आस्तिक, नास्तिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी
एक आस्तिक पहाटे सहा वाजता उठला, त्याने देवाला नमस्कार केला आणि त्याचा दिवस सुरू झाला.
एक नास्तिक पहाटे सहा वाजता उठला, त्याने घड्याळ बंद केले आणि त्याचा दिवस सुरू झाला.
पण मग तो पूर्ण नास्तिक आहे का?
आस्तिक आणि नास्तिक यातला फरकाचा मुद्दा फक्त देवावरील श्रद्धेचा आहे की ऐकूनच विचार करण्याच्या पद्धतीचा? नास्तिक संपूर्ण अश्रद्ध असतात का?
भारतीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात नास्तिक हा शब्द दोन-तीन अर्थाने वापरतात, एक देवाला न मानणारा तो नास्तिक दुसरा वेदप्रामाण्य न मानणारा तो नास्तिक, तिसरा स्वर्ग नरक, पुनर्जन्म इत्यादी न मानणारा तो नास्तिक. भारताला नास्तिक विचारांची अत्यंत समृद्ध परंपरा आहे. चार्वाक, लोकायत ही प्राचीन भारतातील नास्तिक विचारांची समृद्ध केंद्र होती. अगदी सातव्या आठव्या शतकातही भारतीय नास्तिक विचारांची ही केंद्र भरभराटीला आलेली होती. प्राचीन ग्रीक व भारतीय नास्तिक विचारसरणीला अनेक छटा होत्या, कोणत्या कल्पना मानायच्या, कोणत्या कल्पनांच्या आधारे जगायचं ह्या विचारांत अनेक सूक्ष्म आणि ठळक भेद होते. स्टोइसिझम नावाचा ग्रीक तत्वज्ञानाचा पंथ असं मानतो की ज्ञान हेच सर्वोच्च आनंदाचे कारण आहे आणि आनंद हेच सर्वोच्च उद्दिष्ट आहे. लोकायत कोणत्याही प्रकारच्या कल्पना पुरावा असल्याशिवाय मानू नये या मताचे होते. लोकायत पंथाचीच पुढची पायरी म्हणजे चार्वाक, जे प्रत्येक निरीक्षण, प्रत्येक अनुभव हा चिकित्सेच्या अग्नीत तपासून घ्यावा, प्रत्येक गोष्टीत रास्त शंका उपस्थित करावी आणि तिचे समाधान झाल्याशिवाय ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारु नये या मताचे होते.
या सगळ्या विचारांशी तुलना करता आजचे नास्तिक बरेच एकसुरी वाटतात. देव नाही या एकमेव खुंट्याभोवती नास्तिक फिरत राहतो आणि इतकंच लोकांना पटवता पटवता दमून जातो. नास्तिकतेच्या सगळ्यात महत्वाच्या पैलूकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाकडे अनेकजण जाणता अजाणता दुर्लक्ष करतात. देव ही मानवी समाजाच्या अनेक श्रद्धांपैकी, संकल्पनांपैकी एक आहे पण ती एकमेव नाही हे नास्तिक विसरतो. श्रद्धाळू लोकांना हसताना नास्तिक स्वतः मानत असलेल्या, जगत असलेल्या संकल्पनांबद्दल अनभिज्ञ असतो आणि म्हणून तो अतिरिक्त कडवट होत जातो.
मुळात काहीही संकल्पना न मानता आजचे मानवी समाजजीवन शक्य नाही. संकल्पना किंवा श्रद्धांचा अभाव असलेला मानवी समाज आणि माकडांची टोळी यांत फार फरक राहणार नाही. मानवी समाजाला एकत्र करणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे राष्ट्र, धर्म, व्यापार, पैसा (चलन), वेळ, मानवाधिकार, कुटुंबसंस्था, क्षमा, शांती या सगळ्या मुळात संकल्पना आहेत ज्या नैसर्गिक नाही. आपण लेखाच्या सुरवातीला पाहिलेल्या उदाहरणात, "सहा वाजणे " ही निव्वळ श्रध्दा आहे, निसर्गात सहा कधीच वाजत नाहीत. सहा वाजणे हे "निव्वळ सत्य" नाही तर सापेक्ष सत्य आहे, सूर्योदय हे कदाचित निव्वळ सत्य असू शकेल पण घड्याळ नावाची आपली श्रद्धा सुर्योदयापेक्षाही आपण ठरवलेल्या वेळ या संकल्पनेशी बांधील आहे त्यामुळे सूर्योदयाची वेळ बदलते, हे गमतीशीर विधान आपण सत्य मानतो.
जी गोष्ट वेळेची तीच राष्ट्र, पैसा, व्यापार, कुटुंबव्यवस्था या सगळ्या संकल्पनांची. देव आणि धर्म या देखील अशाच मानवनिर्मित संकल्पना आहेत, ज्या इतक्या शक्तिशाली ठरल्यात की मानवी समुदायाला त्या स्वतःपेक्षा आणि तो ज्या विश्वाचा भाग आहे त्यापेक्षाही महत्वाच्या, मोठ्या वाटू लागल्यात.
एकदा या सगळ्या संकल्पना आहेत हे स्पष्ट झालं की आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील भेदाचे मुद्दे कमी होतात आणि बुद्धिप्रामाण्य या महत्त्वाच्या विषयाचा विचार करता येतो. देव मानणे किंवा न मानणे यापेक्षा देव ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे हे एकदा जाणून घेतलं की त्याच्या संदर्भात असलेला, दोन्ही बाजूचा आग्रही कडवटपणा पटकन कमी होतो.
शेवटी आपण एका समाजाचे भाग आहोत, ज्या समाजात, कुटुंबात आपण मानत असलेल्या श्रद्धा, संकल्पना पाळणारे अनेक लोक असतात तर काही लोकं अजून पुढच्या संकल्पना मानणारे किंवा काही आपल्यापेक्षा कमी मानणारे असतात. या सगळ्याच श्रद्धा आणि संकल्पना काल्पनिक आहेत हे बुद्धिप्रामाण्यवादी माणूस जाणून असतो, त्याचं बरोबर या काल्पनिक संकल्पना मानणारी लोकं मात्र खरी आहेत हेही तो जाणून असतो. मानवी समाजात काळानुसार विविध संकल्पना शक्तिशाली किंवा कमकुवत होतात. धर्म ही संकल्पना आज पूर्वीइतकी शक्तिशाली नाही मात्र राष्ट्र ही नवीन संकल्पना प्रचंड शक्तिशाली ठरलीय. साम्राज्य या दुसऱ्या संकल्पनेला तिने संपवून टाकलंय. पैसा नावाची काल्पनिक गोष्ट, सायबर मनी नावाच्या अजून काल्पनिक गोष्टीत रूपांतरित होतीय. मानवी समाज हल्ली एकमेकांवर जितका प्रचंड विश्वास ठेवतोय तितका त्याने इतिहासात कधी ठेवला नव्हता. पूर्वी सोन्याची नाणी असायची आता आपण बिटकॉइन नामक संपूर्ण काल्पनिक चलनापर्यंत मजल मारलीय. मानवाधिकार आणि वैश्विक शांतता या दोन श्रद्धाना महत्व आल्याने मानवी इतिहासातील सगळ्यात सुरक्षित आणि शांततापूर्ण काळ आपल्या वाटेला आलाय.
राहता राहिला प्रश्न देव आणि धर्म या दोन श्रद्धांचा. या दोघांचा इतर सगळ्या श्रद्धांशी असलेला मेळ आणि संघर्ष हा स्मितीत करणारा आहे. धर्म ही श्रद्धा बऱ्याचदा राष्ट्र हा दुसऱ्या संकल्पनेशी लढाई करते, इराण इराक युद्ध किंवा पाक अफगाण युद्ध, एकाच धर्माच्या दोन राष्ट्रांत झालेला संघर्ष आहे. धर्म ही श्रद्धा, राष्ट्र हे मानलेली संकल्पना पण युद्ध मात्र खरे त्यात लढलेले आणि मेलेले लोकं खरे. हेच एकाच देशात राहणाऱ्या, दोन धर्माच्या लोकांत होणाऱ्या संघर्षाबद्दल खरं आहे. देव आणि पुण्य या दोन श्रद्धांचा संगम होतो, आणि पैसा या तिसऱ्या काल्पनिक गोष्टीने काहीतरी करून पुण्य प्राप्त केले जाते. हेच पुण्य कधी मानवाधिकार या संकल्पनेशी जोडून पैसे मोजून पदरात पाडून घेतलं जातं. वेळ आणि पैसा या दोन संकल्पनांचा मिलाफ होतो आणि व्याज या तिसऱ्या काल्पनिक गोष्टीचा उदय होतो, सगळीच गम्मत.
बुद्धिप्रामाण्य म्हणजे श्रद्धांचा अव्हेर नव्हे कारण श्रद्धा किंवा संकल्पना अव्हेरून आज आपल्याला सामाजिक जीवन जगताच येणार नाही. बुद्धिप्रामाण्य म्हणजे श्रद्धांचा डोळस स्वीकार आणि त्यांचे नियोजन. श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशी विभागणी बरेच जण करतात आणि श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नको असं टाळ्याखेचू विधान पण फेकतात, पण मुळात प्रत्येक श्रद्धा ही अंधच असते किंबहुना ती अंध असते म्हणूनच तिला श्रद्धा म्हणतात. खरा झगडा आहे तो नियंत्रित किंवा समायोजित श्रध्दा आणि अतिरेकी श्रद्धा या दोन प्रवृत्तीत. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एक श्रद्धा अति प्रबळ झाली की तिचा दुसरीशी झगडा सुरू होणार. दोन संकल्पनांचा ताळमेळ जोवर व्यवस्थित आहे तोवर समाजाचे व्यवहार नीट चालू राहतात पण एखादी संकल्पना अति प्रबळ झाली की अनर्थ होतो. राष्ट्रवाद ही खरंतर उत्तम संकल्पना पण अतिरिक्त राष्ट्रवाद हिटलरसारख्या हुकूमशहाला जन्म देतो. अतिरिक्त धर्मवादाचे परिणाम जगाने हजार वर्षे भोगलेत. अगदी कौटुंबिक आयुष्यातही अतिरिक्त देवभोळेपणा किंवा पैसा या संकल्पनेच्या अति आहारी गेलेले लोकं, इतर सगळ्या आनंदावर पाणी सोडतात.
बुद्धिप्रामान्य म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थपणे पाहण्याची ताकद कमावणे. या गोष्टी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेणे आणि मग त्यांचा उपयोग करत किंवा त्यांना टाळून स्वतःचे आयुष्य आनंदी करणे. बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती कोणत्याही संकल्पनेबद्दल आग्रही असेलच असं नाही पण त्या संकल्पनेचा अतिरेकी वापर टाळण्याबद्दल मात्र त्याने फार आग्रही असायला हवं. त्याच बरोबर इतरांच्या श्रध्दा जोवर सामाजिक हिताच्या आड येत नाहीत तोवर त्याने त्यांच्या बाबत सहिष्णू असायला हवं. एखादी व्यक्ती मनापासून चित्र काढत असेल आणि दुसरी तितकीच मनापासून पूजा करत असेल तर दोघांनाही मिळणाऱ्या समाधानाची जातकुळी एकच आहे हे समजून घ्यायला हवं. मानवी भावनांचा प्रवाह एकदा ओळखता यायला लागला की आपल्या विचारांबद्दलचे आपले हट्ट कमी होतात. बुद्धी ही जरी प्रमाण असली तरी ती अपूर्ण आहे हे ध्यानी येते. अर्थात बुद्धी किंवा ज्ञान अपूर्ण आहे म्हणून तिला एखाद्या काल्पनिक गोष्टीचा टेकू द्यायची अजिबात गरज नसते. उपलब्ध ज्ञानाच्या प्रकाशात एक एक पाऊल पुढे टाकत बुद्धिप्रामाण्यवाद सत्याचा शोध घेत जातो.
एका अनाग्रही भूमिकेतून शक्य होईल तितके सुकर आणि सोपे आयुष्य जगणे, तसेच इतरांनाही तसेच आयुष्य जगता यावे अशी परिस्थिती निर्माण करणे हे मानवी मूल्य आहे आणि ते कितीही काल्पनिक असले तरी त्याच्यावर श्रद्धा ठेवणे आज आस्तिक नास्तिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी यांच्यासाठी अपरिहार्य आहे.
शैलेंद्र कवाडे
01-09-2017