मंगळवार, २५ जून, २०२४

 बहुतेक ते 1986 किंवा 87 चे वर्ष असावे.


मी अकरा बारा वर्षांचा होतो आणि एकटा दुकानावर बसायला सुरवात करून एखादे वर्ष झाले असावे. सकाळी जरा वेळ दुकान आणि मग 12 वाजता शाळा असा प्रोग्रॅम असायचा.


मला अजून आठवतंय, ते सरत्या पावसाळ्याचे दिवस होते. मी दुकानाच्या गल्ल्यातून दोन रुपयांची एक नोट चोरली. त्या नोटेचे काय करायचे ते मला पक्के माहीत होते. 


ज्या गंधाच्या मोहात पडून मी आयुष्यातील पहिली चोरी केली होती, तो गंध मला आजही आठवतो. एकीकडे बटाटे उकडत आहेत, दुसरीकडे उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्यात लसूण, हळद, मीठ आणि मिरची लाकडी दांड्याने ठेचली जात आहे, बाजूला एक रगडा फिरतोय आणि दलियाची ताजी चटणी त्यात वाटली जातेय. मोठ्या स्टोव्हवर तेलात वडे सुटले आहेत आणि एकेक घाणा बाहेर येतोय. मधूनच पाऊस पडतोय आणि खड्ड्यात साठलेल्या पाण्यावर रिक्षातून गळलेले ऑइल तरंगते आहे. ह्या सगळ्या गंधांचे कोलाज तयार होऊन ते आसमंत भारून टाकते आहे. ही सगळी जादू सव्वा रुपयांत मिळायची.


एका बारा वर्षाच्या मुलासाठी दोन रुपये चोरायला हे कारण पुरेसे होते.


डोंबिवलीत मंजुनाथ हायस्कूल समोर एक जानकी हॉटेल होते, त्याच्या शेजारी त्याच नावाचा एक स्नॅक्स बार होता. नंतर त्याचे नाव दीपा स्नॅक्स बार झाले. वर वर्णन केलेलं सगळं तिथे घडायचं. हा मी एकट्याने खाल्लेला पहिला वडा आणि पाव. आयुष्यभर सुरू राहिलेल्या खाद्यप्रवासाचा हा श्रीगणेशा. 


नव्वदीचे शतक सुरू झाले तेंव्हाच मी दहावी झालो. कॉलेज सुरू झाले आणि त्याच बरोबर माझ्या खाद्य यात्रेतील नवीन तिर्थस्थळ मला सापडत गेली.


वय वाढत गेलं तसा मी जास्त स्वतंत्र होत गेलो. दुकान आणि दुकानाचा गल्ला पूर्णपणे माझ्या ताब्यात आला. सुदैवाने वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड इतकी होती की त्या वयात इतर कोणत्याच सवयी लागल्या नाहीत. एका अर्थी खाण्याच्या आवडीने मला वाचवलं. 


कॉलेजच्या बाहेर शांतारामची सरबताची गाडी असायची. त्या गाडीवर डबल लेमन सरबत पिणे ही माझी नशा होती. गम्मत फक्त सरबताच्या चवीत नसायची, खरी गंमत शांताराम ते सरबत कसे बनवतो ते बघण्यात होती. तो ओळीत बारा पंधरा ग्लास लावायचा. मग सगळ्यांमध्ये बर्फ़ाचा चुरा भरायचा. मग मीठ, त्यानंतर लिंबू, मग साखरेचे पाणी, ज्यांचा कालाखट्टा वगैरे आहे त्यांचे ते फ्लेवर. काही ग्लासमध्ये सब्जाचे बी. मग तो एक रिकामा ग्लास घ्यायचा, तो ग्लास उलटा करून प्रत्येक ग्लासवर ठेवायचा आणि हातात उचलून जोरात हलवायचा. कधी गर्दी जास्त असेल तर हेच दोन्ही हातांनी करायचा. फेसाळलेल्या सरबताचा ग्लास आमच्या समोर धरायचा. त्याच्या तल्लीन कष्टांची चव आमच्या जिभेवर रेंगाळत राहायची. 


शांताराम हा मी पाहिलेला आद्य बारटेंडर..


कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ब्रेड पॅटिस हा पदार्थ फेमस होता. गरमागरम ब्रेड पॅटिस आणि चटणी आवडायची. कॉलेजसमोर MIDC कॅन्टीन होते. प्रोफेश्वर आणि विद्यार्थी तिथे अग्निहोत्र करायला जायचे. तिथेही कोणता तरी पदार्थ फेमस होता पण आता मला तो नक्की आठवत नाही. बहुदा पट्टीचा समोसा. 


सकाळी किंवा दुपारच्या वेळी मला आवडणारा अजून एक पदार्थ होता. चार रस्त्यावरून जरा पुढे गेलं की माय होम नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे स्टीम इडली मिळायची. त्या इडली बरोबर नारळाची चटणी असायची. पाच रुपये प्लेट. मी दोन प्लेट तरी खायचोच. तिथेच बाजूला एक गुरुदेव नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे मी मेंदूवडा सांबार खायचो, त्या सांबार मध्ये खोबऱ्याचे उभे काप असायचे. ते मुरलेले खोबरे चघळायला मजा यायची. 


स्टेशनजवळ "चांदोले" म्हणून एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान होते. त्याच्या समोरच्या जागेत महाबळ नावाचा शेट्टी गाडी लावायचा. त्याच्याकडे मटण आणि चिकन अफलातून मिळायचे. त्याच्याच शेजारी एक भुर्जी पावची गाडी असायची. पावभाजीच्या दोन गाड्या असायच्या. ठाकुरच्या वडापावची गाडी असायची. ह्या प्रत्येक गाडीवाल्याची काहीतरी खासियत होती. एका ठिकाणी खाताना दुसऱ्या गाडीवर तयार होणाऱ्या पदार्थांचा गंध मनोसोक्त हुंगायचा आणि "उद्या येतो रे" असं त्याला मनातल्या मनात आश्वासन द्यायचं. 


डोंबिवलीत माझी अजूनही खूप तीर्थक्षेत्र होती. नंतर शिकण्यासाठी मुंबईत जायला लागलो तर तिकडे अजून काही सापडली.


त्यांच्याबद्दल पुढच्या भागात..


-शैलेंद्र कवाडे.

 मी तेंव्हा साधारण सातवी आठवीत असेल. वडिलांनी सेकंडहॅन्ड लॅम्बरेटा स्कुटर घेतली होती. ही स्कुटर नेहमीच्या बजाज स्कुटरपेक्षा लांब असायची. तिच्या मागचा स्टेपनीचा टायर आडवा लावलेला असायचा. आमचं कुटुंब पाच जणांचं होतं. आई वडील, दोन बहिणी आणि मी. कधीतरी रात्री जेवण करायला डोंबिवली पूर्वेतून आम्ही पाच जण ह्या स्कुटरवरून पश्चिमेला जायचो. चौघे पुढे आणि मी मागच्या आडव्या स्टेपणीवर. जास्त वजन झाल्याने एखाद्या स्पीड ब्रेकरवर ती स्कुटर घासायची. मग मी पटकन उतरून घ्यायचो आणि जरासा पुढे जाऊन अलगद बसायचो. 


इतके सगळे उद्योग आम्ही स्टेशन जवळच्या तृप्ती हॉटेलमध्ये जाण्यासाठी करायचो. तृप्तीच का, ह्याचेही कारण होते. तिथे राईस प्लेट तर चांगली मिळायचीच शिवाय त्या राईस प्लेटमध्ये रसम आणि डाळ अनलिमिटेड मिळायचे. फिश टँकच्या शेजारच्या टेबलावर आम्ही बसायचो. शक्यतो आम्ही सगळं कुटुंब मिळून 2 राईस प्लेट घ्यायचो आणि मग माझी एक आलू मटार प्लेट आणि रोटी फिक्स असायची. अजून एखादी भाजी घेतली जायची. ते मेनू कार्ड आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. राईस प्लेट अठरा रुपयांना होती, पुरी एक्सट्रा घेतल्यास वेगळे, आलू मटार आणि इतर भाज्या 14/15 रुपयांच्या रेंजमध्ये होत्या. रोटी दीड किंवा दोन रुपये. 


जेवतांना आई न चुकता राईस प्लेटमधली दह्याची वाटी मला द्यायची. स्टीलच्या वाटीतच लावलेले घट्ट गोडसर दही असायचे. पुढच्या आयुष्यात शेकडो प्रकारचे योगर्ट्स चाखले पण ती तृप्तीच्या दह्याची चव जशी लक्षात राहिली तसे काहीही लक्षात राहिले नाही. मला अजून आठवतं, आमचं बिल बरोब्बर एकशे दहा, एकशे पंधरा रुपये व्हायचं. दोन रुपये टीप दिली जायची. फुकट मिळालेली बडीशेप दोनदा तीनदा खाल्ली जायची आणि आम्ही भरल्या पोटाने लॅम्बरेटावर आरूढ व्हायचो. 


नंतर ती लॅम्बरेटा कायमची बंद पडली आणि आम्ही तृप्ती वरून मॉडर्न कॅफेला शिफ्ट झालो. मॉडर्न कॅफे आज डोंबिवलीतील मोठं हॉटेल आहे. तृप्ती आता सुरू आहे की नाही माहीत नाही. 


मॉडर्न कॅफेवरून सरळ स्टेशनच्या दिशेने पुढे गेलं की चंदू आईस्क्रीम होतं. आधी किंवा नंतर, ते पहिल्या मजल्यावर पण होतं आणि खाली पण होतं. मी त्याच्याकडे ओली भेळ आणि मँगो आईस्क्रीम खायचो. त्या भेळेवर भरपूर बारीक शेव असायची आणि एखादा काजू पेरलेला असायचा. मँगो आईस्क्रीम पॉटमध्ये बनवलेले आणि अत्यंत तलम, मऊ असायचे. जिभेवर ठेवले की विरघळत जायचे. 


कॉलेजच्या दिवसांत मला व्यायामाची आवड लागली होती. स्टेशनजवळच्या तळवलकर व्यायामशाळेत संध्याकाळी व्यायाम करून आलं, की खाली एक अंड्यावाले काका असायचे, त्यांच्याकडून मी चार गावठी बॉईल घ्यायचो. आता ते काका नसतील पण मी त्यांना कधीही विसरू शकत नाही इतके त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या लक्षात आहे. त्या गरम अंड्यांची आणि त्यावर टाकलेल्या मीठ-मिरपुडीची चव, अंडी सोलण्याची आणि कापण्याची काकांची पद्धत, पातळ सुरीला कागदाने पुसण्याची त्यांची लकब, सगळं त्या नोस्टॉजियाचा भाग आहे.


मानपाडा रोडवर कस्तुरी प्लाझा शेजारी 95/96 साली एक गाडी सुरू झाली होती. त्या काकूंकडे पाया सूप मिळायचे. मी हा पदार्थ एकदा खाल्ला आणि मला तो खूप आवडला. आठवड्यातून दोनदा तीनदा तरी मी तो खायचोच. त्या काकू आणि त्यांचा गंध लावून बसलेला नवरा मला अजून आठवतो. ती गाडी आता आहे की नाही, माहीत नाही. आज ते सूप मला आवडेल का तेही माहीत नाही. 


कधी कधी मी आणि माझा मित्र आमच्या दुकानात रात्री अभ्यासाला बसायचो. साडेदहा वाजता चालत MIDC मध्ये जायचो. तिकडे एक चायनीजची गाडी नुकतीच सुरू झाली होती. एक बंगाली होता. त्याच्याकडे आम्ही मंचाव सूप वन बाय टू घ्यायचो. त्यात भरपूर नूडल्स टाकायचो.जास्त घट्ट वाटलं तर स्वतःच त्यात जरासे पाणी ओतायचो. कोणी पाहिलं तर काय म्हणेल ह्याने फरक पडत नव्हता आणि लाजही वाटत नव्हती. ही गाडी नंतर बंद झाली. माझे गाडीवर चायनीज खाणेही बंद झाले. 


मानपाडा रोडवर कामत हॉस्पिटलच्या खाली एक सँडविचवाला असायचा. न भाजलेले, काकडी टोमॅटो, फक्त उकडला बटाटा टाकलेले सँडविच तो बनवायचा. सँडविच बनवताना त्याला बघत बसायला मला आवडायचं. ब्रेडचे काठ कापून हिरवी चटणी आणि अमूल बटर लावलेलं ते सँडविच मी अनेकदा खायचो. स्टेशनच्या शेजारी, जुन्या मैसूर मेडिकल समोर अजून एक सँडविच वाला असायचा. त्याच्याकडे गरमागरम टोस्ट सँडविच मिळायचे. अनेकदा रात्री उशिरा मी ते खायला जायचो. तिथून येतांना बंद होत आलेल्या रसाच्या दुकानात रस प्यायचो किंवा नगरपालिकेसमोर काट्यात वजन करून कुल्फी आईस्क्रीम मिळायचे ते खायचो. त्यातल्या मलई आणि चिकू आईसक्रीमची चव आजही तोंडावर आहे. परत खावं लागतंय लवकरच..


97 साली मी मुंबईत M Sc करायला जायला लागलो. त्या प्रवासात आणि युनिव्हर्सिटीच्या आसपास अजून काही तीर्थक्षेत्र सापडली. 


त्यांच्याबद्दल परत कधीतरी..


-शैलेंद्र कवाडे.

 भगवान गौतम बुद्ध हे भारतीय परंपरेतील अत्यंत महत्वाचे आणि कदाचित सर्वाधिक यशस्वी तत्त्ववेत्ते आहेत.


गौतम बुद्धांचा उदय, बुद्धमताचा विकास व प्रसार हे भारतीय सांस्कृतिक इतिहासातील एक सोन्याचे पान आहे.


सुजलाम सुफलाम भारतीय भूमी ही नेहमीच प्राचीन मानवाला आकर्षित करायची. पन्नास साठ हजार वर्षांपूर्वी एक काळ तर असा होता की जगातील बहुसंख्य मानव वंश ह्याच उपखंडात नांदत होता. शेतीचा शोध आणि स्थिर समाजाची स्थापना जगभर ज्या ज्या ठिकाणी झाली, त्यात भारतीय भूमीचे स्थान फार महत्वाचे आहे. 


आज आपल्याला सिंधू संस्कृती बऱ्यापैकी ज्ञात आहे पण खरंतर ती सरस्वतीची संस्कृती होती. सिंधू खोऱ्यातील त्या संस्कृतीची केंद्र ही बहुदा तिची पश्चिम सीमा होती. ज्या सात नद्यांचा उल्लेख सतत केला जातो त्या कदाचित सरस्वतीच्या उपनद्या होत्या. ही संस्कृती देखील एकटी नव्हती आणि अचानक निर्माण झालेली नव्हती. एका अनामिक उज्वल संस्कृतीतुन ती  उदयाला आली आणि पुढे तिने वैदिक संस्कृतीला जन्म दिला. त्या संस्कृतीला आणि लोकांना आपण सोयीसाठी वैदिक म्हणतो, मात्र तेही अनेक प्रकारची मतं, तत्व आणि आचारविचार पाळणारी लोकं असावीत. त्यांच्या आयुष्याला, इतिहासाला आणि भविष्यालाही अनेक शेडस असाव्यात. ऋग्वेदातील दाशराज्ञ युद्धाच्या वर्णनात ह्या संदर्भातील एक महत्वाचा उल्लेख सापडतो, पण त्याबद्दल नंतर कधीतरी..


तर असा हा भारत आणि भारतीय समाज सतत बदलत जाणाऱ्या आणि उन्नत होणाऱ्या विचारांचा आणि तत्वांचा प्रदेश होता व आहे. बौद्ध मत हा त्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 


गौतम बौद्ध ह्याच भूमीत जन्माला आले. परदुःखाने विव्हळ होणारे त्यांचे मन इथल्याच भूमीत घडले. त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी इथल्याच ज्ञानात आणि तत्वज्ञानात शोधली. जिथे त्यांना हे ज्ञान कमी आणि अपुरे वाटले, तिथे त्यांनी स्वतःच्या प्राज्ञेने त्यात भर घातली, ते अजून समृद्ध केले. ते सिद्धार्थाचे बुद्ध झाले आणि भारतीय मातीतले हे ज्ञान त्यांनी जगभर पसरवले. गौतम बुद्ध हे भारतीय संस्कृतीचे सगळ्यात मोठे राजदूत ठरले. 


अनेकांना वाटतं की काळाच्या ओघात बौद्ध विचार भारतातून नाहीसे झाले, मात्र हा एक भ्रम आहे. कदाचित बौद्ध मतातील काही कर्मकांडाचे आचरण भारतात थांबले असेल मात्र गौतम बुद्धांचा विचार सतत जिवंत राहिला. त्यांच्या विचारांतील दया, क्षमा, करुणा भारतीय भक्ती परंपरेत वाहत्या राहिल्या. पंचशील हा भारतीय समाजाच्या नैतिकतेचा आधार झाला. भारतीय समाज आज जो धर्म पाळतो त्याला रूढार्थाने हिंदू म्हटले जाते मात्र त्याचा पाया जसा वेदांत आणि उपनिषदांत आहे तसाच बौद्धांच्या करुणेत आणि जैनांच्या अहिंसेतही आहे. 


भारतीय समाजाने उत्तम ते सारे घेतले, त्यातही जेंव्हा दोष निर्माण झाले तेंव्हा त्या दोषांना दूर करण्यासाठी वेळोवेळी बोधिसत्व जन्माला आले.


भारतीय संस्कृती आणि भारतीय विचार अमर आहेत कारण बुद्ध आणि बोधिसत्व अमर असतात.


-शैलेंद्र कवाडे.

 एखादा लेखक जेंव्हा लिहीत जातो, तेंव्हा कुठल्याशा एका पॉईंटवर त्याला वाटायला लागतं की आपल्याला जे मांडायचं होतं ते आपलं अगोदरच बऱ्यापैकी मांडून झालेलं आहे.


खासकरून जो लेखक स्वतःच्या लिखाणातून स्वतःलाच मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्याला हे जाणवतचं. ते जाणवत नसल्यास लेखक म्हणून तो स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही असा त्याचा अर्थ होतो.


हे जाणवणे ह्यासाठीही गरजेचे आहे की माणूस म्हणून आपली वाढ संपली आहे का, आपल्या जाणिवांना नवीन धुमारे फुटणे थांबले आहे का, बाहेरचा नवीन विचार आपल्या आत पाझरणे बंद झाले आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे सापडू शकतात. माणूस म्हणून आपला एक न बदलणारा साचा तयार झालाय का आणि तो आपल्याला सांभाळायचा आहे की मोडून टाकायचा आहे की दुरुस्त करून घ्यायचा आहे, हा चॉईसही आपल्याला करता येतो.


पण ह्यासाठी आपल्याला स्वतःशी बऱ्यापैकी प्रामाणिक असणे गरजेचे असते. शब्दांची नशा अदभुत असते, अनेकदा पोकळ शब्द मादक आणि मोहकही असतात. त्या शब्दांमागे वाजणाऱ्या टाळ्या फार सुखावणाऱ्या असतात. आपला ठरलेला साचा आणि त्या साचा मधले आपण अनेकांना आवडत असतो. आपले तसेच व्यक्त होणे सगळ्यांच्या ओळखीचे आणि सवयीचे असते. 


प्रश्न वाचकांचा नसतो, लेखकाचा असतो. 


लिहीत लिहीत संपून जायचे की थांबून थांबून जगायचे हे लेखकाने ठरवायचे असते.

 काळ ही मोठी विचित्र संकल्पना आहे.


एका अर्थी काळ ही एक मिती आहे, जिला एकाच वेळी लांबी, रुंदी आणि खोली आहे, 


शिवाय ह्या तिन्हींच्या आत बाहेर होण्याचा, रेंगाळण्याचा स्वतःचा वेगही आहे.


आपल्या सोयीसाठी आपण काळ एकरेषीय मानला जे कदाचित सोयीस्कर आहे. विश्वाच्या उत्पत्तीशी सुरू झालेला, आजच्या क्षणामध्ये सरकत पुढे जाणारा आणि भविष्याच्या अंधाऱ्या गुहेत लुप्त होणारा काळ भौतिकशास्त्राच्या दृष्टीने कदाचित सलग, एकरेषीय आणि समान एककांत विभागलेलाही असेल. आपल्या घड्याळाच्या काट्यावर सरकणारा हा काळ कदाचित गणिताच्या दृष्टीने अचुकही असेल.


मात्र आपल्या स्मृतींमध्ये काळ फार वेगळा असतो.  तो एकरेषीय नाही, तो एकाच वेगाने सरकत नाही, तो सारखाच थबकत नाही, त्याचे एकक समान नाही. 


वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्याला आपले आणि आपल्या भोवतालच्या लोकांचे आयुष्य आठवत असते. मात्र ह्या आठवणींची उतरंड एकसारखी नाही, एकच नाही. वेगवेगळ्या दगडांची वेळवेगळी चळत रचावी तशी मनाच्या कप्प्यात वेगवेगळ्या घटनांची, माणसांची आणि त्यांना आपण दिलेल्या प्रतिसादाचीही वेगवेगळी थप्पी लावलेली असते. त्याभोवती आपण स्वतःला रचलेले असते.


आपल्या सगळ्यांना आयुष्यातील स्वतःपुरता पहिला क्षण, पहिली आठवण स्मरत असते. बहुतेकदा ते वयाचे तिसरे किंवा चौथे वर्ष असते. आपल्या दृष्टीने तो आपला पर्सनल बिग बँग असतो. त्यानंतरच्या घटना मात्र वेगवेगळ्या आकाशगंगेत वेगवेगळ्या घडाव्या तशा आठवत राहतात. 


माझी पहिली आठवण साधारण तिसऱ्या वर्षाची आहे. ती एक संध्याकाळ होती आणि आमच्या घरासमोरच्या डबक्यात एक पाणकोंबडी मला पहिल्यांदा दिसली होती. बहुदा तो पहिला क्षण होता जेंव्हा माझ्या नजरेचे माझ्या स्मृतींशी कनेक्शन जुळले होते.


मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो, पण तो शाळा सुटल्यावर आई भेटलेली तिथून आठवतो. वयाच्या चौथ्या वर्षी एका संध्याकाळी मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. हा माझ्या शाळेत होता. त्याचे दोन खोल्यांचे नीट आवरलेले घर, त्याची आई, त्याच्या घराच्या मागे असलेले गवताळ मैदान, त्या मैदानात धावत काहीतरी खेळणारे आम्ही दोघे मला स्पष्ट आठवतात. एखाद्या इस्टमन कलर चित्रपटाला पाहावे तसं मी हे आजही पाहू शकतो. ही आठवण मला फार अलीकडची वाटते. माझ्या कॉलेजचा पहिला दिवस मात्र मला आठवत नाही. कॉलेजमध्ये जे काही घडलं ते फार पूर्वी घडलंय असा आभास होतो.


माझ्या दोन्ही मुलांमध्ये नऊ वर्षांचे अंतर आहे, मात्र दोघांच्याही जन्माचा दिवस मला लख्ख आठवतो आणि असं वाटतं की हे साधारण मागे पुढेच घडलंय. मुलांच्या वाढीतही त्यांच्या बालपणाचा काही काळ अगदी काल पाहील्यासारखा वाटतो आणि मधली काही वर्ष सरळ स्कीप झाल्यासारखी हरवून जातात. ती घडून गेली आहेत हे माहीत असतं पण आठवत नसतात. तो काळ पावलांचा आवाज न करता निघून गेलेला असतो. त्याचे ठसेही फारच हलके उमटलेले असतात. 


काही माणसं काल भेटल्यासारखी मनात नाचत असतात, काही खरोखरच काल भेटूनही ओघळून जातात. कुणाच्या काही आठवणी इतक्या मखमली असतात की त्यांनीच टोचलेले काटे मऊ होऊन जातात. काहींच्या बाबतीत उलटही घडते, त्यांनी आपल्यावर जीव टाकलेला असतो पण  एखादा बेशिस्त चुकार क्षण आपल्या लक्षात राहून जातो, आपण त्या माणसावर अन्याय करतो.


मेंदूच्या कोणत्या भागात ह्या स्मृती कशा रचल्या जातात मला माहित नाही. त्या रचल्या जाण्याआधी कशा साठवल्या जातात तेही मला माहित नाही. मन आणि बुद्धीच्या कोणत्या अल्गोरिदमने काळाची ही शिडी रचली जाते तेही कळतं नाही. 


ओसाड माळरानावर पावसाची सर बरसून जावी. चुकार गवताने सांडवून ठेवलेल्या एखाद्या बी वर तो थेंब मुरून जावा आणि मग त्यातून हिरवा कोंब उगवून यावा, त्या हिरव्या कोंबात त्या माळरानाची वैराण धग असावी, पावसाच्या थेंबाची ओल असावी आणि गवताच्या बिजाची जगण्याची आसही असावी, अगदी तसेच आपण जगलेल्या हजारो क्षणांतुन आपल्या आत एखादाच क्षण उगवून येतो, कधी जरासाच वाढतो कधी आपल्याला पूर्ण व्यापून टाकतो.


त्याला ना क्रम असतो ना उद्देश.. 


तो फक्त असतो आणि राहतो..


-शैलेंद्र कवाडे.

 आज जागतिक पर्यावरण दिन..


आज मला आपल्या संस्कृतीत घडलेल्या सगळ्यात मोठ्या पर्यावरणीय अपघाताची आठवण आली, त्या अपघाताची गोष्ट परत आठवली.


ही एका सुकलेल्या आणि तरीही स्मृतीत जिवंत राहिलेल्या नदीची गोष्ट आहे, पण फक्त नदीची नाही, ही एका संस्कृतीच्या हरवून परत सापडत जाण्याची गोष्ट आहे. वरवर लुप्त होऊन आतून वाहत राहण्याची गोष्ट आहे. 


ही गोष्ट आहे सरस्वतीची.. ही गोष्ट आहे तिच्या काठावर फुललेल्या,बहरलेल्या आपल्या संस्कृतीची. ही गोष्ट आहे आपला इतिहास, आपला भूगोल आणि आपले पर्यावरण हजारो वर्ष मौखिक परंपरेतून जतन करणाऱ्या आपल्या पूर्वजांची..


आपल्या संस्कृतीचा ज्ञात असलेला सगळ्यात पहिला शब्द म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद सरस्वतीला नदीतमा म्हणतो. ऋग्वेद सरस्वतीला सप्तसिंधूची जननी मानतो. एखादा खंड सोडल्यास ऋग्वेदाच्या प्रत्येक खंडात सरस्वतीचा उल्लेख आहे. नुसती ही नदी कशी होती तेच ऋग्वेद सांगत नाही तर तिच्या काठावरचा प्रदेश कसा होता तेही ऋग्वेद वर्णन करून सांगतो. संपूर्ण ऋग्वेदात फक्त सरस्वतीसाठी पूर्ण श्लोक रचले गेले आहेत, सरस्वतीचा महिमा वारंवार गायला गेला आहे. हे भाग्य ना गंगेला आहे ना सिंधुला..


कारण ह्या संस्कृतीचा जन्मच सरस्वतीच्या पोटात झाला होता, तिचे पोषण सरस्वतीच्या काठावर झाले होते. दाशरज्ञ युद्धासारख्या ऐतिहासिक घटना तिच्या खोऱ्यात घडल्या होत्या. आज आपण जिला सिंधू संस्कृती म्हणतो, ती सरस्वती संस्कृती होती, सिंधू नदीच्या काठी आज सापडलेली शहरे हा सरस्वतीच्या संस्कृतीचा विस्तार होता. पश्चिमेला सिंधू ते पूर्वेला गंगेपर्यंत गवसत जाणारा प्राचीन नागरी अवशेषांचा हा पसारा ज्याला आपण पूर्वी वैदिक संस्कृती म्हणायचो, त्याचा पूर्ण पट होता.


सरस्वती कुठे आहे हे नदीसुक्तात ऋग्वेदाने स्पष्ट सांगितले आहे, 


इमं में गंगे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमै सचता परूष्ण्या।

असिवक्न्या मरूद्वृधे वितस्तयार्जीकीये श्रणुह्या सुषोमया।।


ह्या नद्यांचे वर्णन पूर्वेकडून पश्चिमेकडे केले आहे, पहिली गंगा, मग यमुना, मग सरस्वती, त्यानंतर सतलज, मग पुढच्या..


सरस्वतीचे उल्लेख फक्त ऋग्वेदात नाहीत, ते रामायणात आहेत, महाभारतात आहेत आणि नंतर रचल्या गेलेल्या ब्राह्मणांत देखील आहेत. ऋग्वेद सरस्वतीचा उल्लेख सुरवातीला नदीतमा म्हणून करतो, पण दहाव्या खंडात नदीसुक्तातच ऋग्वेद म्हणतो की सिंधू ही सगळ्यात मोठी नदी आहे. रामायण म्हणते की सरस्वती हळूहळू सुकते आहे, लहान होते आहे. महाभारत म्हणते सरस्वती कधीतरीच वाहते, कधी कधी सुकून जाते. सरस्वती जिथे लुप्त होते त्या जागेला व्यास "विनशन" असे म्हणतात. नंतर रचल्या गेलेल्या ब्राह्मणांनी तर सरस्वतीला सरळ विद्येची देवता केले, वेदवती म्हंटले, जिवंत संस्कृतीच्या सुकलेल्या जन्मदात्रीला त्यांनी देवीचा मान देऊन जिवंत ठेवले.


हा सगळा आपल्या भूगोलाचा इतिहास आहे, जो आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलाय.


काय झालं होतं तेंव्हा?


विष्णू श्रीधर वाकणकर नावाचे नावाचे फार श्रेष्ठ पुरातत्व संशोधक होते, ज्यांनी मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहांचा शोध लावला. त्यांनीच लावलेला अजून एक शोध तुलनेने कमी प्रसिद्ध आहे, तो आहे सुकलेल्या सरस्वतीचा.. सुकलेल्या सरस्वतीच्या शोधात वाकणकर सरांनी तिच्या मुखापासून ते उगमापर्यंतचा भाग पिंजून काढला. 


आज ज्याला आपण कच्छचे रण म्हणतो तो एकेकाळी सरस्वती समुद्राला मिळण्याचा त्रिभुज प्रदेश होता, जसे आज सुंदरबन आहे तसा. म्हणूनच धोलवीरासारख्या नागरी वस्त्या तिथे होत्या. आज ज्याला आपण राजपुताना म्हणतो तो सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक भाग होता. आजचा हरियाणा आणि कुरुक्षेत्राच्या आसपासचा भाग हा सरस्वतीच्या पाण्यावर पोसलेला अत्यंत संपन्न प्रदेश होता. आज जिला घग्गर म्हणून ओळखले जाते ती सरस्वतीची एक उपनदी होती. यमुना आणि सतलज ह्या दोन्ही नद्या आपले पाणी सरस्वतीच्या प्रवाहात ओतत होत्या. सरस्वती लाखो वर्ष अशीच वाहत होती. आपल्या दोन्ही काठांवर संस्कृती फुलवत होती.


पण नंतर काहीतरी झालं, कोणतीतरी भौगोलिक घटना घडली आणि यमुनेचा प्रवाह पूर्वेकडे वळला. परत काहीतरी झालं आणि सतलजचा प्रवाह पश्चिमेला सरकला. यमुना गंगेला मिळाली आणि सतलज सिंधुला मिळाली. सरस्वती सुकत गेली, कोरडी पडत गेली. सरस्वतीच्या काठावर नांदणारी काही लोकं गंगेकडे गेली, काही सिंधुकडे गेली. ह्यानंतर हजारो वर्षांनी लिहिलेल्या बौधायन श्रौत सूत्रात ह्या विस्थापणाचा स्पष्ट उल्लेख आढळतो.


सरस्वती आटली. तिच्या काठचा सुपीक प्रदेश वाळवंटात बदलला. ह्यात तिच्या काठी राहणाऱ्या लोकांचा काहीच दोष नव्हता. ते लोक, त्या संस्कृती पांगल्या. आईच्या कुशीतुन मावशीच्या पदराखाली जावं तशा गंगा आणि सिंधूच्या आश्रयाला गेल्या. मग नर्मदा आणि गोदावरीच्या, कावेरी आणि तुंगभद्रेच्या काठावरही फुलल्या, मोठ्या झाल्या. स्वतःला कधी भारत कधी हिंदुस्थान म्हणवून घेऊ लागल्या.


पण त्या संस्कृती, ती लोकं सरस्वतीला विसरली नाहीत. सरस्वती त्यांच्या ज्ञानाची, कलेची, विद्येची देवता झाली, सरस्वतीच्या पाण्याचा नाद विणेच्या आवाजात निनादत राहिला. कधी शब्दांच्या, कधी शाईच्या माध्यमातून वाहत राहिला.


सुकलेली सरस्वती भारतीयांच्या रक्तातून जिवंत राहिली..


-शैलेंद्र कवाडे.

 #मला_भेटलेली_माणसं


रवी


टन टन टन्नन टटन्नन..


एका विशिष्ट नादात उलथण्याने तव्यावर ठोकल्याचा आवाज यायचा.. 


संध्याकाळचे साधारण साडेपाच सहा वाजत असायचे. सूर्य मावळतीला कललेला असायचा. दिवस संपल्याची जाणीव करून देणारा पिवळा प्रकाश सोनेरी झालर लपवत पसरायचा. कामावर गेलेल्या लोकांची घरी परतायची वेळ झालेली असायची.


आणि आपली डोश्याची गाडी घेऊन रवी आलेला असायचा.


तामिळनाडूच्या कुठल्यातरी भागातून आलेले राम आणि लक्ष्मण नावाचे दोघे भाऊ होते. राम गोरा, मध्यम उंचीचा, जरासा गरीब चेहऱ्याचा तर लक्ष्मण उंच, सावळा, उग्र करारी चेहरा असलेला माणूस होता. आमच्या भागात इडली, मेदूवडे आणि डोसे हे पदार्थ ह्या दोघांनी घरोघर नेले. 


नंतर नंतर आम्ही राहायचो तो भाग त्यांनी गावाहून आलेल्या आपल्या भाच्याच्या हवाली केला, त्याचं नाव रवी. रवी सडपातळ, सावळ्या रंगाचा, तरतरीत चेहऱ्याचा बोलका मुलगा होता. जेंव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा त्याच वय सोळा सतरा वर्षांचं असेल. 


सकाळी साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान रवीच्या आवाजात "डल्लीयी..ss" अशी खास हाक ऐकू यायची. एका मोठ्या पिशवीत दोन डब्बे असायचे, एकात इडली-वडे आणि दुसऱ्यात चटणी. ती पिशवी खांद्यावर घेऊन रवी फिरायचा. इतरही काही इडलीवाले होते पण ते पोंगे वाजवत फिरायचे. रवीकडे पोंगा नसायचा. आम्ही रवीचा आवाज येण्याची वाट पाहायचो ह्याची दोन कारणं होती. पहिलं म्हणजे इडली किंवा वड्यांबरोबर जी चटणी असायची, ती रवीकडची घट्ट असायची, पोंगेवाल्या अण्णाच्या पाणीदार चटणीला चव नसायची. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रवी इडली किंवा वडा एक्सट्रा द्यायचा. 


एक रुपयाला चार इडल्या होत्या, मेंदूवडे रुपयाचे तीन मिळायचे. ह्या इडल्या किंवा वडे आज हॉटेलमध्ये मिळतात त्या साईझचे अजिबातच नसायचे. मेदूवडे तर आपण पितृपक्षात मुगाचे वडे  करतो त्याच साईझचे असायचे. चार रुपयाची इडली आणि एक रुपयांचे वडे घेतले की रवी एखादा वडा आणि इडली एक्स्ट्रा द्यायचा, वाढीव चटणी आम्ही हक्काने मागून घ्यायचो. ती चटणी जास्त मिळावी म्हणून इडली घेतानाच मोठी वाटी घेऊन जायचो. रवीचा व्यवहार आणि आमची हाव एकमेकांशी जमवून घ्यायचे. 


सगळ्या बिल्डिंग फारतर दुमजली होत्या. एखाद्याने अगदी एक रुपयाची इडली घ्यायला हाक मारली तरी रवीला ती जड पिशवी घेऊन ते दोन चार जिने चढावे लागायचे. त्या काळात हे जाणवलं नाही पण आज एक रुपयाची वस्तू विकायला कोणीतरी इतके कष्ट घ्यायचं हे अमानुष वाटतं. तेंव्हा रुपया कितीही मोठा असला तरी ही बोच कमी होतं नाही. बरं, सकाळी हे सगळं उरकलं म्हणजे रवीचं काम संपणार नसायचं, संध्याकाळी त्याला डोश्याची गाडी आणायची असायची.


चार चाकी हातगाडी, त्याला तीन बाजूनी उंच शेल्फ करून वर अल्युमिनियमचा पत्रा ठोकलेला, त्या शेल्फच्या आत दोन तीन डबे असायचे. बटाट्याच्या भाजीचा, चटणीचा, डोश्याच्या पिठाचा, इडलीचा.. कापलेल्या कागदांची चळत बाजूलाच लावलेली असायची. समोर स्टोव्ह असायचा, त्याची पीन आणि काडेपेटी असायची. तेलाचा छोटा डबा असायचा. त्यात उलथनी टाकलेली असायची. एक रॉकेलचा लहान कॅन गाडीच्या तळाशी अडकलेला असायचा. अशी ही सजलेली हातगाडी घेऊन रवी एखाद्या बिल्डींगच्या खाली जराशी मोकळी जागा हेरून उभा राहायचा. 


आधी स्टोव्ह पेटवला जायचा, मग त्यावर तवा ठेवला जायचा. तव्याला जरा ताव आला की रवी उलथण्याने त्यावर विशिष्ट लयीत आवाज काढायचा. हे आजूबाजूच्या सगळ्या जनतेला डोसे खाण्याचे निमंत्रण असायचे. मग एकेक जण त्याच्या गाडीवर हजर व्हायचा. रवीने कांदा अर्धा कापलेला असायचा. एका वाटीत अर्धे तेल, अर्धे पाणी घेतले जायचे. तो कापलेला कांदा त्या तेलपाण्यात बुडवून गरम तव्यावर फिरवला जायचा. चर्रर्र असा आवाज यायचा. मग वाटीत डोश्याचे पीठ घेऊन त्याच वाटीने मधून कडेपर्यंत गोल पसरवत नेले जायचे. उलथण्याने त्यावर तेल शिंपडले जायचे आणि जरासा कडक झाला की त्याच उलथनीने त्यावर भाजी पसरवली जायची. भरपूर उभा कांदा घातलेल्या त्या भाजीची चव आजही माझ्या जिभेवर आहे. डोश्याची घडी तव्यावरच घातली जायची आणि तो चपटी पुंगळी करून कागदात गुंडाळला जायचा. मसाला डोसा दोन रुपये आणि साधा दीड रुपया.. बहुतेक लोक मसाला डोसा घ्यायचे. पन्नास पैशात पोटाला जास्तीचा आधार शोधायचे. 


रवीशी आमचा संबंध असा उभ्याउभ्या यायचा. त्याची तामिळच्या काठाने चालणारी आणि आमची मराठीच्या काठीने अर्धमेली केलेली हिंदी एकमेकींशी गरजेपुरत्याच भेटायच्या. इडली डोश्याच्या पांढऱ्या पिठापलिकडचा सावळा रवी आम्हांला फार जाणवायचा नाही. पण कुठेतरी मनातून माझ्यापेक्षा पाच-सात वर्षानीच मोठ्या असलेल्या ह्या कष्टाळू मुलाबद्दल आदर वाटायचा, आपुलकी वाटायची. आपणही असेच कष्ट केले की आयुष्य पुढे सरकत राहील असं वाटायचं. सगळं जरासं सोपं वाटायचं.


दिवस पुढे सरकत होते. नव्वदीचे दशक सुरू झाले होते. देश बदलत होता, माझं वय आणि नजर बदलत होती. आसपासचा समाज बदलत होता. इडली आणि डोश्याच्या किमती वाढत होत्या पण रवीच्या गाडीवरची गर्दीही वाढत होती. लोकांकडे पैसा येत होता, लोकांच्या हातुन तो रवीकडेही जात होता. मी कॉलेज करून दुकान सांभाळत होतो. जरासे कष्ट मलाही पडत होते, माझ्याही खिशात पैसा खुळखुळत होता. 


एका पावसाळी रात्री उशिरा मी कुठूनतरी परत येत होतो. दिव्यांचा अंधुक उजेड होता. रस्त्याच्या कडेने रवी गाडी ढकलत परत जात होता. मात्र तो गाडी ढकलतोय की गाडीचा आधार घेऊन चालतोय ते कळत नव्हते. मी ज्या रवीला ओळखत होतो तो हा नव्हता. त्याच्या हालचालीत लालित्य नव्हते. त्याच्या डोळ्यात जीव नव्हता. हा रवी नव्हता, ही दारू होती. रवीने मला ओळख दिली नाही, मीही त्याला ओळख दाखवली नाही. कष्ट विसरण्याचा हा सोपा मार्ग मला तेंव्हाही मान्य नव्हता. 


मी माझ्या मार्गावर चालत राहिलो, रवी त्याच्या मार्गाने परत येत राहिला. हळूहळू त्याचे शरीर सुटले, आम्हांला माहीत असलेला सावळा तरतरीत मुलगा इतिहास झाला. त्याची सकाळची फेरी कधीच बंद झाली होती. चेहरा सुजलेला, आजारी वाटणारा रवी नावाचा माणूस गाडी घेऊन यायचा, पैसे कमवायचा आणि रात्री जी घरी परतायची ती फक्त दारू असायची. 


मी कधी रवीला समजावले नाही. माझे वयही नव्हते आणि माझ्यात ती हिंमतदेखील नव्हती. मात्र त्याला अनेकांनी समजावले असेल, त्याच्या घरच्यांनी, राम-लक्ष्मणने, कदाचित त्याच्या एखाद्या ग्राहकानेही.. पण रवीने ऐकले नसावे, कारण कष्टकरी माणसाला बंड करण्याचा, मनस्वी वागण्याचा, जगाला झुगारुन देण्याचा अधिकार आहे असे त्याला वाटले असावे. रवी त्याचे बंड जगत राहिला. वैफल्याच्या गर्तेत रुतत राहिला.


रवीचे पुढे काय झाले मला माहित नाही. नंतर तो दिसणे बंद झाला. कोणी म्हणाले गावाला परत गेला, कोणी सांगितले वारला. खरं काय ते मला माहित नाही. मात्र मी रवीला कधीच विसरणार नाही. ज्या माणसाचे कष्ट बघून मला कधीकाळी एक मार्ग दिसला होता त्याचा असा अंत मला त्या काळात खूप शिकवून गेला. खिशातला पैसा का आणि कुठे वापरायचा, श्रमलेलं मन आणि शरीर कसं शांत करायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं मी हळूहळू शिकत होतो. स्वतःला रचत होतो. जिथे रवी कोसळला तिथे आपण जायचं नाही हे बजावत होतो. सुदैवाने मला ते जमलं. 


माझ्या वयाच्या विशीत डोळ्यासमोरून ओघळून गेलेलं रवीच आयुष्य आज मधूनच आठवतं. तव्यावर पाणी पडल्यावर व्हायचं तसं चर्रर्र होतं. आपण त्या वेळी रवीशी बोललो असतो तर फरक पडला असता का हे विचारत राहतं, मी स्वतःशीच ठामपणे मान हलवतो. नकार देतो.


बहुदा माझा विश्वास आणि निग्रह फक्त स्वतःपुरता आहे..


-शैलेंद्र कवाडे.

 भैरप्पांची पर्व ही कादंबरी वाचतांना मोहून जायला होतं.


महाभारत ह्या ऐतिहासिक ग्रंथावर काळाने चढवलेला वर्ख दूर करून, कुरु वंशाचा इतिहास त्यांनी कादंबरीच्या स्वरूपात मांडला. मात्र सत्याच्या जवळ जाणाऱ्या ह्या कादंबरीतही त्या काळात मान्य असलेली अनेक गृहीतके त्यांनी सांभाळली होती. त्यातलं सगळ्यात मोठं गृहीतक होतं, आर्य आणि वैदिक संस्कृती बाहेरून आलेली आहे हे..


सत्तरच्या दशकाच्या शेवटी भैरप्पानी ही कादंबरी लिहिली. त्या आधी कित्येक वर्ष ते ह्या विषयावर संशोधन करत होते. त्याच्या जरा आधी, पन्नाशीच्या दशकात पुरातत्ववेत्ते बी बी लाल महाभारतात वर्णन केलेल्या ठिकाणांचे उत्खनन करत होते. तिथे सापडलेल्या वस्तूंवरून महाभारतातील घटनांचे वय ठरवत होते. त्यानंतर काही काळाने, भूगोलात हरवलेल्या पण इतिहासात आणि स्मृतीत जिवंत राहिलेल्या सरस्वती नदीचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. जसजशी सॅटेलाईट इमेजरी जास्त प्रगत होत गेली तसतशी सरस्वती आणि सरस्वतीच्या काठावर फुललेली संस्कृती नव्याने सापडत गेली.


त्या नंतरच्या काळात अनेक पुरातत्व विद्वानांनी ऋग्वेदाचा आणि त्यातील भौगोलिक व ऐतिहासिक वर्णनांचा नव्याने अभ्यास सुरू केला. हे करत असताना एक गंमत लक्षात येत गेली, ती म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृती आणि ऋग्वेदाचा काळ एकमेकांत सरमिसळ होतोय. थोडक्यात सिंधू सरस्वती संस्कृती हीच तथाकथित आर्य किंवा वैदिक संस्कृती होती. ह्या गोष्टींची साक्ष प्राचीन भारतीय साहित्यात तर आहेच पण जमिनीत दडून असलेल्या प्राचीन खापरांच्या तुकड्यांमध्ये, घोड्यांच्या, उंटांच्या आणि बैलांच्या लहान लहान खेळण्यांमध्येही आहे. 


भारतातील अनेक गोष्टींसारखाच आपल्या भौगोलिक व तात्विक इतिहासाचा शोधही ब्रिटिशांनीच लावला. भारतीय वाङ्मयाचा परिचय जसजसा त्यांना होत गेला तसे त्यांच्या लक्षात येत गेले की आज विपन्नावस्थेत असलेल्या ह्या लोकांची संस्कृती प्राचीन ग्रीक संस्कृतीपेक्षाही जास्त उन्नत, जास्त मानवीय होती. त्यांना हेही लक्षात आले की भाषेचा आणि ज्ञानाचा एक समान धागा आहे, जो पूर्वेला भारतात उगम पावतो आणि थेट ग्रीसपर्यंत जातो. ग्रीक संस्कृतीला सगळ्या युरोपियन संस्कृतीचे जन्मस्थळ समजले जाते आणि म्हणूनच भारताचे ग्रीसशी असलेले हे नाते ब्रिटिशांना थक्क करून गेले. त्यांची पहिली प्रतिक्रिया नकाराची होती.


आर्यांच्या आक्रमणाचा, आगमनाचा सिद्धांत ह्याच नकारातून रचला गेला. तो इतका पक्का मांडला गेला की लोकमान्य टिळकांसारख्या स्वदेशीच्या कट्टर पुरस्कर्त्यांने वेदांचे जन्मस्थान आर्क्टिक प्रदेशात नेऊन ठेवले. भारतातच सोडा, पण भारताबाहेर घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांचे क्रम बदलले गेले. थोडक्यात वेदांमधील ऐतिहासिक वर्णन, उपनिषदांमधील तत्वज्ञान आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सापडलेल्या सिंधू संस्कृतीचा संबंध तोडला गेला.


आता हळूहळू लक्षात येतेय की ऋग्वेद इथेच सरस्वतीच्या खोऱ्यात रचला गेला, सरस्वती आटत गेली तसे तिच्या काठी राहणारे लोक पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे सरकत गेले. मोहंजदरो आणि हडप्पा त्या पश्चिमेकडे सरकलेल्या लोकांनी वसवले, रामायण आणि महाभारत काळात हेच लोक हळूहळू गंगा यमुनेच्या खोऱ्यात सरकत गेले. भगीरथ हा कदाचित गंगेच्या खोऱ्यात तिचा उगम शोधत गेलेला पहिला राजा असावा. 


थोडक्यात आज भैरप्पा तरुण असते तर त्यांनी पर्व फार वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. तिच्यात सिनौलीमध्ये सापडलेल्या रथांचे उल्लेख असते, सिंधू संस्कृतीत सापडलेल्या दाढीवाल्या पुजाऱ्याची गोष्ट असती, त्याही काळात प्रचलित असलेल्या नमस्कार मुद्रेचे आणि सागरी व्यापाराचे प्रकरण असते. रंगवलेल्या मातीच्या खापरांचे आणि मण्यांच्या कारखान्याचे वर्णन असते. पक्क्या विटांचे बांधकाम सोडून लाकडाचे, लाक्षागृह वाटावे असे बांधकाम करण्याचे कारणही त्यांनी लिहिले असते.


जमिनीत, ग्रंथांत, भूगोलात आणि इतिहासात दडलेले सत्य हळूहळू बाहेर येत जाईल. महाभारत नावाच्या इतिहासाची आपल्याला नवीन ओळखही होईल, पण त्याच बरोबर त्या इतिहासाला तर्काच्या धाग्यात ओवून एखादी जिवंत रसरशीत गोष्टही सांगितली जाईल.


फक्त आपण ती मोकळ्या मनाने ऐकली पाहिजे आणि त्यासाठी सांगणाराही भैरप्पांच्या ताकदीचा असला पाहिजे..


-शैलेंद्र कवाडे.

 गजानन भास्कर मेहंदळे हे कदाचित आजच्या घडीला शिवकाळावर सर्वाधिक अधिकार असलेले इतिहास अभ्यासक आहेत.


इथे इतिहास अभ्यासक हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतोय. जो पुराव्यानिशी बोलतो, पुराव्याशिवाय बोलायचे टाळतो, भावना, पूर्वग्रह व कल ह्यांची इतिहासात भेसळ करत नाही तो इतिहास अभ्यासक.


शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने परवा त्यांनी केलेल्या ह्या भाषणातील एक वाक्य फार महत्त्वाचं आहे, ते इतिहास अभ्यासकांच्या सत्य मांडताना आवश्यक असलेल्या कोरडेपणाबद्दल आहे. हा कोरडेपणा गरजेचा आहे कारण इतिहास सांगताना एकदा भावनांचा ओलावा, अभिनिवेश, अभिमान आला की सत्य मागच्या दरवाजाने पसार होते. 


इतिहास ही मूलतः घटनांची जंत्री असते. त्या घटनांच्या आसपासचा कार्यकारणभाव तपासताना, त्या घटनांचा कर्ता काय म्हणतो हा पुरावा सगळ्यात महत्वाचा समजला जातो. जर ती गोष्ट समकालीन कागदपत्रात लिहिलेली असेल तर त्या घटनेबद्दल आज आपल्याला काय वाटते ह्याचे महत्व शून्य होते.


जे झाले ते असे झाले आणि ह्या दिवशी झाले, त्याबद्दल हे लिहिलेले आहे इथवरच इतिहास संपतो.


बाकीचे सगळे राजकारण असते. इतिहासाचे अश्व आपल्या टांग्याला जोडण्याची सवय भारतीय उपखंडात सगळ्याच राजकारण्यांना आहे. कदाचित ह्याचे मूळ स्वतःच्या पूर्वजांना सतत सभ्य, पापभिरू आणि श्रेष्ठ समजण्यात असावं.


खरंतर इतिहासात जे काही घडलं, आपल्या पूर्वजांनी जे काही बरं वाईट केलं, त्याचं ओझं आपल्या शिरावर घ्यायची आपल्याला गरज नसते.  एकदा तुम्हीं स्वतःच्या पूर्वजांच्या कृत्यांचा अनाठायी अभिमान मिरवायला सुरवात केली की त्यांच्या पापाचं ओझंही आपसूक तुमच्याच शिरावर येतं. इतिहासाचा डोळस अभ्यास करताना असे अभिमान आणि न्यूनगंड संपूर्णपणे टाळले पाहिजेत. 


मात्र त्याचबरोबर इतिहासातील प्रवाहांचा डोळस मागोवाही घेतला पाहिजे. हे करताना आपण अशा एखाद्या प्रवाहाच्या भोवऱ्यात तर सापडत नाही ना तेही पाहिले पाहिजे. इतिहास हा व्यक्तींचा अभ्यास नसतोच, तो खरंतर प्रवाहांचा अभ्यास असतो. आपल्याला माहीत असलेली ऐतिहासिक व्यक्ती त्या प्रवाहाची प्रतिनिधी असते. कदाचित ती त्या प्रवाहातील सर्वाधिक यशस्वी व्यक्ती असते. शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यांनी ज्या प्रवाहाचे नैतृत्व केले, ज्या महाराष्ट्रधर्माचे पालन व संवर्धन केले त्याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. असे काय घडले की ज्यामुळे भारतीय इतिहासाला शिवाजी महाराज कलाटणी देऊ शकले, मराठी समाजात त्या काळी असा कोणता प्रवाह होता की संपुर्ण भारत खंडाला जे जमले नाही ते महाराष्ट्राला जमले? शिवचरित्राचा अभ्यास हा खऱ्या अर्थाने त्या प्रवाहाचा अभ्यास आहे. बाकी घटनांचे तपशील महत्वाचे नाहीत. स्वराज्याची व्हिजन व मिशन स्टेटमेंट महत्वाची आहे.


आणि ती जेंव्हा स्वतः महाराजांनी, संभाजी राजांनी, राजराम महाराजांनी सांगितलेली असेल तेंव्हा आज त्याबद्दल अनुमान मांडण्यात फारसा अर्थ नाही.जे होते ते स्वीकारले पाहिजे.


पण त्याच बरोबर, तो इतिहास घडून गेलेला आहे हेही ध्यानात ठेवले पाहिजे. इतिहासातील घटनांचे सूड आजच्या काळात उगवणे हा मूर्खपणा आहे. इतिहासातील प्रवाहांचा अभ्यास करताना आपण प्रवाहपतित होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. 


तुमचा आणि माझा इतिहास वेगळा नसतो. उगमापासून वाहत आलेले नदीचे पाणी एकदा एकत्र आले की ते झऱ्याचे आहे की ओहळाचे आहे हे सांगता येतं नाही. ते मिसळून जाते. इतिहासात आपली अभिमानस्थळ शोधणे, ती निर्माण करणे, त्याभोवती अहंकाराचे किल्ले बांधणे, कधी न्यूनगंडाच्या, अन्यायाच्या दऱ्या शोधणे हा व्यर्थ खटाटोप असतो. इतिहासाकडे साक्षीभावाने पाहिल्यास वर्तमान सुकर होतो.


शिवाजी महाराजांवर मालकीहक्क सांगतांना, स्वतःच्या क्षुद्र स्वार्थांचे मुलामे त्यांच्या व्यक्तिमत्वाला देताना आपण त्यांच्या इतिहासावर तर अन्याय करत असतोच,


पण त्याहून जास्त अन्याय स्वतःच्या वर्तमानावर आणि भविष्यावर करत असतो.


ते टाळले पाहिजे.


- शैलेंद्र कवाडे