मंगळवार, ९ मे, २०१७

#|| कोहम् ।।
भाग ८

मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. 

मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं.

पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू,

मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले. मानवी मेंदू हा मानववंशातील सर्वात मोठा मेंदू नक्कीच नव्हे, तो मान बहुदा निण्डेरथलचा आहे. इथे अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की आपल्याला मानववंशातील प्राण्यांचे सांगाडे मिळालेत, त्यांच्या कवटीच माप आपल्याकडे आहे पण मेंदू हा पूर्ण कवटी व्यापतोच असं नव्हे. त्यामुळे कोणाचा मेंदू किती मोठा होता याबद्दल आपण फक्त अंदाज करू शकतो.

दुसरी आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे  जी एक बौद्धिक क्रांती साधारण ७०००० वर्षांपूर्वी झाली असं मानलं जातं  ती नक्की काय  होती हे आपल्याला आज केवळ तर्काने जाणून घ्यावं लागेल, पण तरीही, बहुदा, या बदलात मेंदूचे आकारमान किंवा त्याचे भाग बदलले किंवा वाढले नाहीत. जे बदल घडले ते मेंदूच्या पेशींच्या एकमेकांशी असलेल्या संपर्काच्या क्षमतेत आणि प्रमाणात. जसं एखाद्या आडव्या तिडव्या पसरलेल्या भूप्रदेशात नवीन रस्त्याचं जाळं विणले जाते आणि मग पूर्वी खूप लांब असलेले प्रदेश जवळ येतात तसंच या नवीन मज्जापेशींनी मेंदूच्या वेगवेगळ्या प्रदेशांना अशा पद्धतीने जोडले की होमो सेपियन हा प्राणी इतरांपेक्षा वेगळा पडला. हे बदल अर्थातच कुठल्यातरी जनुकीय म्युटेशनमुळे झाले आणि सुदैवाने ( की दुर्दैवाने) संपूर्ण लोकसंख्येत पसरले. ज्या अर्थी हे बदल त्या पूर्ण लोकसंख्येत पसरले त्या अर्थी बहुदा तोपर्यंत होमो सेपियन ही प्रजाती फक्त पूर्व आफ्रिकेतच स्थायिक होती.

अर्थात ही प्रक्रिया इतकी साधी नसणार, हे बदल घडत असताना, ही बौद्धिक क्षमता असलेले मानव आणि नसलेले मानव सुरवातीला एकाच कळपात राहत असतील, एकत्र प्रजनन करत असतील. अगदी जनुकीय दृष्ट्या बदललेल्या मानवालाही त्याच्या क्षमतेचा पूर्ण परिचय झालेला नसेल आणि आजूबाजूचे कित्येक लोक त्याला असं काही नसतंच हे समजावून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असावे. एकंदरच "होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक" अशी परिस्थिती असावी. जोवर एका ठराविक संख्येचे लोक या पद्धतीने म्युटेट होऊन बदलले नाही तोवर ही बौद्धिक क्षमता फारशी उपयुक्त ठरू शकली नसावी. ही गोष्ट अजून नीट समजून घेण्यासाठी आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीच उदाहरण घेता येईल. नव्वदच्या दशकानंतर या क्रांतीला खरा वेग आला कारण त्याआधी समाजातील बहुसंख्य वर्ग कॉम्प्युटर म्हणजे काय, त्याच लॉजिक काय याबद्दल अनभिज्ञ होता, एकदा एका विशिष्ट संख्येत लोकांना हे लॉजिक लक्षात आल्यावर मग पुढचा प्रवास सोपा झाला.

लक्षात घ्या की, मानवी इतिहासात शारीरिक पातळीवर झालेली ही शेवटची क्रांती ( आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी), त्यानंतर झालेल्या सगळ्या मोठ्या उलाढाली मग ती शेतकी क्रांती असो वा औद्योगिक, या मानवी समाजाच्या आणि विचारांच्या पातळीवर झाल्यात.

मेंदूतील हा बदलही काही सहजसोपा आणि फक्त चांगलाच होता असं नव्हे, या बदलामुळे आपण आजही अशा काही रोगांना बळी पडतो जे फक्त मानवालाच होतात. उदाहरणार्थ, विस्मरणाचा आजार(पार्किन्सन्स) किंवा ऑटिसम.

पण अर्थातच या क्रांतीचे फायदे जास्त होते, त्यातले लगेच उपयोगी ठरलेले आणि महत्वाचे फायदे आपण पाहू. ढोबळमानाने पाहता होमो सेपियन, त्या बौद्धिक क्रांतीनंतर एक गोष्ट इतर मानव वंशीयांपेक्षा जास्त चांगलं करू लागले,  ते म्हणजे समूह बांधणे आणि तो मोठा करणे, तसच अनेक सुट्ट्या सुट्ट्या कळपातही एक सलग सुसूत्रता राखणे..

हे नक्की कसं झालं असावं?


आपण मागील भागात बघितलं की लांडगे, रानकुत्रे, वानर यांचे अत्यंत सुसूत्रपणे बांधलेले कळप एका विशिष्ट संख्येपेक्षा मोठे झाले की फुटतात, कारण कळपात राहण्यासाठी, जिथे प्रश्न जगण्या मरण्याचा असतो तिथे, ज्या परस्पर सामंजस्याची गरज असते ते एक विशिष्ट संख्या असेपर्यंतच शक्य होतं. याच कारणासाठी सैन्यात एका तुकडीत ठराविक संख्येपेक्षा जास्त सैनिक ठेवत नाहीत. एका विशिष्ट संख्येनंतर परस्परातील बंध विरळ होतं जातात, आणि हळूहळू कळपात उभी फूट पडते.

हेच तत्व मानववंशातील सगळ्या सजीवांना लागू होत, सत्तर हजार वर्षापूर्वी आधुनिक होमो सेपियनाने यात फक्त दोन बदल घडवून आणले.. बघुयात कोणते ते..

पहिला बदल होता तो कळपाच्या गणसंख्येत, जो शक्य झाला गॉस्सीपिंगमुळे.. 😊😊

आधी गॉसिपिंग म्हणजे काय ते समजून घेऊ..

बऱ्याचदा आपण दोन मुंग्यांना एकमेकींशी रासायनिक भाषेत बोलताना बघतो. हे संभाषण अत्यंत प्रार्थमिक पातळीवर असतं. जास्त विकसित प्राणी त्यापेक्षा बरंच जास्त बोलतात. दोन चिंपांजी एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगू शकतात, मग ते अन्न असो, एखादी शारीरिक इजा असो किंवा मादीवर स्वतःच्या अधिकाराची घोषणा असो..दोन चिंपांजी एकमेकांना एकमेकांबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतात,

पण दोन चिंपांजी बहुदा कधीही तिसऱ्या चिंपांजीबद्दल गप्पा नाही मारू शकत, हा तिसरा चिंपांजी कसा आहे, त्याचे चांगले वाईट गुण कोणते, तो एखाद्या परिस्थितीत कसा वागेल ह्या बद्दल हे दोन चिंपांजी तिसऱ्याच्या अनुपस्थितीत कधीच बोलू शकत नाही.

होमो सेपियन मात्र गॉसिप अत्यंत परिणामकारकपणे करू शकतो. हे गॉसिप त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल या दोघांची मतं ठरवण्याचे काम करते.. समजा दोन चिंपांजिंमध्ये काही खास बॉण्ड तयार करायचा असेल तर त्यांना एकमेकांना कुरवाळत, जवळ घेऊन बसावं लागेल. या पद्धतीला प्रचंड मर्यादा आहेत, म्हणजे एका वेळी तुम्ही एकाशीच स्पर्शातून संवाद साधू शकता. दिवसभरातील इतर सगळ्या जबाबदाऱ्या, संरक्षण, अन्न, मैथुन इत्यादी करून असे तुम्ही किती  जणाना कुरवाळणार? याच मर्यादेमुळे हे समूह एका संख्येपेक्षा जास्त वाढू शकत नाहीत. भाषेचं आणि त्यातही गॉसिपच तसं नाही. दोन व्यक्ती एकाच वेळी अनेकांबद्दल बोलू शकतात. त्यातून त्या व्यक्तीचे तिसऱ्याद्दल मत तयार होते. ते त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा, दूर रहावे की त्याला मारून टाकावे हे ठरवू शकतात. अर्थातच या पद्धतीने समूहातील बंध अधिक घट्ट आणि ठसठशीत होतात. समूहाच्या नैतृत्वाची उतरंड तयार करण्यात या गॉसिपचा प्रचंड मोठा हात असतो. विश्वास बसत नसेल तर राहुल गांधींना विचारा.

पण तरीही गॉसिप करून किती मोठा समूह एकसंध ठेवता येईल याला मर्यादा आहेत, शास्त्रीय दृष्ट्या एकाच समुदायात, 150 पेक्षा जास्त लोकांबद्दल तुम्हीं परिणामकारक कुचाळक्या नाही करू शकत. जिथे ही मर्यादा संपली तिथेच मानवी मेंदूच्या दुसऱ्या एका अचाट शक्तीचा उदय झाला, तिच्या बद्दल पुढच्या भागात.