शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७


हेही बरेच आहे,
तेही बरेच होते,
आपापल्या परीने,
सारे खरेच होते

मोजून पाप माझे
जपमाळ ओवलेली,
मोक्षास गाठण्याला,
तितके पुरेचं होते,

आयुष्य तारकांचे
मोजीत रात्र होती
मोहक असे मनाला
भूलवीत बरेच होते

खाणीत नांदण्याचा
कोळश्यास शाप आहे
नसते ठिसूळ तुकडे
तर तेही हिरेच होते

सरणास भेटताना
गेली नजर मागे
चेहरे ओळखीचे 
हसरे सारेच होते
-शैलेंद्र


मंगळवार, ९ मे, २०१७

#|| कोहम् ।।
भाग ८

मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. 

मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं.

पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू,

मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले. मानवी मेंदू हा मानववंशातील सर्वात मोठा मेंदू नक्कीच नव्हे, तो मान बहुदा निण्डेरथलचा आहे. इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आपल्याला मानववंशातील प्राण्यांचे सांगाडे मिळालेत, त्यांच्या कवटीच माप आपल्याकडे आहे पण मेंदू हा पूर्ण कवटी व्यापतोच असं नव्हे. त्यामुळे कोणाचा मेंदू किती मोठा होता याबद्दल आपण फक्त अंदाज करू शकतो.

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे  जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं  ती नक्की काय  होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल, पण तरीही, बहुदा, या बदलात मेंदूचे आकारमान किंवा त्याचे भाग बदलले किंवा वाढले नाहीत. जे बदल घडले ते मेंदूच्या पेशींच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काच्या क्षमतेत आणि प्रमाणात. जसं एखाद्या आडव्या तिडव्या पसरलेल्या भूप्रदेशात नवीन रस्त्याचं जाळं विणले जाते आणि मग पूर्वी खूप लांब असलेले प्रदेश जवळ येतात तसंच या नवीन मज्जापेशींनी मेंदूच्या वेगवेगळ्या प्रदेशांना अशा पद्धतीने जोडले की होमो सेपियन हा प्राणी इतरांपेक्षा वेगळा पडला. हे बदल अर्थातच कुठल्यातरी जनुकीय म्युटेशनमुळे झाले आणि सुदैवाने ( की दुर्दैवाने) संपूर्ण लोकसंख्येत पसरले. ज्या अर्थी हे बदल त्या पूर्ण लोकसंख्येत पसरले त्या अर्थी बहुदा तोपर्यंत होमो सेपियन ही प्रजाती फक्त पूर्व आफ्रिकेतच स्थायिक होती.

अर्थात ही प्रक्रिया इतकी साधी नसणार, हे बदल घडत असताना, ही बौद्धिक क्षमता असलेले मानव आणि नसलेले मानव सुरवातीला एकाच कळपात राहत असतील, एकत्र प्रजनन करत असतील. अगदी जनुकीय दृष्ट्या बदललेल्या मानवालाही त्याच्या क्षमतेचा पूर्ण परिचय झालेला नसेल आणि आजूबाजूचे कित्येक लोक त्याला असं काही नसतंच हे समजावून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असावे. एकंदरच "होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक" अशी परिस्थिती असावी. जोवर एका ठराविक संख्येचे लोक या पद्धतीने म्युटेट होऊन बदलले नाही तोवर ही बौद्धिक क्षमता फारशी उपयुक्त ठरू शकली नसावी. ही गोष्ट अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच उदाहरण घेता येईल. नव्वदच्या दशकानंतर या क्रांतीला खरा वेग आला कारण त्याआधी समाजातील बहुसंख्य वर्ग कॉम्प्युटर म्हणजे काय, त्याच लॉजिक काय याबद्दल अनभिज्ञ होता, एकदा एका विशिष्ट संख्येत लोकांना हे लॉजिक लक्षात आल्यावर मग पुढचा प्रवास सोपा झाला.

लक्षात घ्या की, मानवी इतिहासात शारीरिक पातळीवर झालेली ही शेवटची क्रांती ( आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी), त्यानंतर झालेल्या सगळ्या मोठ्या उलाढाली मग ती शेतकी क्रांती असो वा औद्योगिक, या मानवी समाजाच्या आणि विचारांच्या पातळीवर झाल्यात.

मेंदूतील हा बदलही काही सहजसोपा आणि फक्त चांगलाच होता असं नव्हे, या बदलामुळे आपण आजही अशा काही रोगांना बळी पडतो जे फक्त मानवालाच होतात. उदाहरणार्थ, विस्मरणाचा आजार(पार्किन्सन्स) किंवा ऑटिसम.

पण अर्थातच या क्रांतीचे फायदे जास्त होते, त्यातले लगेच उपयोगी ठरलेले आणि महत्वाचे फायदे आपण पाहू. ढोबळमानाने पाहता होमो सेपियन, त्या बौद्धिक क्रांतीनंतर एक गोष्ट इतर मानव वंशीयांपेक्षा जास्त चांगलं करू लागले,  ते म्हणजे समूह बांधणे आणि तो मोठा करणे, तसच अनेक सुट्ट्या सुट्ट्या कळपातही एक सलग सुसूत्रता राखणे..

हे नक्की कसं झालं असावं?


आपण मागील भागात बघितलं की लांडगे, रानकुत्रे, वानर यांचे अत्यंत सुसूत्रपणे बांधलेले कळप एका विशिष्ट संख्येपेक्षा मोठे झाले की फुटतात, कारण कळपात राहण्यासाठी, जिथे प्रश्न जगण्या मरण्याचा असतो तिथे, ज्या परस्पर सामंजस्याची गरज असते ते एक विशिष्ट संख्या असेपर्यंतच शक्य होतं. याच कारणासाठी सैन्यात एका तुकडीत ठराविक संख्येपेक्षा जास्त सैनिक ठेवत नाहीत. एका विशिष्ट संख्येनंतर परस्परातील बंध विरळ होतं जातात, आणि हळूहळू कळपात उभी फूट पडते.

हेच तत्व मानववंशातील सगळ्या सजीवांना लागू होत, सत्तर हजार वर्षापूर्वी आधुनिक होमो सेपियनाने यात फक्त दोन बदल घडवून आणले.. बघुयात कोणते ते..

पहिला बदल होता तो कळपाच्या गणसंख्येत, जो शक्य झाला गॉस्सीपिंगमुळे.. 😊😊

आधी गॉसिपिंग म्हणजे काय ते समजून घेऊ..

बऱ्याचदा आपण दोन मुंग्यांना एकमेकींशी रासायनिक भाषेत बोलताना बघतो. हे संभाषण अत्यंत प्रार्थमिक पातळीवर असतं. जास्त विकसित प्राणी त्यापेक्षा बरंच जास्त बोलतात. दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो..दोन चिंपांजी एकमेकांना एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतात,

पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत, हा तिसरा चिंपांजी कसा आहे, त्याचे चांगले वाईट गुण कोणते, तो एखाद्या परिस्थितीत कसा वागेल ह्या बद्दल हे दोन चिंपांजी तिसऱ्याच्या अनुपस्थितीत कधीच बोलू शकत नाही.

होमो सेपियन मात्र गॉसिप अत्यंत परिणामकारकपणे करू शकतो. हे गॉसिप त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल या दोघांची मतं ठरवण्याचे काम करते.. समजा दोन चिंपांजिंमध्ये काही खास बॉण्ड तयार करायचा असेल तर त्यांना एकमेकांना कुरवाळत, जवळ घेऊन बसावं लागेल. या पद्धतीला प्रचंड मर्यादा आहेत, म्हणजे एका वेळी तुम्ही एकाशीच स्पर्शातून संवाद साधू शकता. दिवसभरातील इतर सगळ्या जबाबदाऱ्या, संरक्षण, अन्न, मैथुन इत्यादी करून असे तुम्ही किती  जणाना कुरवाळणार? याच मर्यादेमुळे हे समूह एका संख्येपेक्षा जास्त वाढू शकत नाहीत. भाषेचं आणि त्यातही गॉसिपच तसं नाही. दोन व्यक्ती एकाच वेळी अनेकांबद्दल बोलू शकतात. त्यातून त्या व्यक्तीचे तिसऱ्याद्दल मत तयार होते. ते त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा, दूर रहावे की त्याला मारून टाकावे हे ठरवू शकतात. अर्थातच या पद्धतीने समूहातील बंध अधिक घट्ट आणि ठसठशीत होतात. समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा.

पण तरीही गॉसिप करून किती मोठा समूह एकसंध ठेवता येईल याला मर्यादा आहेत, शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत. जिथे ही मर्यादा संपली तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.

सोमवार, २७ मार्च, २०१७

||कोहम्||
भाग 7

मागच्या भागात आपण विविध प्राणी आणि त्यांचे वेगवेगळे समुदाय यांच्या विषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, उत्क्रांतीत नेहमी तेच प्राणी यशस्वी ठरलेत जे सामुदायिक आयुष्य जगू शकले. एकेकटे जगणारे प्राणी हे शक्यतो फारसे न बदलता जसे होते तसेच राहिले.

आता आपण परत मागच्या भागात जे उदाहरण घेतले होते ते बघू, समजा लांडग्यांची एक टोळी हरणांच्या शिकारीला आलाय, त्यांनी हरणांच्या कळपाला घेरलंय आणि सगळ्यात हळू धावणार हरीण त्यांच्यातल्या एका लांडग्यांच्या तावडीत सापडलं, ज्या क्षणी तो लांडगा त्या हरणाला खाली पाडतोय, अगदी त्याच वेळी इतर दोन लांडगे अजून एका हरणाच्या अत्यंत जवळ आहेत, काही सेकंदाची मेहनत आणि हेही हरीण त्यांना मिळू शकत, पण ज्या क्षणी पहिला लांडगा हरणाला खाली पाडेल त्याक्षणी ते दोन लांडगे त्या हरिणाचा पाठलाग सोडून देतील आणि पडलेल्या हरणाच्या मांसातील आपला वाटा घेण्यासाठी धावतील. लांडग्यांमधील अल्फा मेल आपला वाटा आधी उचलेल आणि मग इतर लांडगे उरलेल्या भागावर तुटून पडतील, असं का? कारण शिकार पूर्ण झाल्यावर, घरी नेवून तिचे समान वाटे करावे आणि मग ती खावी असं लांडग्यांमध्ये ठरलेलं नसतं, का ठरलेलं नसतं? कारण ते तसं ठरवावं हे एकमेकांत ठरवण्याइतकी त्यांची भाषा सक्षम नसते.

अगदी 4-5 लक्ष वर्षांपूर्वी असलेल्या असलेल्या मानवाची भाषाही या लांडग्यांपेक्षा अत्यंत प्रगत होती. इथे भाषा म्हणजे आपण फक्त माहितीची देवाणघेवाण या अर्थाने घेतोय, कशी असेल त्या मानवी समूहांची भाषा? त्यांचे सामूहिक जीवन कसे असेल? आज आपण या गोष्टीचा फक्त अंदाज करू शकतो पण तरी या संदर्भात आपण मानवाचा निकटचा शेजारी, चिम्पाजी, त्याच्या भाषेचा आणि समुदायाच उदाहरण समजून घेणे उपयुक्त ठरेल.

चिंपाजी साधारण 50 ते 100 च्या गटांमध्ये राहतात, फार कमी वेळा त्यांचे 100 पेक्षा मोठे कळप दिसतात. या कळपात अर्थातच एक अल्फा मेल असतो, हा या कळपाचा एका अर्थी राजा असतो. इतर सगळे चिंपाजी त्याला लवून आणि घशातून विशिष्ट आवाज काढत मानवंदना देतात, अगदी आपले पूर्वज राजाला मुजरा करायचे किंवा आपण बॉसला गुड मॉर्निंग करतो तसंच. हा अल्फा मेल गटातील इतरांची भांडण सोडवतो, कळपातील हिंसा रोखतो, कळपावर हल्ला झाल्यास स्वतः पुढे राहून नैतृत्व करतो. त्या बदल्यात त्याला कळपाने कमावलेल्या अन्नातील सर्वोत्कृष्ट अन्न खायला मिळतं आणि त्याच्या पसंतीच्या माद्यांशी मिलनाची आणि प्रजोत्पादनाची संधी मिळते. आता तुम्ही म्हणाल कि यात वेगळं काय आहे, कारण हेच आणि असंच लांडग्यांच्या, रानकुत्र्यांची आणि हरणांच्या कळपातही असतं, हि सामाजिक उतरंड बऱ्याच प्राण्यांमध्ये असते.
वेगळेपण आहे तो अल्फा मेल निवडण्याचा चिंपांजींच्या पद्धतीत..

लांडग्यांमध्ये, कुत्र्यांमध्ये, हरणांमध्ये सगळ्यात ताकदवान नर हा अल्फा मेल असतो मात्र चिंपांजिंमध्ये सगळ्यात ताकदवान चिंपांजी अल्फा मेल नसतो. अल्फा मेल हा एक प्रकारे निवडणुकीने ठरवला जातो, अगदी आपल्या सारखा..
जर समजा दोन किंवा तीन तगडे नर अल्फा मेल होण्याच्या शर्यतीत असतील तर ते आपल्या मागे टोळीतूनच आपला एक वेगळा गट उभा करतात, आपल्या टोळीतीलच काही नर आणि माद्यांना ते स्वतःला नेता म्हणून अनुमोदन देण्यास उद्युक्त करतात, यासाठी ते त्या नरांची गळाभेट घेतात, त्यांच्या पाठीवर थोपटतात, कधी लहानग्या पिल्लांचे पापे घेतात, त्यांच्याशी खेळतात, एकमेकांना आवडेल असे स्पर्श करतात. कधीकधी तर खायची वस्तूही शेयर करतात, थोडक्यात आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जे काही आणि जितकं काही केलं जाऊ शकत ते सगळं हे चिंपाजी उमेदवार करतात. अशा सगळ्या पद्धतीने जो चिम्पाजी उमेदवार स्वतःबद्दल जास्त विश्वास तयार करून, स्वतः मागे जास्तीत जास्त मोठा गट उभा करेल तो त्या कळपाचा अल्फा मेल बनतो. लक्षात घ्या, या प्रक्रियेत त्या नराची शारीरिक ताकद महत्वाची नसून त्याची त्या कळपातील प्रतिमा, त्याच्यावर श्रद्धा असलेल्या गटाची गणसंख्या आणि त्या गटाची शारीरिक ताकद हि महत्वाची आहे. थोडक्यात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करून हा चिंपाजी स्वतःची शारीरिक ताकद काही पटींनी वाढवण्यात यशस्वी ठरला..
इतिहासजमा झालेले सगळे मानव वंश जवळ जवळ अशाच पद्धतीने स्वतःचा नेता निवडत असावे.
मग होमो सेपियनचे वेगळेपण काय? ज्याला 70 हजार वर्षापूर्वी झालेली बौद्धिक क्रांती म्हणतात, ती नेमकी कोणती? तिचा भाषेशी काय संबंध? एक एक करून या प्रश्नांची उत्तरं शोधुया..

सगळ्यात आधी आपण भाषेकडे वळूया, भाषा म्हणजे माहितीच्या देवाण घेवाणीचे साधन, पण मानवी भाषा म्हणजे फक्त तितकेच नव्हे, कस ते बघूया..

प्रत्येक सजीव कुठल्या न कुठल्या प्रकारे संवाद साधत असतो, मानवी भाषा ही ध्वनी केंद्रित भाषा आहे, पण भाषा फक्त आवाजाचीच नसते. कित्येक कीटक रासायनिक भाषेत संवाद साधतात, अगदी आपल्या स्वतःच्या शरीरातील पेशीही एकमेकींशी रासायनिक भाषेत संवाद साधतात. अगदी ध्वनी आधारित भाषा जरी घेतली तरी मानवाच्या कंठाची ध्वनी निर्माण करण्याची क्षमता हि काही अनन्यसाधारण नव्हे. एखादा पोपट मानवाला येणारे सगळे शब्द तर बोलूच शकतो पण पोपटाला, घोड्याला आणि कोकिळेला येणारे आवाजही काढू शकतो, पण तरी पोपटाची भाषा हि मानवाच्या भाषिक कौशल्याच्या आसपासही पोहचू शकत नाही, हि गोष्ट अजून समजून घेण्यासाठी आपण पुन्हा चिंपाजीचे उदाहरण घेऊ.
इतर अनेक प्राण्यांसारखा चिंपाजीही स्वतःच्या कळापाचे रक्षण करण्यासाठी धोक्याच्या सूचना देतो, चिंपाजीचे दोन मुख्य शत्रू म्हणजे जमिनीवर फिरणारे सिंहासारखे हिंस्त्र प्राणी आणि आकाशात फिरणारे गरुडासारखे पक्षी. चिंपांजींच्या भाषेत या दोन शत्रूंसाठी वेगवेगळे संदेश आहेत. जेंव्हा शास्त्रज्ञांनी हे संदेश रेकॉर्ड करून वाजवले तेंव्हा त्या संदेशाला मिळालेला प्रतिसाद भिन्न होता. पहिला संदेश वाजवताच सगळे चिंपाजी सिंह जवळ आलाय असं समजून पटकन झाडावर पळाले, तर दुसरा संदेह वाजवताच सगळ्यांनी आकाशाकडे पाहिलं.
समजा, या ठिकाणी चिंपाजीऐवजी मानवाचा 5-6 लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज असता तर त्याने काय केलं असतं? नक्की माहीत नाही पण बहुदा एखाद्याने सिंह पाहिला असता तर त्याने लगेच सिंह कुठे आहे, किती मोठा आहे, काय करतो आहे, तो असलेल्या ठिकाणाकडे जाण्याचे रस्ते कोणते, त्यातला कोणता सुरक्षित हि सगळी माहिती आपल्या टोळीला दिली असती मग सगळ्या टोळीने मिळून त्या सिंहाला कसे हाकलायचे, किंवा त्यानी नुकतीच केलेली शिकार कशी लांबवयाची याचा प्लॅन केला असता.
मानव वंशातील सगळ्या प्राण्यांची भाषा इतकी विकसित नक्की होती. त्यांचे एकमेकांशी असलेले घट्ट संबंध, अग्नीचा हत्यारांचा वापर,  भित्तिचित्रे इत्यादिवरून आपण हे अनुमान नक्की काढू शकतो.

पण तरी हे सगळे कळप जास्त मोठे होऊ शकत नव्हते, जसा चिंपाजीचा कळप 100 पेक्षा मोठा झाला की फुटतो तसंच याही मानवांचे कळप एका मर्यादेपर्यंत वाढून फुटायचे आणि मग हे कळप एकमेकांचे हाडवैरी व्हायचे, का?

कारण बहुदा त्यांच्या भाषेत गॉसिप करण्याची सोय नव्हती.. होय बरोबर, गॉसिप किंवा गप्पा, कुटाळक्या, चहाड्या करण्याची सोय नसल्याने त्या आदिम मानवांची भाषा मागे पडली आणि ते होमो सेपियन बरोबरच्या संघर्षात हारले..

कसे ते बघू पुढच्या भागात..






मंगळवार, १४ मार्च, २०१७

"रंगपंचमी"

श्वासांची इथे कुणाच्या हमी आहे,
हरेक रंग कसा पुरा मोसमी आहे

पाहतो स्वप्नातही मी स्वप्न उद्याचे
इच्छांचे मृगजळ असे रेशमी आहे

वाहतो असह्य ओझे धपापल्या उरी
कदाचित हि आसवांची बेगमी आहे

आहे सुखात नि खुष कष्टात जिंदगी
इतकीच आजची ताजी बातमी आहे

आयुष्य निसटते हे चिमटीतुनी जरासे
खेळतो मनात मी रोज रंगपंचमी आहे

-शैलेंद्र

शनिवार, ११ मार्च, २०१७

#कोहम्
भाग 6
मागच्या भागात आपण, उत्क्रांतीच्या चक्रात मानव वंशात झालेले शारीरिक बदल पाहीले. मानवाच्या सगळ्याच प्रजाती साधारण 7/8 लाख वर्षांपासून अग्नी वापरत होत्या. त्यानंतर लवकरच त्यांना दगडी हत्यारांचा आणि ते बनवण्याच्या तंत्राचा शोध लागला. दात आणि नखं नसलेला, तुलनेने कमजोर माणूस हि दगडी हत्यारं वापरून स्वतःच पोट भरण्याचा प्रयत्न करायला लागला. इथे हे सगळे मानव वंशातले प्राणी स्वतःच पोट कसे भरत होते हे पाहणं महत्वाचं आहे.

प्रत्येक प्राणी आपल्या शारीरिक क्षमतेनुसार आपले भक्ष ठरवतो आणि स्वतःचे पोषण करतो. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सगळ्या सजीवांच्या शरीरात अव्याहत फिरत असते. प्रत्येक प्राण्याचे अन्नसाखळीतील स्थान तो हि ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या टप्प्यावर ग्रहण करतो, आणि त्याच्या कडून हि ऊर्जा कोण काढून घेते यावर ठरते. वाघ सिंहासारखे मांसाहारी प्राणी या पृथ्वीवर आल्यापासून या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी आहेत. हरीण, माकडं, म्हशी असे प्राणी पहिल्यापासूनच मधल्या स्थानावर आहेत. मानव हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचं अन्नसाखळीतील स्थान बदललंय. माकड आणि हरिणांबरोबर लाखो वर्ष अन्नसाखळीत मधल्या स्थानी राहिल्यावर काही हजार वर्षात मानवाने अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थान व्यापले, नुसते व्यापले नाही तर एकेकाळी सर्वोच्च स्थानी असलेल्या प्राण्यांसाठी आज मानव स्वतः अभयारण्य बांधतोय इतकी त्यांची परिस्थिती केविलवाणी झालीय. आणि हे सगळं घडतं असताना ना मानवाची शारीरिक ताकद वाढलीय ना त्याला नवीन प्रकारचे दात किंवा नखं आलीत. तो आहे तोच आणि तसाच आहे.
मग असं काय बदललं मानवी समाजात कि जे इतर कोणत्याही प्राण्याला कधीच जमलं नाही ते मानवाने, मानवी समूहाने करून दाखवलं? या प्रश्नाच्या उत्तराआधी आपण समाज म्हणजे काय ते समजावून घेऊ..

आपण बऱ्याचदा डिस्कवरीवर आफ्रिकन मैदानातील सिंह किंवा चित्त्याने केलेल्या शिकारीचे व्हिडिओ बघतो. बायसंन किंवा हरणांच्या मोठ्या कळपाच्या मागे हे हिंस्त्र श्वापद कधी एकटे किंवा कधी कळपाने धावतात, त्या कळपाला घेरतात. त्यातील जो कमजोर प्राणी असतो तो शिकार होतो, आणि उरलेला कळप पुढे निघून जातो. हे बघताना मला नेहमीच काही प्रश्न पडतात. बायसंन, जंगली म्हशी, अगदी झेब्रे या सारखे प्राणी जेंव्हा या शिकाऱ्यांना पाहतात, तेंव्हा पळणे हीच एकमेव नैसर्गिक प्रेरणा कशी जागृत होते? समजा सगळ्या जंगली म्हशी जर शिंग रोखून एखादं दुसऱ्या चित्त्यावर किंवा अगदी सिंहाच्या झुंडीवर चालून गेल्या तर काय होईल? दुसऱ्या बाजूला, सिंहांची झुंड एखादा प्राणी मारून का थांबते? खरंतर त्या म्हशींच्या कळपातले अजून दोन चार प्राणी, थोडीशी जास्त मेहनत घेऊन मारणे त्यांना सहज शक्य असतं, पण शक्यतो असं होतं नाही.

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्राणी समूहात कसे राहतात हे पाहणं मनोरंजक ठरेल.

अगदी ढोबळपणे प्राण्यांचे दोन तीन प्रकारचे समूह आढळतात, पहिला प्रकार ज्याला आपण कीटकांची वसाहत म्हणतो तो, जसं, मधमाशांचं पोळ, मुंग्यांच वारूळ इत्यादी. या वसाहतीतले प्राणी फक्त सामाजिक दृष्ट्या नव्हे तर जैविक दृष्ट्याही संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून असतात, इतके कि मधमाशी हा प्राणी आहे की मधमाशीचं संपूर्ण पोळ हाच एक प्राणी आहे हा प्रश्न पडावा. या वसाहतीतील प्रत्येक सजीवाचा जीवनक्रम आणि त्याचं कार्य हे ठरलेलं असतं. त्यात अजिबात बदल होत नाही. राणी माशी आयुष्यभर फक्त अंडी घालते पण कधीही पिल्लांचे पालनपोषण करत नाही. नर मधमाशा फक्त संकर करतात पण कधीही पोळ्याचे रक्षण करावे अशी इच्छा त्यांना होत नाही. अशा वसाहतीतला कोणताही सजीव एकटा जगू शकत नाही. आज कंटाळा आला, आज नुसतेच फुलं बघत फिरते, मकरंद उद्या गोळा करू अशी बुद्धी कोणत्याही कामकरी माशीला होतं नाही. या सजीवांना जणू वसाहतीच्या पलीकडे आयुष्यच नसतं. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या पेशी जसं वेगवेगळं पण नेमून दिलेलं काम करतात आणि शरीर नावाची संस्था चालवतात अगदी तसंच या मधमाश्या फक्त ठराविक काम करून पोळ हि वसाहत चालवतात, मग यात जिवंत प्राणी कुणाला म्हणावं, पोळ्याला कि मधमाशीला? वारुळाला कि वाळवीला? असो..

दुसऱ्या प्रकारचे समूह असतात ज्यांना आपण कळप, झुंड, टोळी अशा नावानी ओळखतो. या समूहातले प्राणी बऱ्याचदा एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक असतात. हे सगळे मुळात स्वतंत्र प्राणी असतात जे काही खास कारणांनी आणि नैसर्गिक प्रेरणेने एकत्र आलेले असतात. बायसंनचा, झेब्र्याचा कळप एकत्र फिरतो कारण कळपात असल्यास शिकार करणाऱ्या प्राण्यांपासून वाचण्याची, आणि आपले मरण कुणा दुसऱ्याच्या नावावर ढकलण्याची संधी जास्त असते. त्यापलीकडे या कळपातील प्राण्यांचे एकमेकांशी देणं घेणं नसतं. जितका मोठा कळप तितकी जास्त सुरक्षितता त्यामुळे अश्या कळपात अक्षरशः हजारोंच्या संख्येने प्राणी असतात. कोण येतं कोण जातं, कोण जगत कोण मरत,  कुणाला कुणाचा पत्ता नाही. ना त्यांचा कुणी नायक असतो ना पुढारी. दुसऱ्या प्रकारचे कळप मात्र वेगळे असतात, ह्या कळपातील प्राणी तसे संख्येने मर्यादित असतात, हत्तीचे कळप, माकडांची टोळी, रानकुत्र्यांची झुंड हि याची उदाहरण. या कळपात सामाजिक धागे घट्ट असतात. हत्तींचा कळप आपल्या समूहातील लहान पिल्लांची काळजी घेतो, मृत हत्तीच्या शरीरावर माती लोटतो. वानर संपूर्ण टोळीसाठी रखवालदारीचे काम करतो, लांडगे, रानकुत्री एकत्र ताळमेळ साधून शिकार करतात, त्या शिकारीतील वाटा लहान पिल्लांसाठी घेऊन येतात. अगदी व्यवस्थित नियमबद्ध असलेल्या, तरीही स्वतंत्र असलेल्या प्राण्यांचे हे समुदाय असतात. पण या समुदायातील प्राणी वेळ पडल्यास एकटे जगू शकतात. कधी काही कारणांनी, गरज पडल्यास एका टोळीतून दुसऱ्या टोळीतही जाऊ शकतात. पण…

हा पण फार महत्वाचा, कारण या समूहातल्या सदस्यांची संख्या ठराविकच राहते. हत्तींचा कळप 15/20 हत्तींच्या वर सहसा जात नाही, त्याहून जास्त हत्ती झाले की वेगळा कळप तयार होतो. माकडांची टोळी जास्त मोठी झाली की फुटते आणि काही माकडं दुसऱ्या टोळीत जातात. रानकुत्र्यांची किंवा लांडग्यांची टोळी जितकी मोठी तितकी शिकार मिळण्याची संधी जास्त पण तरी ती टोळी एका मर्यादेपेक्षा जास्त मोठी होतं नाही..  का?

जंगली म्हशी एकत्र येऊन सिंहाच्या टोळीवर हल्ला का करत नाहीत, लांडगे सहजपणे मिळणारी जास्तीची शिकार का सोडतात आणि आणि फक्त एक प्राणी सोडून इतर कोणत्याही प्राण्याचे कळप आपली संख्या एका मर्यादेपेक्षा का वाढवू शकत नाही या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे, पण त्या उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण तो प्राणी कोणता आहे ते पाहू, जो आपला प्रचंड मोठा कळप तयार करू शकतो आणि तरीही लांडग्यांच्या किंवा हत्तींच्या कळपाइतकेच किंवा जरा जास्तच घट्ट सामाजिक धागे विणू शकतो, त्या प्राण्याला हल्ली होमो सेपियन म्हणतात. शहाणा माणूस..

हा माणूस जेंव्हा शहाणा नव्हता तेंव्हा तोही माकडांसारखाच एका छोट्याश्या टोळीत राहायचा, ठराविक काळानंतर ती टोळी फुटायची, वेगळी टोळी तयार व्हायची. अशा अनेक टोळ्या करून वेगवेगळ्या प्रजातींची माणसं राहायची. अन्न मिळवण्यासाठी, आणि ते ज्या भूभागात मिळतं त्या जागेसाठी, तिच्या हद्दींसाठी एकमेकांशी लढायची. लाखो वर्ष माणूस असा राहिला. त्याच्या जवळ आग आणि काही प्रार्थमिक दगडी शस्त्र होते पण त्या शस्त्रांनी तो अगदीच कधीतरी शिकार करू शकायचा, हि दगडी शस्त्र मुख्यतः वाघ सिंहांनी खाऊन सोडून दिलेल्या हाडांमधले मगज कोरून बाहेर काढण्यासाठी वापरली जायची. कारण कमी श्रमात आणि कमी धोका पत्करत मिळू शकणारा तो सर्वोत्तम आहार होता. पण तरीही या मानवाचे स्थान अजूनही अन्नसाखळीत मध्यवरच होते. तो अजूनही फक्त माणूस होता त्याचा शहाणा माणूस होणे अजून बाकी होतं.. आज आपण ज्याला होमो सेपियन म्हणतो, अगदी तोच माणूस अजूनही सेपियन झाला नव्हता. होमो निण्डेरथाल, होमो इरेक्टस इत्यादी भावंडांबरोबर तोही लहान लहान टोळ्यांमध्ये जंगलात फिरत होता.

आणि मग साधारण 70000 वर्षांपूर्वी अचानक ती क्रांती झाली आणि या मानवाची भाषा बदलली, हा होमो सेपियन झाला.
कोणती क्रांती, बघूया पुढच्या भागात

बुधवार, ८ मार्च, २०१७

कित्येक वाटा अशा अज्ञात,
जिकडे पावलं वळलीच नाही,
कित्येक नाती अशी अनाथ
जी आयुष्याला कळलीचं नाही..

पावलांना ओढ आहे तोवर,
वाटांची आमंत्रण स्वीकारत जावू,
आणि जर संपली हि ईच्छा,
थकलेलं आयुष्य नाकारून पाहू..

-शैलेंद्र
कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..

पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..

-शैलेंद्र

सोमवार, ६ मार्च, २०१७

वारुणी

वारुणी

स्फटिकमनोहर बर्फ़ामधला हिरण्यकेशी झरा वारुणी
या काचेच्या  दुनियेमधला दोस्त एक तो खरा वारुणी

मनात नाचे दंभ अनावर दर्प नांदतो ज्याचा तनुवर
त्या दर्पाचे उघडून झाकण होते बदनाम जरा वारुणी

यश कुणाचे गगनभरारी, कुणी पाताळी होई कलेवर
भार वाहते निरिच्छ त्यांचा, घेते जिम्मा पुरा वारुणी

चंद्र उगवता आकाशातून शुक्र चाळवी मन कामातुर
ताठर तरी का अभिमानी मन म्हणते थोडे हरा वारुणी
-शैलेंद्र






शनिवार, ४ मार्च, २०१७

#कोहम्
भाग 5

जर आपल्याकडे आज (किंवा भविष्यात) टाइम मशीन असेल आणि त्यात बसून जर आपण लाखभर वर्षांपूर्वीच्या पूर्व आफ्रिकेत गेलो तर आपल्याला आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवांचे अनेक समूह दिसतील, लहान लहान मुलं आईच्या कडेवर बसलेली असतील, काही मागे फिरत असतील, पुरुष शेकोटीभोवती किंवा नुकत्याच मारलेल्या शिकारीभोवती बसून तिचे वाटे करत असतील, काही तरुण तरुणी स्वतःत मश्गुल असतील तर काही वृद्ध शांतपणे हे सगळं बघत, आपलं दुखर शरीर घेऊन बाजूला बसले असतील..

पण मग अगदी असंच चित्र तुम्हांला लांडग्यांच्या, म्हशींच्या, हत्तीच्या आणि माकडांच्या कळपातही दिसेल. मानवी कळपात आणि माकडांच्या/लांडग्यांच्या कळपात लाखभर वर्षांपूर्वी फक्त एक महत्वाचा फरक होता, तो म्हणजे मानवाने आगीवर नियंत्रण मिळवले होते. एक तेवढा फरक सोडला तर मानव अजूनही अत्यंत बिनमहत्वाचा आणि सामान्य प्राणी होतो. या पृथ्वीचा राजा होण्याचं स्वप्न त्याने अजूनही पाहिलं नव्हतं, किंबहुना असं काही असतं हि जाणीवच त्याला अजून झाली नव्हती.

तरीही अग्नीवर असणारं त्याच नियंत्रण, हे त्याच्या हाती असलेल्या एका हुकुमी एक्क्यासारखं होतं. अग्निवरच्या नियंत्रणाचे अनेक फायदे होते. पहिली गोष्ट म्हणजे जवळ येऊ पाहणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांना दूर ठेवण्याची शक्ती अग्निमध्ये होती. काही काळानंतर बहुदा मानवाने स्वतःहून जंगलांना आगी लावायला सुरवात केली. जाळलेलं जंगल म्हणजे जणू मानवाचं पहिलं स्वयंपाकघर होतं. जमिनीत गाडलेले अनेक कंदमुळं, बिळात लपलेले प्राणी हे जंगल पेटताच आयती शिकार होऊन मानवाच्या हाती सापडू लागले. पण आगीने अजून महत्वाची गोष्ट केली जी अन्यथा शक्य नव्हती. जे अन्न मानव कच्च खाऊ शकत नव्हता, तेही त्याला भाजून खाणं शक्य झालं. गहू ,तांदूळ, बटाटे, अनेक कंदमुळं हि कच्ची पचायला अत्यंत कठीण असतात. झाडावरची फळ हा माकडांचा मुख्य आहार होता, मानवाचा नाही, कारण दोन पायावर चालणारा जड मानव कधीही माकडाइतक्या चपळाईने झाडावर चढू शकत नव्हता. पण कच्च अन्न खाणाऱ्या चिंपाजीला ते पाच तास चघळावं लागतं तिथे मानव अवघ्या एका तासात चर्वण करून मोकळा व्हायला लागला. तेही अग्नितून भाजून आलेलं आणि बऱ्यापैकी निर्जंतुक झालेलं अन्न..

अनेक शास्त्रज्ञांच्या मते, अग्नीने अजून एक महत्वाचा बदल मानवी शरीरात घडवला, भाजलेले आणि पचायला हलके अन्न खायला लागल्यावर मानवाला खूप मोठ्या आतड्याची गरज उरली नाही. त्यामुळे मानवाच आतडे हळूहळू आकसायला लागले. शरीरातल्या दोन अवयवांना खूप जास्त ऊर्जा लागते, एक म्हणजे आतडी, दुसरा मेंदू. आतडी लहान व्हायला लागली तशी हि वाचलेली ऊर्जा मेंदूकडे वळवली गेली, या उपलब्ध फ्री ऊर्जेमुळे हळूहळू मानवी मेंदूचा आकार वाढायला लागला. मानव एका वेगळ्या वाटेवर चालायला लागला.

अर्थात वाढलेला आणि मोठा झालेला मेंदू हि काही सांभाळायला सोपी गोष्ट नव्हती, त्याचेही स्वतःचे असे खास प्रॉब्लेम होते. जितका मोठा मेंदू तितकी ऊर्जेची गळती. त्या काळात, जेंव्हा अन्नाचा प्रत्येक कण हा रक्त सांडवून मिळवावा लागायचा तेंव्हा असा मेंदू सांभाळणं हि अत्यंत जिकरीची गोष्ट होती. मानवी मेंदू हा वजनाने शरीराच्या फक्त 2-3% असतो पण अगदी विश्रांती घेत असतानाही, तो शरीरातली 25% ऊर्जा वापरतो. जर मोठा मेंदू हि इतकी चांगली गोष्ट असती आणि तिचे काहीच तोटे नसते तर संपूर्ण प्राणी जगतात मोठा मेंदू असलेल्या प्राण्यांचे प्राबल्य असते. पण तशी काही परिस्थिती नाही.

मोठ्या आकाराच्या मेंदूचे मानवाला दोन तोटे झाले, एकतर त्याला ऊर्जेची गरज भागविण्यासाठी जास्त वेळ अन्न शोधण्यात घालवावा लागला, आणि दुसरं त्याचे स्नायू कमजोर झाले. जसं एखादं लोकशाहीवादी पुरोगामी सरकार आपल्या संरक्षण खात्यातील तरतूद कमी करून ती शिक्षण खात्याकडे वळवते, तशी मानवाने स्वतःच्या स्नायूंची ऊर्जा कमी करून ती मेंदूकडे वळवली. आफ्रिकेच्या जंगलात किंवा कुरणांमध्ये हे कितपत फायदेशीर होतं माहीत नाही. एखादा गोरिला कधीही माणसाबरोबर वाद विवादात जिंकू शकत नाही पण तो त्याला हरवणाऱ्या माणसाला उभा फाडू शकतो.

मोठ्या मेंदूमुळे सगळ्यात जास्त नुकसान सुरवातीच्या काळातल्या स्त्रियांचं झालं. एकतर मनुष्य हा दोन पायांवर चालणार प्राणी, त्यामुळे गर्भाशयाचा आकार मर्यादित, त्यात लहान कटीभाग. जर आपण आपल्याच उंचीच्या माकडाचा कटीभाग पाहिला तर हा फरक लक्षात येईल. या छोट्या जागेत या स्त्रियांना अशी बाळं वाढवायची होती ज्यांचा मेंदू सतत मोठा होतं होता आणि मेंदू बरोबरच डोकं.. हे मोठं डोकं असलेली मुलं शरीराबाहेर काढणं हे मानवी स्त्रीसाठी प्रचंड कठीण काम आहे. आजही मानवी स्त्रीइतक्या प्रसववेदना प्राणीजगतातली कोणतीही मादी बहुदा सहन करत नाही. त्या सुरवातीच्या काळात बहुदा कित्येक मुलं आणि स्त्रिया बहुदा अशाच मेल्या असाव्या.

या समस्येवर उत्क्रांतीच्या चक्रात एक तोडगा मिळाला, अशा स्त्रिया, ज्यांची मुलं अपुरी वाढ झालेली असतानाच जन्माला यायचे, त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या जगण्याची शक्यता वाढली. भले अपुरी वाढ झाली असल्याने बऱ्याच मुलांचे बालमृत्यू होतं असतील पण आईचा मृत्यू होण्यापेक्षा हे चांगलं. त्यामुळेच बाळाचा मेंदू आणि डोकं लहान असतानाच मानव प्राणी त्याला जन्म देऊ लागला. आजही आपण तुलना केल्यास मानवी बाळं खूप जास्त काळ आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतं, याच साधं कारण हे आहे की ते मुळातच अविकसित अवस्थेत जन्माला येतं.

अर्थात या गोष्टीचे काही फायदेही झाले, अविकसित अवस्थेतील बालकांना सांभाळणे आणि स्वतःच, तसंच त्यांचं अन्न गोळा करणे हे मानवी आईसाठी खूप कठीण होतं, त्यातूनच हळूहळू कुटुंबसंस्था आणि समाज व्यवस्था उदयाला आली. उत्क्रांतीच्या ओघात ज्या मानवी प्रजाती असे सामाजिक बंध आणि रचना इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे विकसित करू शकल्या त्या टिकल्या, इतर नष्ट झाल्या. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे, मानवी बाळ अविकसित अवस्थेत जन्माला आल्याने त्याला साच्यात घडवणं सोपं झालं, त्याला शिकवणं सोपं झालं.

अशा प्रकारे अग्नीचे नियंत्रण करू शकणारा मानव आणि इतर प्राणी यांच्यात हळू हळू एक दरी तयार होतं गेली. बहुतेक प्राणी त्यांच्या जीवितासाठी स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहतात पण मानव मात्र बाहेरची साधनं वापरू लागला, अगोदर अग्नी आणि मग हत्यारं..

तरीही, इथे हे लक्षात घ्यायला हवं, कि हि सगळी उत्क्रांती सगळ्या मानव वंशात होतं होती, फक्त होमो सेपियन मध्ये नाही. पण मग फक्त होमो सेपियनच का शिल्लक राहिले? इतर वंश कुठे गेले?

या बद्दल अनेक शक्यता आणि वाद आहेत पण बहुदा या यशाचं कारण तेच आहे, जिच्यामुळे हे वाद घालणं शक्य होतंय…
ते कारण आहे होमो सेपियनची बऱ्यापैकी खास आणि अनोखी असलेली भाषा..
कसं ते पुढच्या भागात बघू..

गुरुवार, २ मार्च, २०१७


#कोहम्
भाग 4
मागच्या भागात आपण होमो या मानवाच्या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेतली आणि त्याच बरोबर त्यांची थोडीशी वैशिष्टही समजून घ्यायचा प्रयत्न केला.

पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती अशी की या प्रजातींना जरी आपण वेगवेगळ्या स्पिसीज म्हणत असलो तरी याचा अर्थ हा नाही की त्या गाढव आणि घोड्यासारख्या, बऱ्याचश्या मिळत्या-जुळत्या दिसणाऱ्या पण जनुकीय दृष्ट्या पूर्ण वेगळ्या प्रजाती होत्या, आणि असाही नाही की त्या कुत्र्याच्या जातींसारखे फक्त दिसायला वेगळे पण सहजपणे संकर होऊ शकणारे प्राणी होते. उत्क्रांतीच्या पट्टीवर हे सगळे जीव आणि समुदाय कुठेतरी मध्ये उभे होते. कसे? सांगतो,

एकत्र कुटुंबातून जेंव्हा एखादं जोडपं वेगळं निघून स्वतःच घर करतं, तेंव्हा त्याचे काही टप्पे असतात, सुरवातीला झोपायची खोली वेगळी होते, मग वस्तू वेगळ्या होतात, हळूहळू चूल वेगळी होते आणि मग ते कुटुंब वेगळं घर म्हणून ओळखलं जातं. निसर्गात जेंव्हा एखादी नवीन प्रजाती तयार होते, तेंव्हा अर्थातच ती एकदम अवतीर्ण होतं नाही. तिचे कुणीतरी पूर्वज असतात, या पूर्वजांपासून एकाच वेळी अनेक प्रजाती फुटून जगात येण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थातच या सगळ्या प्रजाती आपल्या पूर्वजाशी आणि एकमेकांशी अत्यंत सारख्या असतात. त्या एकमेकांशी सहजपणे संकर करू शकतात, त्यांना अपत्य होऊ शकतात आणि त्या अपत्यांनाही पुढे संतती होते. उत्क्रांतीचा हा प्रवाह असा एखाद्या पाण्याच्या अनिर्बंध लोंढ्यासारखा ज्या दिशेने वाट मिळेल तिकडे सुसाटत पुढे जात असतो. ज्या प्रवाहात जास्त पाणी असेल तो इतरांना आपल्याकडे खेचतो आणि मग त्याची नदी बनते, तसंच ज्या प्रजाती जास्त अपत्य जन्माला घालून त्यांना जगवू शकतात त्या प्रजाती यशस्वी होतात आणि इतर त्यांच्यात विलीन होतात किंवा संपून जातात. उत्क्रांतीच्या पट्टीवर असा एक बिंदू येतो, ज्याच्या मागे या सगळ्या प्रजाती एकमेकांशी मिसळू शकत असतात आणि ज्याच्या पुढे त्यांच्यातील संकर अयशस्वी ठरतो. मानवी इतिहासात हा बिंदू साधारण 50000 वर्षांपूर्वी आला असं मानलं जातं.

हे अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला, उत्क्रांती कशी होते आणि सजीव आपल्या पर्यावरणाला प्रतिसाद देतं स्वतःला कसे बदलतात, हे समजून घ्यावं लागेल. यासाठी आपण एक साधं उदाहरण घेवू, DDT आणि डासांचे..
Dichlorodiphenyltrichloroethane किंवा मराठीत DDT हे एकेकाळी रामबाण कीटकनाशक समजलं जायचं. हे कीटकांच्या मज्जातंतूतले सोडियम आयन चॅनेल ओपन करतं आणि मज्जासंस्था विस्कळीत करतं, विस्कळीत झालेल्या मज्जासंस्थेसह कोणताही कीटक जास्त काळ जगू शकत नाही, पुनरुत्पादन करू शकत नाही, तो मरतो. पण काही कीटक मात्र या DDT ला दाद देतं नाहीत, का? कारण त्यांच्या जनुकात जरासं वेगळेपण असतं. हे वेगळेपण म्युटेशन नावाच्या एका अपघाती जनुकीय बदलामुळे येतं. या बदलामुळे हे कीटक इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारची प्रथिनं तयार करतात आणि हि प्रथिनं असल्याने DDTचा त्यांच्यावर परिणाम होतं नाही. साहजिकच इतर कीटक जेंव्हा DDT ने मरत असतात तेंव्हा हे मात्र सुखनैव वाढतात, त्यांची संतती वाढते, त्यांच्यातील ते जनुकीय वेगळेपण असलेलं म्युटेशन सगळ्या किटकांमध्ये पसरतं आणि हळूहळू हि कीटकांची संपूर्ण जात त्या DDT ला दाद देईनाशी होते. हल्ली डास DDT ने अजिबात मरत नाहीत याचं कारण हे आहे. हि आहे डासांची उत्क्रांती.. जया पद्धतीने साध्या डासांपासून DDT प्रूफ डास तयार झाले, साधारण त्याच पद्धतीने लांब मानेचा जिराफ, सोंड असलेला हत्ती, नखं असलेला सिंह आणि दोन पायांवर चालणार माणूस तयार झाला.

आणि याचं पद्धतीने साधारण 50000 वर्षांपूर्वी मानवी वंशात असा एक बिंदू आला की त्याच्या पुढे होमो सेपियन हा इतर सगळ्या होमो प्रजातींपासून पूर्ण वेगळा झाला, त्यापुढे त्यांच्यात यशस्वी संकर घडले नाही.

इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे म्युटेशन हे अपघाती असतं. निसर्गात होणारे जनुकीय बदल हे अपघाती आणि दिशाहीन असतात. आपण अमुक बदल केला तर DDTचा आपल्यावर परिणाम होणार नाही हे कोणत्याही डासाला माहीत नसतं. त्याच्या शरीरात तो बदल अपघाताने होतो आणि जर तो फायदेशीर असेल तर तो डास जास्त जगतो. जास्त जगल्यामुळे त्याला पुनरुत्पादनाच्या जास्त संधी मिळतात आणि त्याचा फायदा आपोआप त्याच्या वंशजांना मिळून संपूर्ण प्रजातीत त्यांचे प्राबल्य वाढते. आपल्या हाताच्या अंगठ्याचे बोटं इतर चार बोटांपेक्षा दूर असले तर आपली पकड अजून मजबूत होईल हे आपल्या पूर्वजाला माहीत नव्हतं, पण अपघाताने असा एखादा जन्माला आला, मग या सोयीमुळे तो जास्त जगला, त्याला जास्त मुलं झाली आणि हळूहळू आपल्या सगळ्यांचे अंगठे माकडांना ठेंगा दाखवण्या इतपत बदलले. थोडक्यात, Nature is enormous but not intelligent.  मानव मात्र फार पूर्वीपासून स्वतःला हवे ते जनुकीय बदल असलेले सजीव वाढवतोय, हल्ली तर तयार सुद्धा करतो.

उत्क्रांती आणि तिच्या कारणांबद्दल हे सगळं जाणून घेतलं कि आपण परत एकदा 2 लाख वर्षा पूर्वीच्या त्या पृथ्वीवर परत येऊ, जिथे एकाच वेळी अनेक मनुष्य जाती वसत होत्या, टोळ्या करून राहत होत्या. होमो इरेक्टससारख्या काही तब्बल 18 लाख वर्ष स्वतःला घडवत होत्या तर होमो सेपियन हे नुकतेच आपल्या पितामहांपासून वेगळे निघाले होते. अजूनही अनेक ठिकाणी, खास करून आफ्रिकेत नवीन नवीन प्रजाती जन्माला येतं होत्या आणि काही नाहीशा होतं होत्या.

अशा परिस्थितीत असं काय घडलं, असा कोणता बदल पुढे आला की होमो सेपियनने इतर सगळ्या प्रजातींना मागे सारून या पृथ्वीवर एकछत्री अंमल सुरु केला? त्याच्यापेक्षा जुना होमो इरेक्टस किंवा अत्यंत बलवान आणि मोठा मेंदू असलेला निण्डेरथल इथून कसा नाहीसा झाला?

बघूया पुढच्या भागात..

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

#||कोहम्||
भाग 3

1856 च्या ऑगस्ट महिन्यात, जर्मनीमधल्या निअंडरथल दरीत काही मजूर काम करत होते, एका चुन्याच्या खाणीत त्यांना काही हाडं सापडली. अशी हाडं सापडण्यात फार विशेष काही नव्हतं पण तरी त्यांनी ती एका स्थानिक अभ्यासकाला दिली. सुरवातीला वाटलं की ही एखाद्या अस्वलाची हाडं असतील, पण जेव्हा ती नीट जुळवली गेली तेंव्हा त्यांनी एक वेगळाच ईतिहास समोर आणला, 40000 वर्षांपूर्वी नाहीशा झालेल्या आपल्या सख्ख्या चुलतभावांचा इतिहास, जो आजही आपल्या प्रत्येक पेशीत स्वतःच अस्तित्व ठेवून आहे.

हे होते होमो निअंडरथल, आपल्या अगोदर जग व्यापणारे, आपल्याहून ताकदवान, आपल्यापेक्षा मोठा मेंदू असणारे मानव..जे अवघ्या 30000 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या बरोबर नांदत होते.

आणि गम्मत म्हणजे ते एकटे नव्हते, हळू हळू शास्त्रज्ञांना आणि पुरात्त्ववेत्यांना अनेक मानवी वंश सापडले, जे काळाच्या ओघात नष्ट झाले होते, त्यातले महत्वाचे काही,

होमो इरेक्टस



हा ताठ कण्याचा सरळ उभा राहणारा माणूस पूर्व आशियात रहायचा, हा आजवर सगळ्यात जास्त काळ पृथ्वीवर टिकलेला माणूस, जवळ जवळ 20 लाख वर्ष हा पृथ्वीवर होता. आपल्या वंशाचे वय अवघे 2 लाख वर्ष आहे, आणि आपण होमो सेपियन म्हणून अजून 2000 वर्ष तरी राहू कि नाही ते सांगता येतं नाही, हे बघता या चुलतभावाची कमाल वाटते, आणि हो, बहुदा आगीचा वापर यांनीच प्रथम केला, आणि आपल्याला शिकवला. हा आपल्या भारतात रहायचा साधारण 60/70 हजार वर्षापूर्वी पर्यंत, नंतर तो नाहीसा होतं गेला.

होमो फ्लोरिसीएनसिस


इंडोनेशियात फ्लोरिस नावाचं एक बेटं आहे, समुद्राची पातळी कमी असताना, मानवाचे काही पूर्वज तिथे गेले आणि समुद्राची पातळी वाढल्यावर तिथेच अडकले. त्या लहानश्या बेटावर त्यांना फारसं काही खायला नव्हतं, त्यामुळे त्यांचा आकार लहान लहान होतं गेला. कसा? सोपं आहे, ज्यांचा आकार मोठा होता त्यांना जास्त खायला लागायचं, अन्न न मिळाल्याने ते लवकर मेले तर ज्यांची भूक आणि शरीरयष्टी लहानखुरी होती ते प्रजनन करत राहिले. शेवटी असा माणूस निपजला ज्याची उंची 3 फूट आणि वजन 25 किलो होतं. तरीही ते दगडी हत्यारं बनवायचे आणि हत्तींची शिकारही करायचे, पण खरं सांगायचं तर ते हत्तीही बरेचसे बारीक आणि बुट्टे होते.


होमो हबिलिस


बहुदा पहिला मानव ज्याने दगडी हत्यारं बनवली, आजच्या मानवापेक्षा दिसायला अगदी वेगळा, साधारण दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंत हा आफ्रिकेत वावरत होता.

होमो हैडेलबेर्गेंसिस

बरेच मानववंश शास्त्रज्ञ याला आपला पितामह मानतात, फक्त आपलाच नाही, इतरही काही प्रजातींचा.. साधारण 6 लाख वर्षांपूर्वी आफ्रिका, मध्य आशिया आणि युरोपात हा वावरत होता.


होमो नालेंदी



अगदी आपल्यासारखेच पाय असलेला हा आपला पूर्वज, स्वतःच्या समाजातील मृतांना एकत्र पुरायचा. साधारण 6/7 लाख वर्षापर्यंत याचं अस्तित्व सापडतं.


होमो निअंडरथलेसिस




हा आपला सगळ्यात महत्वाचा शेजारी, अवघ्या 30000 वर्षांपूर्वीपर्यंत आपण एकत्र राहायचो, मारामाऱ्या करायचो, शिकारी करायचो, एकमेकांच्या लोकांना, खासकरून बायकांना पळवायचो. हा आपल्यापेक्षा ताकदवान, आपल्यापेक्षा कणखर.. थंड प्रदेशात मुरलेला आणि शिकारीत तरबेज, लाखभर वर्षांपूर्वी जेंव्हा होमो सेपियन आणि निअंडर थल युरोपात सामोरासमोर आले, तेंव्हा त्यांनी सेपियन्सला परत आफ्रिकेत हाकलून दिलं. कित्येक हजार वर्षे ते युरोपचे अनभिषिक्त राजे होते. आजही युरोपीय वंश जो वेगळा दिसतो तो यांच्यामुळेच.. कसं ते पुढे बघू..

या सगळ्यांबद्दल माहिती घेतल्यावर पुढचा प्रश्न उभा राहतो, कि हे सगळे गेले कुठे आणि कसे? 

या संदर्भात दोन शक्यता सांगितल्या जातात, एकीला म्हणतात रिप्लेसमेंट थिअरी आणि दुसरीला म्हणतात इंटरब्रिडिंग थिअरी. 

रिप्लेसमेंट थिअरी अगदी सोपी आहे, सेपियन्स आफ्रिकेतून आले, त्यांनी पाहिलं, ते लढले आणि ते जिंकले.. राजकीय दृष्ट्या अत्यंत सोयीची अशी ही थिअरी, कारण या थिअरीनुसार अस्तित्वात असलेले सगळे मानव हे एकाच वंशाचे ठरतात. तुम्हीं आम्ही सेम.. 

इंटरब्रिडिंग थिअरी मात्र जरा किचकट आहे, वादग्रस्त आहे.. कशी ते बघा, 
या थिअरीनुसार होमो सेपियन आफ्रिकेतून निघाले, मग ते युरोपात निअंडरथलला भेटले, त्यांच्याशी संबंध आला, त्यांना मुलं झाली, आणि एक वेगळा मिश्र वंश तिथे अस्तित्वात आला. काही सेपियन भारतात किंवा चीनमध्ये आले, होमो इरेक्टसला भेटले आणि तिथे त्यांचा एक वंश सुरु झाला.

म्हणजे आपण सगळे वेगळे, एकमेकांचे सख्खे चुलतभाऊ, आपले जनुकीय नकाशे वेगळे. अत्यंत गैरसोयीच असलेलं हे सत्य, सत्य यासाठी कि युरोपीय आणि माध्यपूर्वेतल्या लोकांनी त्यांचा वर्ण आणि उंची हे निअंडरथलकडून घेतलाय. या वंशाच्या लोकांमध्ये 1 ते 3 % निअंडरथल DNA आढळतो. 

ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये निअंडरथल DNA अजिबात नाही पण तिथे होमो डेंनीसोवा नावाच्या मानवाचा DNA चांगल्या प्रमाणात आहे, आणि ह्या डेनिसोवाचे अवशेष आढळले कुठे, तर सैबेरियात... कुठे ऑस्ट्रेलिया कुठे सैबेरिया..

हे सत्य म्हणजे जणू एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे..

होमो सेपियनने या मानावांवर विजय मिळवला, पण स्वतःच्या पेशीत नोंदवलेल्या या इतिहासावर तो कसा विजय मिळवेल?

पुढच्या भागात आपण पाहू होमो सेपियानाच्या या विजयाचे कारण..

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

#||कोहम्||
भाग 2

मागील भागात आपण शास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आणि शास्त्रीय सिद्धांताबद्दल जाणून घेतलं, पण या लेखाच्या शिर्षकाप्रमाणे हा मुख्यतः स्वतःला जाणण्याचा प्रवास आहे, स्वतःला म्हणजे मानव वंशाला..

चला तर मग करूया सुरवात, आपल्या नावापासून..

"होमो सेपियन" म्हणजे शहाणा माणूस, पण कोणापेक्षा शहाणा? आणि मग इतर माणसं कोण?

या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला ही शास्त्रीय नावं कशी ठेवली जातात ते जाणून घ्यावं लागेल, फार सोपं आहे.

आपल्याला घोडा आणि गाढवं तर माहीतच आहेत, घोड्याचं शास्त्रीय नावं आहे (Equus ferus caballus)  आणि गाढवाचे शास्त्रीय नाव आहे (Equus africanus asinus).
यातला पहिला शब्द समान आहे, त्याला म्हटलं जातं genus, अनेकवचन Genera. घोडा आणि गाढवं हे दोघंही एकाच जिनसमधून आलेत याचा अर्थ असा की त्यांचा पूर्वज, ज्या पासून या दोघांची उत्क्रांती झाली, तो एकचं होता. 

दुसरा शब्द आहे तो आहे "species". स्पिसीज खूप महत्त्वाची, ती आपण जरा विस्ताराने बघू..

आपल्याला माहित आहे की हिमालयात आणि इतरही काही ठिकाणी, सामान वाहण्यासाठी खेचर वापरतात. हे खेचर म्हणजे घोडा आणि गाढवं यांच्यात कृत्रिमपणे केलेला संकर. निसर्गतः घोडा आणि गाढवं शक्यतो संकरीत पिल्लांना जन्म देतं नाहीत, कारण त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक आकर्षण नसते, शिवाय जरी त्यांचा संकर झाला तरी खेचर, हे नपुंसक असतात, त्यांचा वंश वाढू शकत नाही. याचं कारणाने जरी घोडा आणि गाढव यांचा संकर शक्य असला तरी त्यांना वेगळ्या गटात ठेवलं आहे, त्यांची स्पिसिज वेगळी. 
याउलट कुत्र्याचे उदाहरण घ्या, गाढवाइतका मोठा ग्रेटडेन आणि छोटासा पॉकेट पामेरियन, दोघंही एकाच स्पिसिज मधले कारण त्यांचा संकर होऊ शकतो आणि त्यांची पिल्लं जन्माला येऊन पुढे पुनरुत्पादन करू शकतात.

तिसरा शब्द आहे तो sub species, हे वर्गीकरण गाढवं घोडे व इतर काही प्राण्यांमध्ये पहायला मिळतो, कारण आजही या प्राण्यांच्या जंगली प्रजाती अस्तित्वात आहेत. अनुवंशिकदृष्ट्या बऱ्यापैकी वेगळ्या प्राण्यांसाठी सब स्पिसिज हा खास प्रकार आहे. हे प्राणी सहजपणे एकमेकांशी संकर करू शकतात आणि जन्मास येणारी प्रजाती पुढील पुनरुत्पादनास सक्षम असते.

तर आपलं नाव आहे होमो सेपियन, होमो या जिनस मधली सेपियन हि स्पिसिज.. खरी गंमत आहे ती इथे, ती अशी की होमो या जेनेरामधली अस्तित्वात असलेली ही एकमेव स्पिसिज आहे, इतर सगळ्या नष्ट झाल्या किंवा होमो सेपियन या स्पिसीजने त्यांना कत्तल करून किंवा स्वतःत सामावून घेऊन नष्ट केल्या. म्हणूनच बरेच शास्त्रज्ञ ह्यूमन हि संज्ञा त्या सगळ्या प्रजातींना मिळून वापरतात आणि आजच्या आधुनिक माणसाला सेपियन म्हणतात. 

साधारण 60 लाख वर्षांपूर्वी, कुठेतरी एका मर्कट वंशीय मादीला 2 पिल्लं झाली, त्यातली एक पुढे चिंपाजी झाली आणि दुसरी, आपली खापरपणजी होती.

साधारण 25 लाख वर्षांपूर्वी पहिल्या मानवाने, म्हणजे होमोने या जगात पाय ठेवला. पण मानवाचा पूर्वज त्याच्याही खूप आधी जन्माला आला होता. अगदी सगळे मानवसुद्धा सेपियन नव्हते.

कोणती माणसं होती हि? ती कधी होती या पृथ्वीवर? आपल्या किती आधी? त्यांच्यातला शेवटचा माणूस कधी अस्तित्वात होता? 

आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ते सगळे होमो सिपीयन्सशी लढताना किंवा एकत्र वावरताना का हरले? ते नामशेष कसे झाले? आज आपला त्यांच्याशी काय संबंध उरलाय?

पुढच्या भागात आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करू.
-शैलेंद्र
गाभाऱ्यात सजवून ठेवलेला देवही,
कधीतरी फार कंटाळत असेल,
एखादा जोरदार आळस देऊन तो,
बाहेरच्या पायरीवर येऊन बसेल..

आणि बाहेरून बघेल तो रिकामपण
गूढ, मंदिरभर भरून राहिलेलं,
तितकंच पवित्र जितकं त्या नास्तिकाने
तो आत असतानाही पाहिलेलं..
-शैलेंद्र
नाना आणि तात्या, दोघ शेतकरी,

नानाच कुरण तसं जुनं, नानाचे बैल मस्त पोसलेले, नानाच गवत जोरात वाढायच, बैल चरून तुस्त व्हायचे..
तात्यांची जमीन खडकाळ, जागाही लहान, पण तात्यांकडे बोकड होते, ते बिचारे दिवसभर खुराने जमीन उकरत काही तरी खायचे, मधूनच एखादं झाड ओरबाडायचे, कधी नानाच्या शेतात घुसायचे, स्वतःच्याच लेंड्या शेतात जिरवून जमिनीचा कस वाढवायचे..

हळूहळू गम्मत व्हायला लागली, तात्यांचे काही बोकड कुठून काय खाऊन आले काय माहित, पण त्यांनी टाकलेल्या लेंड्यांमधून एक वेगळंच भगवं गवत उगवलं, सुसाट वाढायला लागलं, इतकं कि या बोकडानी कितीही खाल्लं तरी संपेना..तिकडे नानाच्या शेतावर आक्रीत घडलं, सारखं गवत काढून काढून जमीन थकली, त्यातच काही बैलांनी मस्ती करून गवत झोपवलं, ते गवत सीडलेस जातीचं, सिंचनाशिवाय, खताशिवाय ते परत येईना.. नानाचे बैल उपासमारीने मरतील कि काय, अशी वेळ आली.

पण नाना मोठा हुशार, धोरणी.. त्यांनी काय केलं, बैलांना एक शिट्टी शिकवली, शिट्टी मारली कि बैल परत येणार.. शिक्षण पूर्ण झाल्याची जशी खात्री झाली तशी त्याने ती शिट्टी तिजोरीत ठेवून दिली.. मग तो गेला तात्याकडे, बैठका झाल्या, अटी शर्ती झाल्या.. नानाचे बैल तात्यांच्या कुरणात सोडायचे, त्या बदल्यात बैलाच दूध तात्याने घ्यायचं आणि बैलाला वासरू झालं तेही तात्यांच्या मालकीचं, असा पक्का शब्द दिला गेला..

आता नानाचे बैल तात्यांच्या कुरणात मस्त चरतायेत, तात्यांचे बोकड  घाबरून कडेला बसलेत...

आणि तात्या बैलाला वासरू व्हायची आणि मग दूध काढायची स्वप्न बघतोय. नाना हळूच तिजोरीतल्या शिट्टीकडे बघून हसतोय..

आणि हो, या पोस्टचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही.. निवडणुकांशी त्याहून नाही.

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

||कोहम्||
भाग 1

साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा..

वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं..

या महास्फोटानंतर साधारण 3 लाख वर्षांनी, पदार्थ आणि ऊर्जा यांच्यात अभिसरण सुरु झालं, या दोन घटकांनी एकमेकांना एका आकृतिबंधात बांधलं, ज्याला आपण ऍटम किंवा अणू म्हणतो. या अणूनी स्वतःला पुन्हा काही विशिष्ट प्रकारे रचून घेतलं, ज्याला आपण आज रेणू म्हणतो. या अणू रेणूंच्या आणि त्यांच्या एकमेकांतील संबंधांच्या अभ्यासाला रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री म्हणतात.

साधारण 4 बिलियन वर्षांपूर्वी, पृथ्वी नावाच्या एका ग्रहावर, काही विशिष्ट रेणू, विशिष्ट उर्जेच्या संपर्कात असताना एकत्र आले, त्यातून सजीव नावाची एक गुंतागुंतीची आणि मोठे रेणू असलेली रचना तयार झाली, या सजीवांच्या अभ्यासाला जीवशास्त्र किंवा बायोलॉजी म्हटलं जातं.

साधारण 70000 वर्षांपूर्वी या सजीवांमधल्या होमो सेपियन नावाच्या एका प्रजातीने अजूनच गुंतागुंतीची आणि विस्तृत रचना तयार केली, तिला संस्कृती म्हटलं जातं, या संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास..

आता हे सगळं वाचल्यावर पहिला प्रश्न पडतो की हे खरं कसं मानायचं?, हा प्रश्न खास करून दोन घटनांबद्दल पडू शकतो, पहिली म्हणजे बिग बँग सिद्धांत आणि दुसरी सजीवांच्या उत्पत्तीचा सिद्धांत.. या दोन्ही घटना तापासण्यापूर्वी आपणं प्रथम सिद्धांत म्हणजे काय ते जाणून घेऊया..

सिद्धांत म्हणजे नियम नव्हे, सिद्धांतात काही नियम अंतर्भूत असतात पण स्वतः सिद्धांत म्हणजे नियम नाही. सिद्धांत हा एखाद्या श्रद्धेसारखाच निरीक्षकाच्या मनात असतो. पण श्रद्धेशी असलेले त्याचे सारखेपण तिथेच संपते, कारण कोणत्याही सिद्धांताला खरं ठरण्यासाठी दोन कसोट्या पूर्ण कराव्या लागतात, पहिली म्हणजे त्या सिद्धांतांशी निगडित असलेली सारी आणि खूप निरीक्षण, त्या सिद्धांतानुसार तपासता आणि सिद्ध करता आली पाहिजेत, आणि दुसरी म्हणजे त्या सिद्धांतानुसार पुढे केल्या जाणाऱ्या अनेक निरीक्षणांचे भाकीत त्याला वर्तवता आले पाहिजे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जसं सफरचंद झाडावरून का पडतं हे सांगू शकतो तसंच सूर्य चंद्र आणि ताऱ्यांचे एकमेकांभोवती होणारे भ्रमण आणि त्याचा वेगही अचूकपणे वर्तवू शकतो.

तुम्हीं सिद्धांत कधीच सिद्ध करू शकत नाही, तो नेहमीच एक शहाणा अंदाज किंवा ठोकताळा राहतो कारण कितीही निरीक्षण त्या सिद्धांतानुसार खरी ठरली तरी पुढचं निरीक्षण तसं ठरेलच असं नाही. सगळे शास्त्रीय सिद्धांत या चक्रातून गेलेत, आणि या पुढेही जातील. ज्या क्षणी त्या सिद्धांताला विपरीत निरीक्षण नोंदवलं जातं, त्या क्षणी एका नवीन सिद्धांताचा जन्म होतो, जो खरंतर जुन्या सिद्धांताचेच विस्तृत रूप असते.

बिग बँग  आणि सजीव उत्पत्तीच्या सिद्धांताला विपरीत ठरेल असे निरीक्षण आजवर नोंदले गेलेलं नाही, ज्या क्षणी असं निरीक्षण नोंदवलं जाईल त्याक्षणी हे सिद्धांत विस्तृत केले जातील.. विज्ञान त्याबाबत फार निष्ठुर आहे.

आता परत आपण आपल्या लाडक्या होमो सेपियनकडे वळूयात, पुढच्या भागात..