कोऱ्या कागदाला पहावे निरखून,
तसा काल मला भेटलो मी,
मोकळ्या नभावर जावे मोहून,
तसा काल मला भेटलो मी...
वाऱ्याने लिहिलेली काही धुळाक्षरे,
थोडे ढग सांडलेले इकडे तिकडे,
निरर्थक रिकाम्या क्षणांना बिलगून,
तसा काल मला भेटलो मी,
काही इच्छांच्या काढून मिरवणुका,
थोडया चौकशा, थोड्या स्मरणिका,
बरेचसे टाळून पण थोडेसे बोलून,
तसा काल मला भेटलो मी..
मनातून मनाला कित्येक स्पर्श,
ओठांवर रेंगाळलेले अस्फुट हर्ष,
संपूच नये वाटत असतांना,
शेवटी उठून,
तसा काल मला भेटलो मी..
-शैलेंद्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा