My life
बुधवार, ८ जानेवारी, २०२५
जंगलात पाणवठे असतात,
ते कुणाची तहान भागवतात, कुणाची भूक भागवतात,
तहानलेली असोशी प्रत्येकाला असतेच, कुणाला पाणवठयातल्या पाण्याची, कुणाला रक्ताची,
म्हणूनच पाणवठा टाळता येतं नाही, पाणवठा जगावाच लागतो, बघावाच लागतो,
जगून किंवा मरून..
आयुष्यातही पाणवठे असतात..
काही नशिबात असलेले, काही मानसिक ओढीचे, काही ओढाळ भावनांचे, काही असह्य कर्तव्याचे,
काही असेच उगाचच.. झिंग देणारे..
ते पाणवठेही टाळता येत नाहीत, टाळावेसे वाटत नाहीत, टाळायला जमत नाहीत,
जगावेच लागतात,
डोके खाली घालुन तहान भागवून घेतांना, मानेत कराल सुळे खुपसले जातील, ही भीतीही जगून घ्यावी लागते, अनुभवून पहावी लागते,
कितीही टाळावीशी वाटली तरी..
मृगजळ समजून पाणवठा दूर करता येत नाही, सरोवर समजून पाणवठ्यात डुंबता येत नाही,
हळूहळू ही झिंग आवडायला लागते, हळूहळू भीती सवयीची होते, हळूहळू ह्या आव्हानांचीच झिंग येते,
गरुडाचे पंख, हत्तीची ताकद आणि गव्याची धमक येते, जगण्याची रंगत वाढते,
सगळं आयुष्य ह्या आव्हानांच्या कडेकडेन जगलं जातं, समृद्ध होतं,
कधीकधी आपणच कुणासाठी पाणवठा होतो..
रक्ताची तहान नसलेला, पाण्याचा अभाव नसलेला..
पण असा किंवा तसाही, पाणवठा टाळता येत नाही,
तो जगावाच लागतो..
-शैलेंद्र
बंद पडलेल्या दुकानाच्या पायरीवर,भल्या सकाळी एक जस्ती चष्मा बसलेला असतो,
पेपरवर घेऊन काहीबाही खात असतो,
त्याच पेपरवर काही अक्षरं जुळवत असतो, वाचत असतो. थकलेल्या डोळ्याने, धुरकटलेल्या काचेने माहीत नाही काय, काय जाणून घेत असतो.
त्याच्या चिंध्या झालेल्या स्वेटरमधून कोरडा हिवाळा त्याला टोचत असतो, त्याच्या उघड्या पायांच्या बोटाशी चावत असतो, थांबून थांबून टोचत असतो.
गरम चहा पिऊन, अंगात मुद्दाम पातळसर शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालून आपण सहज सायकल चालवायला बाहेर पडतो तेंव्हा आपल्याला नेमका तो जस्ती चष्मा दिसतो. थंडी मुरवत निघालेल्या आपल्या शरीराला काहीतरी टोचतं, मनात काहीतरी हलतं.
थंडी डोळ्यात उतरते आणि उष्ण उष्ण अश्रू ओघळतो..
उगाचच आणि आपोआपच..
नाणे-घाट..
दोन खोल्यांच्या घराला मधलं दार होतं. त्या मधल्या दाराला एक पांढऱ्या हिरव्या रंगाचं तोरण होतं. पांढऱ्या आणि हिरव्या धाग्याने विणलेलं.. पण त्यात एक गंमत होती.
जुन्या तांब्याचे एक पैशाचे म्हणजे "पै" चे नाणे घेऊन त्याच्या भोवती, त्याच्या मधल्या छिद्रातून धागे फिरवून हे तोरण विणले होते. कधी कधी लहर आली की स्टूलवर चढून आम्ही ते धागे बाजूला करायचो आणि त्या पैच्या नाण्याला हात लावायचो. हिरवट पडत चाललेल्या तांब्याचा, चलनातून बाद झालेल्या त्या नाण्याचा तो थंड स्पर्श अजूनही बोटांच्या टोकावर आहे.
हळूहळू ते तोरण विरत गेलं, नाणे सुट्टे होत गेले आणि कधीतरी एकत्र करून कुठेतरी ठेवून दिले गेले. त्या दिवसातल्या बऱ्याचश्या गोष्टींसारखीच किंवा त्या दिवसांसारखीच ती नाणी हरवून गेली.. न वापरताच खर्च झाली.
त्या एका पैच्या, त्या नाण्यांच्या आठवणी तितक्याच.. हरवून जाण्यापुरत्याच..
पण वापरलेल्या नाण्यांच्या मात्र खूप आठवणी आहेत.
त्यातही अगदी लहानपणीच दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यामुळे प्रत्येक नाण्याची खरी व्हॅल्यू, त्याचं वजन, त्याचा स्पर्श हे सगळं सगळं मला अक्षरशः तळहातावर, बोटांच्या टोकावर असल्यासारखं आठवतं.
सगळ्यात छोटं म्हणजे पाच पैशाचं नाणं. ह्या पाच पैशात मिळणाऱ्या ठळक गोष्टी अजून आठवतात. नारंगी रंगांची, संत्र्याच्या फोडीच्या आकाराची लिम्लेटची गोळी, पाच पैशाला एक. नंतर कुत्र्या मांजराच्या आकाराची बिस्किटं असायची ती पाच पैशाला दोन मिळायची. सुरवातीला एक खूप लहान आकाराची पतंग पण पाच पैशाला मिळायची. ही पाच पैशाची पतंग आणि पाच पैशाचा वीस वित साखळी छाप दोरा ही खरेदी व्हायची. हस्तकलेला वापरण्याचा घोटीव कागद नावाचा रंगीत कागद असायचा, तो पाच पैशाला अर्धा मिळायचा. पाटीवरची पेन्सिल पाच पैशाला विकली जायची. साबळे वाघिरे आणि कंपनीची संभाजी विडी पाच पैशाला एक विकायचो. बाकी फार काही पाच पैशात यायचं नाही..
दिवस सरकले तसे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपोआप दहा पैशाच्या झाल्या आणि आधीच दहा पैशाला मिळणाऱ्या गोष्टींमध्ये ह्याही जमा झाल्या. काळ्या आणि पांढऱ्या रेषा असलेली गोल छोटी गोळी दहा पैशाला मिळायची, ती खाल्ली की घशात थंड वाटायचं. तिला आम्ही अस्मानताराची गोळी म्हणायचो. वरून साखर लावलेले चपटे बिस्कीट दहा पैशाला मिळायचे. गाडीवर दहा पैशात एक उभी पुडी भरून चणे मिळायचे. दहा पैशात छापा काटा खेळता यायचा आणि नशीब अजमावून बघता यायचे. रुपये का दसवा भाग असं ठळकपणे लिहिलेलं दहा पैशाचं नाणं रोजच्या जगण्याचा भाग होतं.
वीस पैशाचं नाणं होतं पण त्यात फार काही गम्मत नव्हती, जणू त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व नव्हतं. वीस पैशाला विकण्याची ठळक गोष्ट म्हणजे पोस्टकार्ड. खरंतर ते 15 पैशाला असायचं पण आम्ही पोस्टातून आणून दुकानात वीस पैशाला विकायचो. दुसरं म्हणजे लहान साईझचा पतंग वीस पैशाला मिळायचा. पण तरी वीस पैशाच्या नाण्याची पोजिशनिंग चुकलेली होती कारण जी गोष्ट वीस पैशाला मिळू शकली असती तीही चाराण्यावर ढकलली जायची..
चार आणे.. पंचवीस पैशांचे नाणे.. गोल, चपटे, लहान.. काय काय मिळायचं त्या चाराण्याला.. किसमी चॉकलेट यायचं.. लाल रंगाचं.. त्यात काळ्या रंगात दोन जवळ आलेले मानवी चेहरे.. न कळणारी गोष्ट करणारे.. मध्ये क्रीम असलेलं शालिमार बिस्कीट असायचं, अंडाकृती आकाराचे.. एकमेकांना जोडलेले.. अगोदर ती मधली जेलीसारखी क्रीम जिभेने खायची मग बिस्कीट.. पाच बोटांत घालायला पाच पोंगे मिळायचे चाराण्यात. भोवरा फिरवायची नाडी मिळायची जिच्या शेवटी बिल्ला बांधलेला असायचा. शिपची काडेपेटी मिळायची. एक चारमिनार सिगारेट विकलं जायचं. सायकलमध्ये हवा भरता यायची. चाराण्यात "सोरट" नावाच्या पॉटलकची एक चिठ्ठी काढता यायची. मुख्य म्हणजे छोटा पेप्सीकोला मिळायचा. चाराण्यात खूप काही काही यायचं.. चाराण्यात मजा यायची..
चाराण्यात किसमी यायचं तसं आठ आण्यात मेलोडी यायचं.. दुधाचा पेप्सीकोला यायचा. आंतरदेशीय पत्र यायचं. दहा गोट्या यायच्या किंवा एक दगडी गट्टू यायचा. एक तोळा मांजा यायचा. मोठं लॉलीपॉप यायचं, कॉफीची वडी मिळायची, चहाची छोटी पुडी मिळायची. डेअरीत पाव शेर दूध मिळायचं, प्लास्टिकचा पिंग पॉंग बॉल मिळायचा. मसाला पान मिळायचं..मंदिराच्या पेटीत टाकलं की बहुदा पुण्यही मिळायचं पण तरी आठाण्याला रुपयाचा रुबाब नव्हता..
रुपयाच्या ठोकळ्याला डॉलर म्हणायचे कारण त्याची शक्ती अमेरिकन डॉलर सारखीच होती. जुने रुपयाचे नाणे जड होते, जाड होते, मोठे होते. जोरात फेकून मारल्यास एखाद्याच्या कपाळावर खोच पडेल इतके ते दणकट होते. गल्ल्यात आम्ही रुपयाची नाणी वेगळ्या वाटीत ठेवायचो कारण खूप जमा झाली तर देणेकऱ्यांचे पैसे अडकून राहायचे. अनेकदा त्या नाण्यांच्या 25-25 च्या पुड्या बांधून व्यापाऱ्यांना द्यायचो.
एक रुपयात चार ईडल्या यायच्या, एक रुपयात एक एक्लेअर यायचं, ज्याच्या आत जरासं कॅडबरी असायचं. एक रुपयात शाम्पूचा सॅशे यायचा, पाव किलो साखर यायची, आतपाव तेल यायचं, छटाक डालडा यायचं. एक रुपयात कव्वा यायचा, कव्वा म्हणजे सगळ्यात मोठ्ठा पतंग. एक रुपयात मोठी कुल्फी यायची, हलक्या दर्जाचा रबरी बॉल यायचा जो एका खेळात हरवून टाकला तरी चालायचा. विडीचा पूर्ण बंडल मिळायचा. एक रुपयात सुट्टी निरमा मिळायची, तांब्याभर ताक मिळायचं आणि हलवायाच्या दुकानात एखादी दुसरी जिलेबी पण प्लेटमध्ये मिळायची. एक रुपयात अर्धातास सायकल भाड्याने मिळायची. एक रुपयात भूक भागायची आणि मनही भरायचं.
नंतर त्याच एक रुपयाच्या नाण्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा छाप यायचा, अशा छापाची नाणी रसाच्या दुकानात काचेखाली कळस, मंदिर करून लावलेली असायची. कधी चुकून ते नाणे मिळाले तर आम्ही बाजूला काढायचो, पाकिटात ठेवून द्यायचो. जरा मोठं झाल्यावर आर्थिक व्यवहार करायला लागलो तेंव्हा ह्याच एक रुपयात रेव्हेन्यू स्टॅम्प मिळायचा. त्यावर सही करतांना छान वाटायचं.. अनेकदा रेल्वेतून प्रवास व्हायचा, एखादी मोठी नदी आली की गाडीच्या दरवाजात मुद्दाम बसायचो, खिशातले रुपयाचे नाणे पात्रात हळूच सोडायचो.. फार छान वाटायचं.
एक रुपयाचा ठोकळा नाण्यांच्या घराण्यातील राजा होता आणि तो खिशात असला की राजकुमार असल्यासारखं वाटायचं.
आयुष्य बदलत गेलं तशी वळण येत गेली, त्या वळणांवर ह्या नाण्यांचे हात आणि हातातले नाणे सुटत गेले. पाच आणि दहा रुपयांची नाणी आली पण डॉलरला होती ती मजा त्यांच्यात आलीच नाही. पाणी वाहतं राहिलं, पैसा खेळता राहिला. बोटांच्या टोकावर असलेले नाण्यांचे स्पर्श पुसट होत गेले पण बालपणात मनाला झालेले ते स्पर्श विझले नाहीत, आठवणी विरल्या नाहीत. नाण्यांच्या काठावर, त्या घाटांवर आयुष्याने घेतलेले ठहराव फार सुंदर होते, फार खणखणीत होते.
आता कधीतरी पॅन्टमध्ये काही नाणी खुळखुळतात, पॅन्ट बदलताना बाजूला काढली जातात. त्यांचं काय होतं त्याकडे लक्ष नसतं कारण स्वप्नांचे आकार बदललेत, कदाचित दिशाही बदललीय, पण आजही गाडीतून जातांना एखादे वृद्ध आजोबा पेन विकत असतात, एखादं लहान मुल काचेवर फडकं मारतं, तेंव्हा हात खिशात जातो, तो धातूच्या ठोकळ्यांचा स्पर्श शोधतो, तो लाभला तर बरं वाटतं.
हाही ठहराव छान वाटतो.. हाही स्पर्श आवडतो, त्या छिद्राच्या एक पैच्या नाण्याचा आवडायचा तसाच..
-शैलेंद्र कवाडे.
तराईच्या जंगलातली सकाळ फार सुंदर असते.
आपण जंगलात शिरतो तेंव्हा अजूनही अंधारच असतो पण त्या उजळत्या अंधाराच्या पोटात अशक्य गुपितं आणि अपार शक्यता असतात.
प्रकाशाच्या ओढीने सरळ वाढलेली सालाची झाडं दवाने भिजलेली असतात. त्यांच्या संगतीत वाढलेलं एखादं आंब्याचं झाडही त्यांच्यासारखंच प्रकाशाच्या शोधात सरळ उंच उंच वाढत जातं. झाडाच्या पानांवरून ओघळून पाण्याचा एखादा थेंब आपल्या उलट्या तळहातावर पडतो. आपल्या अंगावर शहारा येतो आणि त्या थेंबाबरोबरच ओघळूनही जातो.
झाडांनी शाकारलेला रस्ता एखाद्या बोगद्यासारखा दिसतो, ज्याच्या शेवटी एखादे मैदान असते आणि तिथे पाझरलेला सकाळचा प्रकाश आपली वाट पाहत असतो.
गाडीवाटेच्या मधून हिरव्या- पिवळ्या गवताचा पट्टा धावत असतो. गवतावर दाटलेले दव मोत्यासारखे चमकत असते. त्या भिजल्या गवताचा ओलसर गारवा आपल्या डोळ्यात उतरून येत असतो. आपली नजर त्या हिरव्या जिवंतपणावर खिळलेली असते आणि गाडीची चाकं ओल्या सुकल्या गवतावरून सरकत असतात. पण आपली नजर बांधून ठेवणारा तो जिवंत पट्टा आपल्याला चाकोरीबाहेर जाऊ देणार नसतो. चाकोरीच्या पलीकडचे जंगल अस्पर्श असते.
जंगलातल्या धुळभरल्या रस्त्यावर कालच्या रात्रीचा इतिहास लिहिलेला असतो. एखाद्या मोठ्या हत्तीने रस्त्याच्या खाली उतरतांना पाय घासत नेलेला असतो, कुठे एखादा अजगर मातीचा लोट ओलांडून पलीकडे गेलेला असतो. लोण्यासारख्या मऊ धुळीवर वाघाच्या पायाचा ठसा उमटलेला असतो आणि एखादा चुकार पाण्याचा थेंब त्यावर तरंगत असतो. जीप क्षणभर थांबून त्या दिशेचा अंदाज घेते आणि पुढे निघते. पुढचा सगळा प्रवास अंदाजाच्या आणि नशिबाच्या धाग्याने घडणार नसतो.
धुक्याचा एक पट्टा तरंगत असतो, त्याच्या पलीकडे थंड पाण्याने भरलेले तळे असते. हिरव्या पाण्यावर काही बदकं तरंगत असतात. एखादं उंबराचं झाड त्या पाण्यावर वाकलेलं असतं आणि त्याच्या अजूनच झुकलेल्या फांदीवर एखादा सर्पगरुड बसलेला असतो. त्याची नजर त्या बदकांच्या लहान पिल्लावर असते पण ऊब साठवून बसलेली त्याची पिसं फुलून यायला उत्सुक नसतात. आपणही त्याच्या पिसांतली ती ऊब शोषून घेण्याचा प्रयत्न करतो. आपली नजरही तिथून हलायला नाही म्हणत असते.
बाजूच्या गवताचे तुरे वर आलेले असतात आणि सकाळच्या पिठूळ प्रकाशात चमकत असतात. आपण आपला कॅमेरा सेट करतांना उगाचच त्यांचा एखादा फोटो घेतो आणि तो बघतांना स्वतःवरच खुश होतो. लगेहात त्या गरुडाचा आणि बदकाच्या पिल्लांचाही फोटो घेतो. तळ्यापाशी विसावलेली गाडी परत सुरू होते.
आपल्या मनात दुसरीच एखादी सकाळ सुरू झालेली असते.
आयुष्याचे जे जंगल आपण मागे सोडून आलेलो असतो, तिथेही काही धुळभरले रस्ते असतात, तिथेही काही खुणा उमटलेल्या असतात. तिथेही आपण अंदाजाने काहीतरी करत असतो, काही गाठी सोडवत असतो. आपण गप्प गप्प झालेलो असतो. त्या सुटत्या गाठींचे एक टोक आपण मनातच घट्ट धरून ठेवलेले असते, त्याच वेळी निसटत्या धाग्यांचे मनातच निरीक्षण सुरू असते. डचमळत्या जीपला घट्ट धरून बसलेल्या आपल्या हातांना त्या सुटत्या गाठीची जाणीव होते आणि आपली पकड अजून घट्ट होते. सूर्य वर येत असतो, आकाश मोकळं होतं असतं.
बाहेरच्या जगात नवीन वर्ष सुरू होत असतं, आपलाही नवा दिवस सुरू होत असतो. धुळीवरच्या, रस्त्यावरच्या खुणा चालत्या वाहनांच्या चाकाखाली मिटून जात असतात. काही ठसे मुद्दाम जपले जाणार असतात. त्या जपणुकीचे आयुष्यही नवे ठसे उमटेपर्यंतच असते. प्रवासात सगळ्याच खुणा क्षणभंगुर असतात. चाकोरी सुरक्षित असते पण तिच्या पलीकडचे अस्पर्श जंगल मोहक असते. स्वतःला सांभाळत त्या पायवाटांचा आनंद आपण घेतलेला असतो. तो तोल आजवर जमलेला असतो. आपल्या मनावरची आपली पकड घट्ट असते.
आपल्या ओठांवर अभावितपणे एक हसू उमटते, आपल्याला नेहमीसारखेच आनंदी, प्रसन्न वाटायला लागते.
क्या दिखायेंगे आज? आपण सहज आपल्या सारथ्याला विचारतो..
"जो आप देखना चाहो.." तोही तितक्याच सहजतेने उत्तर देतो..
दोघंही हसतो..
प्रयत्न आणि इच्छा पूर्ण असणार असतात पण ते पुरेसे नाही हे दोघांनाही माहीत असतं
गूढ गहन जंगलात काय दिसेल आणि काय निसटेल ते दोघांनाही माहीत नसतं.. पण आजचा दिवस पुन्हा नव्या आशेने, नव्या उमेदीने ते जंगल बघायचं असतं, जगायचं असतं..
पृथ्वीचे सूर्याभोवती नवे आवर्तन सुरू झालेले असते, नवे वर्ष सुरू झालेले असते.. नवी सकाळ उजाडलेली असते..
आपण स्वतःच स्वतःला हॅपी न्यू इयर म्हणतो, स्वतःच स्वतःला थॅंक्यु सुद्धा म्हणतो..
हातातला कॅमेरा बॅलन्स करत स्वतःलाच शोधत जातो..
मंगळवार, २५ जून, २०२४
बहुतेक ते 1986 किंवा 87 चे वर्ष असावे.
मी अकरा बारा वर्षांचा होतो आणि एकटा दुकानावर बसायला सुरवात करून एखादे वर्ष झाले असावे. सकाळी जरा वेळ दुकान आणि मग 12 वाजता शाळा असा प्रोग्रॅम असायचा.
मला अजून आठवतंय, ते सरत्या पावसाळ्याचे दिवस होते. मी दुकानाच्या गल्ल्यातून दोन रुपयांची एक नोट चोरली. त्या नोटेचे काय करायचे ते मला पक्के माहीत होते.
ज्या गंधाच्या मोहात पडून मी आयुष्यातील पहिली चोरी केली होती, तो गंध मला आजही आठवतो. एकीकडे बटाटे उकडत आहेत, दुसरीकडे उकडलेल्या बटाट्याची सालं काढून त्यात लसूण, हळद, मीठ आणि मिरची लाकडी दांड्याने ठेचली जात आहे, बाजूला एक रगडा फिरतोय आणि दलियाची ताजी चटणी त्यात वाटली जातेय. मोठ्या स्टोव्हवर तेलात वडे सुटले आहेत आणि एकेक घाणा बाहेर येतोय. मधूनच पाऊस पडतोय आणि खड्ड्यात साठलेल्या पाण्यावर रिक्षातून गळलेले ऑइल तरंगते आहे. ह्या सगळ्या गंधांचे कोलाज तयार होऊन ते आसमंत भारून टाकते आहे. ही सगळी जादू सव्वा रुपयांत मिळायची.
एका बारा वर्षाच्या मुलासाठी दोन रुपये चोरायला हे कारण पुरेसे होते.
डोंबिवलीत मंजुनाथ हायस्कूल समोर एक जानकी हॉटेल होते, त्याच्या शेजारी त्याच नावाचा एक स्नॅक्स बार होता. नंतर त्याचे नाव दीपा स्नॅक्स बार झाले. वर वर्णन केलेलं सगळं तिथे घडायचं. हा मी एकट्याने खाल्लेला पहिला वडा आणि पाव. आयुष्यभर सुरू राहिलेल्या खाद्यप्रवासाचा हा श्रीगणेशा.
नव्वदीचे शतक सुरू झाले तेंव्हाच मी दहावी झालो. कॉलेज सुरू झाले आणि त्याच बरोबर माझ्या खाद्य यात्रेतील नवीन तिर्थस्थळ मला सापडत गेली.
वय वाढत गेलं तसा मी जास्त स्वतंत्र होत गेलो. दुकान आणि दुकानाचा गल्ला पूर्णपणे माझ्या ताब्यात आला. सुदैवाने वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड इतकी होती की त्या वयात इतर कोणत्याच सवयी लागल्या नाहीत. एका अर्थी खाण्याच्या आवडीने मला वाचवलं.
कॉलेजच्या बाहेर शांतारामची सरबताची गाडी असायची. त्या गाडीवर डबल लेमन सरबत पिणे ही माझी नशा होती. गम्मत फक्त सरबताच्या चवीत नसायची, खरी गंमत शांताराम ते सरबत कसे बनवतो ते बघण्यात होती. तो ओळीत बारा पंधरा ग्लास लावायचा. मग सगळ्यांमध्ये बर्फ़ाचा चुरा भरायचा. मग मीठ, त्यानंतर लिंबू, मग साखरेचे पाणी, ज्यांचा कालाखट्टा वगैरे आहे त्यांचे ते फ्लेवर. काही ग्लासमध्ये सब्जाचे बी. मग तो एक रिकामा ग्लास घ्यायचा, तो ग्लास उलटा करून प्रत्येक ग्लासवर ठेवायचा आणि हातात उचलून जोरात हलवायचा. कधी गर्दी जास्त असेल तर हेच दोन्ही हातांनी करायचा. फेसाळलेल्या सरबताचा ग्लास आमच्या समोर धरायचा. त्याच्या तल्लीन कष्टांची चव आमच्या जिभेवर रेंगाळत राहायची.
शांताराम हा मी पाहिलेला आद्य बारटेंडर..
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ब्रेड पॅटिस हा पदार्थ फेमस होता. गरमागरम ब्रेड पॅटिस आणि चटणी आवडायची. कॉलेजसमोर MIDC कॅन्टीन होते. प्रोफेश्वर आणि विद्यार्थी तिथे अग्निहोत्र करायला जायचे. तिथेही कोणता तरी पदार्थ फेमस होता पण आता मला तो नक्की आठवत नाही. बहुदा पट्टीचा समोसा.
सकाळी किंवा दुपारच्या वेळी मला आवडणारा अजून एक पदार्थ होता. चार रस्त्यावरून जरा पुढे गेलं की माय होम नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे स्टीम इडली मिळायची. त्या इडली बरोबर नारळाची चटणी असायची. पाच रुपये प्लेट. मी दोन प्लेट तरी खायचोच. तिथेच बाजूला एक गुरुदेव नावाचे हॉटेल होते. त्याच्याकडे मी मेंदूवडा सांबार खायचो, त्या सांबार मध्ये खोबऱ्याचे उभे काप असायचे. ते मुरलेले खोबरे चघळायला मजा यायची.
स्टेशनजवळ "चांदोले" म्हणून एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान होते. त्याच्या समोरच्या जागेत महाबळ नावाचा शेट्टी गाडी लावायचा. त्याच्याकडे मटण आणि चिकन अफलातून मिळायचे. त्याच्याच शेजारी एक भुर्जी पावची गाडी असायची. पावभाजीच्या दोन गाड्या असायच्या. ठाकुरच्या वडापावची गाडी असायची. ह्या प्रत्येक गाडीवाल्याची काहीतरी खासियत होती. एका ठिकाणी खाताना दुसऱ्या गाडीवर तयार होणाऱ्या पदार्थांचा गंध मनोसोक्त हुंगायचा आणि "उद्या येतो रे" असं त्याला मनातल्या मनात आश्वासन द्यायचं.
डोंबिवलीत माझी अजूनही खूप तीर्थक्षेत्र होती. नंतर शिकण्यासाठी मुंबईत जायला लागलो तर तिकडे अजून काही सापडली.
त्यांच्याबद्दल पुढच्या भागात..
-शैलेंद्र कवाडे.
मी तेंव्हा साधारण सातवी आठवीत असेल. वडिलांनी सेकंडहॅन्ड लॅम्बरेटा स्कुटर घेतली होती. ही स्कुटर नेहमीच्या बजाज स्कुटरपेक्षा लांब असायची. तिच्या मागचा स्टेपनीचा टायर आडवा लावलेला असायचा. आमचं कुटुंब पाच जणांचं होतं. आई वडील, दोन बहिणी आणि मी. कधीतरी रात्री जेवण करायला डोंबिवली पूर्वेतून आम्ही पाच जण ह्या स्कुटरवरून पश्चिमेला जायचो. चौघे पुढे आणि मी मागच्या आडव्या स्टेपणीवर. जास्त वजन झाल्याने एखाद्या स्पीड ब्रेकरवर ती स्कुटर घासायची. मग मी पटकन उतरून घ्यायचो आणि जरासा पुढे जाऊन अलगद बसायचो.
इतके सगळे उद्योग आम्ही स्टेशन जवळच्या तृप्ती हॉटेलमध्ये जाण्यासाठी करायचो. तृप्तीच का, ह्याचेही कारण होते. तिथे राईस प्लेट तर चांगली मिळायचीच शिवाय त्या राईस प्लेटमध्ये रसम आणि डाळ अनलिमिटेड मिळायचे. फिश टँकच्या शेजारच्या टेबलावर आम्ही बसायचो. शक्यतो आम्ही सगळं कुटुंब मिळून 2 राईस प्लेट घ्यायचो आणि मग माझी एक आलू मटार प्लेट आणि रोटी फिक्स असायची. अजून एखादी भाजी घेतली जायची. ते मेनू कार्ड आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. राईस प्लेट अठरा रुपयांना होती, पुरी एक्सट्रा घेतल्यास वेगळे, आलू मटार आणि इतर भाज्या 14/15 रुपयांच्या रेंजमध्ये होत्या. रोटी दीड किंवा दोन रुपये.
जेवतांना आई न चुकता राईस प्लेटमधली दह्याची वाटी मला द्यायची. स्टीलच्या वाटीतच लावलेले घट्ट गोडसर दही असायचे. पुढच्या आयुष्यात शेकडो प्रकारचे योगर्ट्स चाखले पण ती तृप्तीच्या दह्याची चव जशी लक्षात राहिली तसे काहीही लक्षात राहिले नाही. मला अजून आठवतं, आमचं बिल बरोब्बर एकशे दहा, एकशे पंधरा रुपये व्हायचं. दोन रुपये टीप दिली जायची. फुकट मिळालेली बडीशेप दोनदा तीनदा खाल्ली जायची आणि आम्ही भरल्या पोटाने लॅम्बरेटावर आरूढ व्हायचो.
नंतर ती लॅम्बरेटा कायमची बंद पडली आणि आम्ही तृप्ती वरून मॉडर्न कॅफेला शिफ्ट झालो. मॉडर्न कॅफे आज डोंबिवलीतील मोठं हॉटेल आहे. तृप्ती आता सुरू आहे की नाही माहीत नाही.
मॉडर्न कॅफेवरून सरळ स्टेशनच्या दिशेने पुढे गेलं की चंदू आईस्क्रीम होतं. आधी किंवा नंतर, ते पहिल्या मजल्यावर पण होतं आणि खाली पण होतं. मी त्याच्याकडे ओली भेळ आणि मँगो आईस्क्रीम खायचो. त्या भेळेवर भरपूर बारीक शेव असायची आणि एखादा काजू पेरलेला असायचा. मँगो आईस्क्रीम पॉटमध्ये बनवलेले आणि अत्यंत तलम, मऊ असायचे. जिभेवर ठेवले की विरघळत जायचे.
कॉलेजच्या दिवसांत मला व्यायामाची आवड लागली होती. स्टेशनजवळच्या तळवलकर व्यायामशाळेत संध्याकाळी व्यायाम करून आलं, की खाली एक अंड्यावाले काका असायचे, त्यांच्याकडून मी चार गावठी बॉईल घ्यायचो. आता ते काका नसतील पण मी त्यांना कधीही विसरू शकत नाही इतके त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या लक्षात आहे. त्या गरम अंड्यांची आणि त्यावर टाकलेल्या मीठ-मिरपुडीची चव, अंडी सोलण्याची आणि कापण्याची काकांची पद्धत, पातळ सुरीला कागदाने पुसण्याची त्यांची लकब, सगळं त्या नोस्टॉजियाचा भाग आहे.
मानपाडा रोडवर कस्तुरी प्लाझा शेजारी 95/96 साली एक गाडी सुरू झाली होती. त्या काकूंकडे पाया सूप मिळायचे. मी हा पदार्थ एकदा खाल्ला आणि मला तो खूप आवडला. आठवड्यातून दोनदा तीनदा तरी मी तो खायचोच. त्या काकू आणि त्यांचा गंध लावून बसलेला नवरा मला अजून आठवतो. ती गाडी आता आहे की नाही, माहीत नाही. आज ते सूप मला आवडेल का तेही माहीत नाही.
कधी कधी मी आणि माझा मित्र आमच्या दुकानात रात्री अभ्यासाला बसायचो. साडेदहा वाजता चालत MIDC मध्ये जायचो. तिकडे एक चायनीजची गाडी नुकतीच सुरू झाली होती. एक बंगाली होता. त्याच्याकडे आम्ही मंचाव सूप वन बाय टू घ्यायचो. त्यात भरपूर नूडल्स टाकायचो.जास्त घट्ट वाटलं तर स्वतःच त्यात जरासे पाणी ओतायचो. कोणी पाहिलं तर काय म्हणेल ह्याने फरक पडत नव्हता आणि लाजही वाटत नव्हती. ही गाडी नंतर बंद झाली. माझे गाडीवर चायनीज खाणेही बंद झाले.
मानपाडा रोडवर कामत हॉस्पिटलच्या खाली एक सँडविचवाला असायचा. न भाजलेले, काकडी टोमॅटो, फक्त उकडला बटाटा टाकलेले सँडविच तो बनवायचा. सँडविच बनवताना त्याला बघत बसायला मला आवडायचं. ब्रेडचे काठ कापून हिरवी चटणी आणि अमूल बटर लावलेलं ते सँडविच मी अनेकदा खायचो. स्टेशनच्या शेजारी, जुन्या मैसूर मेडिकल समोर अजून एक सँडविच वाला असायचा. त्याच्याकडे गरमागरम टोस्ट सँडविच मिळायचे. अनेकदा रात्री उशिरा मी ते खायला जायचो. तिथून येतांना बंद होत आलेल्या रसाच्या दुकानात रस प्यायचो किंवा नगरपालिकेसमोर काट्यात वजन करून कुल्फी आईस्क्रीम मिळायचे ते खायचो. त्यातल्या मलई आणि चिकू आईसक्रीमची चव आजही तोंडावर आहे. परत खावं लागतंय लवकरच..
97 साली मी मुंबईत M Sc करायला जायला लागलो. त्या प्रवासात आणि युनिव्हर्सिटीच्या आसपास अजून काही तीर्थक्षेत्र सापडली.
त्यांच्याबद्दल परत कधीतरी..
-शैलेंद्र कवाडे.