन्नास पैशात पोटाला जास्तीचा आधार शोधायचे.
रवीशी आमचा संबंध असा उभ्याउभ्या यायचा. त्याची तामिळच्या काठाने चालणारी आणि आमची मराठीच्या काठीने अर्धमेली केलेली हिंदी एकमेकींशी गरजेपुरत्याच भेटायच्या. इडली डोश्याच्या पांढऱ्या पिठापलिकडचा सावळा रवी आम्हांला फार जाणवायचा नाही. पण कुठेतरी मनातून माझ्यापेक्षा पाच-सात वर्षानीच मोठ्या असलेल्या ह्या कष्टाळू मुलाबद्दल आदर वाटायचा, आपुलकी वाटायची. आपणही असेच कष्ट केले की आयुष्य पुढे सरकत राहील असं वाटायचं. सगळं जरासं सोपं वाटायचं.
दिवस पुढे सरकत होते. नव्वदीचे दशक सुरू झाले होते. देश बदलत होता, माझं वय आणि नजर बदलत होती. आसपासचा समाज बदलत होता. इडली आणि डोश्याच्या किमती वाढत होत्या पण रवीच्या गाडीवरची गर्दीही वाढत होती. लोकांकडे पैसा येत होता, लोकांच्या हातुन तो रवीकडेही जात होता. मी कॉलेज करून दुकान सांभाळत होतो. जरासे कष्ट मलाही पडत होते, माझ्याही खिशात पैसा खुळखुळत होता.
एका पावसाळी रात्री उशिरा मी कुठूनतरी परत येत होतो. दिव्यांचा अंधुक उजेड होता. रस्त्याच्या कडेने रवी गाडी ढकलत परत जात होता. मात्र तो गाडी ढकलतोय की गाडीचा आधार घेऊन चालतोय ते कळत नव्हते. मी ज्या रवीला ओळखत होतो तो हा नव्हता. त्याच्या हालचालीत लालित्य नव्हते. त्याच्या डोळ्यात जीव नव्हता. हा रवी नव्हता, ही दारू होती. रवीने मला ओळख दिली नाही, मीही त्याला ओळख दाखवली नाही. कष्ट विसरण्याचा हा सोपा मार्ग मला तेंव्हाही मान्य नव्हता.
मी माझ्या मार्गावर चालत राहिलो, रवी त्याच्या मार्गाने परत येत राहिला. हळूहळू त्याचे शरीर सुटले, आम्हांला माहीत असलेला सावळा तरतरीत मुलगा इतिहास झाला. त्याची सकाळची फेरी कधीच बंद झाली होती. चेहरा सुजलेला, आजारी वाटणारा रवी नावाचा माणूस गाडी घेऊन यायचा, पैसे कमवायचा आणि रात्री जी घरी परतायची ती फक्त दारू असायची.
मी कधी रवीला समजावले नाही. माझे वयही नव्हते आणि माझ्यात ती हिंमतदेखील नव्हती. मात्र त्याला अनेकांनी समजावले असेल, त्याच्या घरच्यांनी, राम-लक्ष्मणने, कदाचित त्याच्या एखाद्या ग्राहकानेही.. पण रवीने ऐकले नसावे, कारण कष्टकरी माणसाला बंड करण्याचा, मनस्वी वागण्याचा, जगाला झुगारुन देण्याचा अधिकार आहे असे त्याला वाटले असावे. रवी त्याचे बंड जगत राहिला. वैफल्याच्या गर्तेत रुतत राहिला.
रवीचे पुढे काय झाले मला माहित नाही. नंतर तो दिसणे बंद झाला. कोणी म्हणाले गावाला परत गेला, कोणी सांगितले वारला. खरं काय ते मला माहित नाही. मात्र मी रवीला कधीच विसरणार नाही. ज्या माणसाचे कष्ट बघून मला कधीकाळी एक मार्ग दिसला होता त्याचा असा अंत मला त्या काळात खूप शिकवून गेला. खिशातला पैसा का आणि कुठे वापरायचा, श्रमलेलं मन आणि शरीर कसं शांत करायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं मी हळूहळू शिकत होतो. स्वतःला रचत होतो. जिथे रवी कोसळला तिथे आपण जायचं नाही हे बजावत होतो. सुदैवाने मला ते जमलं.
माझ्या वयाच्या विशीत डोळ्यासमोरून ओघळून गेलेलं रवीच आयुष्य आज मधूनच आठवतं. तव्यावर पाणी पडल्यावर व्हायचं तसं चर्रर्र होतं. आपण त्या वेळी रवीशी बोललो असतो तर फरक पडला असता का हे विचारत राहतं, मी स्वतःशीच ठामपणे मान हलवतो. नकार देतो.
बहुदा माझा विश्वास आणि निग्रह फक्त स्वतःपुरता आहे..
-शैलेंद्र कवाडे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा