बुधवार, ८ जानेवारी, २०२५

 नाणे-घाट..


दोन खोल्यांच्या घराला मधलं दार होतं. त्या मधल्या दाराला एक पांढऱ्या हिरव्या रंगाचं तोरण होतं. पांढऱ्या आणि हिरव्या धाग्याने विणलेलं.. पण त्यात एक गंमत होती.


जुन्या तांब्याचे एक पैशाचे म्हणजे "पै" चे नाणे घेऊन त्याच्या भोवती, त्याच्या मधल्या छिद्रातून धागे फिरवून हे तोरण विणले होते. कधी कधी लहर आली की स्टूलवर चढून आम्ही ते धागे बाजूला करायचो आणि त्या पैच्या नाण्याला हात लावायचो. हिरवट पडत चाललेल्या तांब्याचा, चलनातून बाद झालेल्या त्या नाण्याचा तो थंड स्पर्श अजूनही बोटांच्या टोकावर आहे. 


हळूहळू ते तोरण विरत गेलं, नाणे सुट्टे होत गेले आणि कधीतरी एकत्र करून कुठेतरी ठेवून दिले गेले. त्या दिवसातल्या बऱ्याचश्या गोष्टींसारखीच किंवा त्या दिवसांसारखीच ती नाणी हरवून गेली.. न वापरताच खर्च झाली.


त्या एका पैच्या, त्या नाण्यांच्या आठवणी तितक्याच.. हरवून जाण्यापुरत्याच..


पण वापरलेल्या नाण्यांच्या मात्र खूप आठवणी आहेत. 


त्यातही अगदी लहानपणीच दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यामुळे प्रत्येक नाण्याची खरी व्हॅल्यू, त्याचं वजन, त्याचा स्पर्श हे सगळं सगळं मला अक्षरशः तळहातावर, बोटांच्या टोकावर असल्यासारखं आठवतं. 


सगळ्यात छोटं म्हणजे पाच पैशाचं नाणं. ह्या पाच पैशात मिळणाऱ्या ठळक गोष्टी अजून आठवतात. नारंगी रंगांची, संत्र्याच्या फोडीच्या आकाराची लिम्लेटची गोळी, पाच पैशाला एक. नंतर कुत्र्या मांजराच्या आकाराची बिस्किटं असायची ती पाच पैशाला दोन मिळायची. सुरवातीला एक खूप लहान आकाराची पतंग पण पाच पैशाला मिळायची. ही पाच पैशाची पतंग आणि पाच पैशाचा वीस वित साखळी छाप दोरा ही खरेदी व्हायची. हस्तकलेला वापरण्याचा घोटीव कागद नावाचा रंगीत कागद असायचा, तो पाच पैशाला अर्धा मिळायचा. पाटीवरची पेन्सिल पाच पैशाला विकली जायची. साबळे वाघिरे आणि कंपनीची संभाजी विडी पाच पैशाला एक विकायचो. बाकी फार काही पाच पैशात यायचं नाही..


दिवस सरकले तसे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी आपोआप दहा पैशाच्या झाल्या आणि आधीच दहा पैशाला मिळणाऱ्या गोष्टींमध्ये ह्याही जमा झाल्या. काळ्या आणि पांढऱ्या रेषा असलेली गोल छोटी गोळी दहा पैशाला मिळायची, ती खाल्ली की घशात थंड वाटायचं. तिला आम्ही अस्मानताराची गोळी म्हणायचो. वरून साखर लावलेले चपटे बिस्कीट दहा पैशाला मिळायचे. गाडीवर दहा पैशात एक उभी पुडी भरून चणे मिळायचे. दहा पैशात छापा काटा खेळता यायचा आणि नशीब अजमावून बघता यायचे. रुपये का दसवा भाग असं ठळकपणे लिहिलेलं दहा पैशाचं नाणं रोजच्या जगण्याचा भाग होतं.


वीस पैशाचं नाणं होतं पण त्यात फार काही गम्मत नव्हती, जणू त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व नव्हतं. वीस पैशाला विकण्याची ठळक गोष्ट म्हणजे पोस्टकार्ड. खरंतर ते 15 पैशाला असायचं पण आम्ही पोस्टातून आणून दुकानात वीस पैशाला विकायचो. दुसरं म्हणजे लहान साईझचा पतंग वीस पैशाला मिळायचा. पण तरी वीस पैशाच्या नाण्याची पोजिशनिंग चुकलेली होती कारण जी गोष्ट वीस पैशाला मिळू शकली असती तीही चाराण्यावर ढकलली जायची..


चार आणे.. पंचवीस पैशांचे नाणे.. गोल, चपटे, लहान.. काय काय मिळायचं त्या चाराण्याला.. किसमी चॉकलेट यायचं.. लाल रंगाचं.. त्यात काळ्या रंगात दोन जवळ आलेले मानवी चेहरे.. न कळणारी गोष्ट करणारे.. मध्ये क्रीम असलेलं शालिमार बिस्कीट असायचं, अंडाकृती आकाराचे.. एकमेकांना जोडलेले.. अगोदर ती मधली जेलीसारखी क्रीम जिभेने खायची मग बिस्कीट.. पाच बोटांत घालायला पाच पोंगे मिळायचे चाराण्यात. भोवरा फिरवायची नाडी मिळायची जिच्या शेवटी बिल्ला बांधलेला असायचा.  शिपची काडेपेटी मिळायची. एक चारमिनार सिगारेट विकलं जायचं. सायकलमध्ये हवा भरता यायची. चाराण्यात "सोरट" नावाच्या पॉटलकची एक चिठ्ठी काढता यायची. मुख्य म्हणजे छोटा पेप्सीकोला मिळायचा. चाराण्यात खूप काही काही यायचं.. चाराण्यात मजा यायची..


चाराण्यात किसमी यायचं तसं आठ आण्यात मेलोडी यायचं.. दुधाचा पेप्सीकोला यायचा. आंतरदेशीय पत्र यायचं. दहा गोट्या यायच्या किंवा एक दगडी गट्टू यायचा. एक तोळा मांजा यायचा. मोठं लॉलीपॉप यायचं, कॉफीची वडी मिळायची, चहाची छोटी पुडी मिळायची. डेअरीत पाव शेर दूध मिळायचं, प्लास्टिकचा पिंग पॉंग बॉल मिळायचा. मसाला पान मिळायचं..मंदिराच्या पेटीत टाकलं की बहुदा पुण्यही मिळायचं पण तरी आठाण्याला रुपयाचा रुबाब नव्हता..


रुपयाच्या ठोकळ्याला डॉलर म्हणायचे कारण त्याची शक्ती अमेरिकन डॉलर सारखीच होती. जुने रुपयाचे नाणे जड होते, जाड होते, मोठे होते. जोरात फेकून मारल्यास एखाद्याच्या कपाळावर खोच पडेल इतके ते दणकट होते. गल्ल्यात आम्ही रुपयाची नाणी वेगळ्या वाटीत ठेवायचो कारण खूप जमा झाली तर देणेकऱ्यांचे पैसे अडकून राहायचे. अनेकदा त्या नाण्यांच्या 25-25 च्या पुड्या बांधून व्यापाऱ्यांना द्यायचो. 


एक रुपयात चार ईडल्या यायच्या, एक रुपयात एक एक्लेअर यायचं, ज्याच्या आत जरासं कॅडबरी असायचं. एक रुपयात शाम्पूचा सॅशे यायचा, पाव किलो साखर यायची, आतपाव तेल यायचं, छटाक  डालडा यायचं. एक रुपयात कव्वा यायचा, कव्वा म्हणजे सगळ्यात मोठ्ठा पतंग. एक रुपयात मोठी कुल्फी यायची, हलक्या दर्जाचा रबरी बॉल यायचा जो एका खेळात हरवून टाकला तरी चालायचा. विडीचा पूर्ण बंडल मिळायचा. एक रुपयात सुट्टी निरमा मिळायची, तांब्याभर ताक मिळायचं आणि हलवायाच्या दुकानात एखादी दुसरी जिलेबी पण प्लेटमध्ये मिळायची. एक रुपयात अर्धातास सायकल भाड्याने मिळायची. एक रुपयात भूक भागायची आणि मनही भरायचं. 


नंतर त्याच एक रुपयाच्या नाण्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा छाप यायचा, अशा छापाची नाणी रसाच्या दुकानात काचेखाली कळस, मंदिर करून लावलेली असायची. कधी चुकून ते नाणे मिळाले तर आम्ही बाजूला काढायचो, पाकिटात ठेवून द्यायचो. जरा मोठं झाल्यावर आर्थिक व्यवहार करायला लागलो तेंव्हा ह्याच एक रुपयात रेव्हेन्यू स्टॅम्प मिळायचा. त्यावर सही करतांना छान वाटायचं.. अनेकदा रेल्वेतून प्रवास व्हायचा, एखादी मोठी नदी आली की गाडीच्या दरवाजात मुद्दाम बसायचो, खिशातले रुपयाचे नाणे पात्रात हळूच सोडायचो.. फार छान वाटायचं.


एक रुपयाचा ठोकळा नाण्यांच्या घराण्यातील राजा होता आणि तो खिशात असला की राजकुमार असल्यासारखं वाटायचं.


आयुष्य बदलत गेलं तशी वळण येत गेली, त्या वळणांवर ह्या नाण्यांचे हात आणि हातातले नाणे सुटत गेले. पाच आणि दहा रुपयांची नाणी आली पण डॉलरला होती ती मजा त्यांच्यात आलीच नाही. पाणी वाहतं राहिलं, पैसा खेळता राहिला. बोटांच्या टोकावर असलेले नाण्यांचे स्पर्श पुसट होत गेले पण बालपणात मनाला झालेले ते स्पर्श विझले नाहीत, आठवणी विरल्या नाहीत. नाण्यांच्या काठावर, त्या घाटांवर आयुष्याने घेतलेले ठहराव फार सुंदर होते, फार खणखणीत होते.


आता कधीतरी पॅन्टमध्ये काही नाणी खुळखुळतात, पॅन्ट बदलताना बाजूला काढली जातात. त्यांचं काय होतं त्याकडे लक्ष नसतं कारण स्वप्नांचे आकार बदललेत, कदाचित दिशाही बदललीय, पण आजही गाडीतून जातांना एखादे वृद्ध आजोबा पेन विकत असतात, एखादं लहान मुल काचेवर फडकं मारतं, तेंव्हा हात खिशात जातो, तो धातूच्या ठोकळ्यांचा स्पर्श शोधतो, तो लाभला तर बरं वाटतं. 


हाही ठहराव छान वाटतो.. हाही स्पर्श आवडतो, त्या छिद्राच्या एक पैच्या नाण्याचा आवडायचा तसाच.. 


-शैलेंद्र कवाडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा