बुधवार, ८ जानेवारी, २०२५

 तराईच्या जंगलातली सकाळ फार सुंदर असते.


आपण जंगलात शिरतो तेंव्हा अजूनही अंधारच असतो पण त्या उजळत्या अंधाराच्या पोटात अशक्य गुपितं आणि अपार शक्यता असतात. 


प्रकाशाच्या ओढीने सरळ वाढलेली सालाची झाडं दवाने भिजलेली असतात. त्यांच्या संगतीत वाढलेलं एखादं आंब्याचं झाडही त्यांच्यासारखंच प्रकाशाच्या शोधात सरळ उंच उंच वाढत जातं. झाडाच्या पानांवरून ओघळून पाण्याचा एखादा थेंब आपल्या उलट्या तळहातावर पडतो. आपल्या अंगावर शहारा येतो आणि त्या थेंबाबरोबरच ओघळूनही जातो. 


झाडांनी शाकारलेला रस्ता एखाद्या बोगद्यासारखा दिसतो, ज्याच्या शेवटी एखादे मैदान असते आणि तिथे पाझरलेला सकाळचा प्रकाश आपली वाट पाहत असतो.


गाडीवाटेच्या मधून हिरव्या- पिवळ्या गवताचा पट्टा धावत असतो. गवतावर दाटलेले दव मोत्यासारखे चमकत असते. त्या भिजल्या गवताचा ओलसर गारवा आपल्या डोळ्यात उतरून येत असतो. आपली नजर त्या हिरव्या जिवंतपणावर खिळलेली असते आणि गाडीची चाकं ओल्या सुकल्या गवतावरून सरकत असतात. पण आपली नजर बांधून ठेवणारा तो जिवंत पट्टा आपल्याला चाकोरीबाहेर जाऊ देणार नसतो. चाकोरीच्या पलीकडचे जंगल अस्पर्श असते. 


जंगलातल्या धुळभरल्या रस्त्यावर कालच्या रात्रीचा इतिहास लिहिलेला असतो. एखाद्या मोठ्या हत्तीने रस्त्याच्या खाली उतरतांना पाय घासत नेलेला असतो, कुठे एखादा अजगर मातीचा लोट ओलांडून पलीकडे गेलेला असतो. लोण्यासारख्या मऊ धुळीवर वाघाच्या पायाचा ठसा उमटलेला असतो आणि एखादा चुकार पाण्याचा थेंब त्यावर तरंगत असतो. जीप क्षणभर थांबून त्या दिशेचा अंदाज घेते आणि पुढे निघते. पुढचा सगळा प्रवास अंदाजाच्या आणि नशिबाच्या धाग्याने घडणार नसतो. 


धुक्याचा एक पट्टा तरंगत असतो, त्याच्या पलीकडे थंड पाण्याने भरलेले तळे असते. हिरव्या पाण्यावर काही बदकं तरंगत असतात. एखादं उंबराचं झाड त्या पाण्यावर वाकलेलं असतं आणि त्याच्या अजूनच झुकलेल्या फांदीवर एखादा सर्पगरुड बसलेला असतो. त्याची नजर त्या बदकांच्या लहान पिल्लावर असते पण ऊब साठवून बसलेली त्याची पिसं फुलून यायला उत्सुक नसतात. आपणही त्याच्या पिसांतली ती ऊब शोषून घेण्याचा प्रयत्न करतो. आपली नजरही तिथून हलायला नाही म्हणत असते. 


बाजूच्या गवताचे तुरे वर आलेले असतात आणि सकाळच्या पिठूळ प्रकाशात चमकत असतात. आपण आपला कॅमेरा सेट करतांना उगाचच त्यांचा एखादा फोटो घेतो आणि तो बघतांना स्वतःवरच खुश होतो. लगेहात त्या गरुडाचा आणि बदकाच्या पिल्लांचाही फोटो घेतो. तळ्यापाशी विसावलेली गाडी परत सुरू होते.


आपल्या मनात दुसरीच एखादी सकाळ सुरू झालेली असते.


आयुष्याचे जे जंगल आपण मागे सोडून आलेलो असतो, तिथेही काही धुळभरले रस्ते असतात, तिथेही काही खुणा उमटलेल्या असतात. तिथेही आपण अंदाजाने काहीतरी करत असतो, काही गाठी सोडवत असतो. आपण गप्प गप्प झालेलो असतो. त्या सुटत्या गाठींचे एक टोक आपण मनातच घट्ट धरून ठेवलेले असते, त्याच वेळी निसटत्या धाग्यांचे मनातच निरीक्षण सुरू असते.  डचमळत्या जीपला घट्ट धरून बसलेल्या आपल्या हातांना त्या सुटत्या गाठीची जाणीव होते आणि आपली पकड अजून घट्ट होते. सूर्य वर येत असतो, आकाश मोकळं होतं असतं.


बाहेरच्या जगात नवीन वर्ष सुरू होत असतं, आपलाही नवा दिवस सुरू होत असतो. धुळीवरच्या, रस्त्यावरच्या खुणा चालत्या वाहनांच्या चाकाखाली मिटून जात असतात. काही ठसे मुद्दाम जपले जाणार असतात. त्या जपणुकीचे आयुष्यही नवे ठसे उमटेपर्यंतच असते. प्रवासात सगळ्याच खुणा क्षणभंगुर असतात. चाकोरी सुरक्षित असते पण तिच्या पलीकडचे अस्पर्श जंगल मोहक असते. स्वतःला सांभाळत त्या पायवाटांचा आनंद आपण घेतलेला असतो. तो तोल आजवर जमलेला असतो. आपल्या मनावरची आपली पकड घट्ट असते. 


आपल्या ओठांवर अभावितपणे एक हसू उमटते, आपल्याला नेहमीसारखेच आनंदी, प्रसन्न वाटायला लागते.


क्या दिखायेंगे आज? आपण सहज आपल्या सारथ्याला विचारतो..


"जो आप देखना चाहो.." तोही तितक्याच सहजतेने उत्तर देतो..


दोघंही हसतो.. 


प्रयत्न आणि इच्छा पूर्ण असणार असतात पण ते पुरेसे नाही हे दोघांनाही माहीत असतं


गूढ गहन जंगलात काय दिसेल आणि काय निसटेल ते दोघांनाही माहीत नसतं.. पण आजचा दिवस पुन्हा नव्या आशेने, नव्या उमेदीने ते जंगल बघायचं असतं, जगायचं असतं..


पृथ्वीचे सूर्याभोवती नवे आवर्तन सुरू झालेले असते, नवे वर्ष सुरू झालेले असते.. नवी सकाळ उजाडलेली असते..


आपण स्वतःच स्वतःला हॅपी न्यू इयर म्हणतो, स्वतःच स्वतःला थॅंक्यु सुद्धा म्हणतो..


हातातला कॅमेरा बॅलन्स करत स्वतःलाच शोधत जातो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा